तुडतुड्या किड्यांची ताकदवान आई, कुणाची जवळ येण्याची हिंमत नाही!

 Image: freepik

किडे-कीटक म्हणजे आपल्या माणसांच्या लेखी अगदीच छोटे आणि क्षुद्र. कमी महत्त्वाचे. त्यांना कुणीही यावं आणि मारावं. मजा म्हणून, भीती म्हणून, तिटकारा म्हणून. अशा या किड्या-कीटकांचं जगणं कायमच धोक्यात. पण हे असं आपल्याला वाटतं बरं का? किडे-कीटक छोटे असले तरी त्यांची त्यांची एक ताकद असते. त्यांच्याकडे त्यांच्या सुरक्षेचं एखादं अस्त्र असतं जे निसर्गानं त्यांना दिलेलं असतं. या जोरावरच तर तुडतुडे आई किड्यांच्या जगातली ताकदवान आई आहे. आता हे तुडतुडे कोण. अनेक प्रकारचे तुडतुडे असतात. आज ज्या तुडतुडे आईबद्दल मी सांगणार आहे ना तो तुडतुडा म्हणजे झाडावरचा तुडतुडा. त्याला इंग्रजीमध्ये ट्रीहाॅपर असं म्हणतात. तर हे झाडांवरचे तुडतुडे अगदी लबाड असतात. नक्कल करण्यात, रुप पालटण्यात एक नंबर. या तुडतुड्यांची ताकद असते त्यांच्या डोक्यावर. या तुडतुड्यांच्या डोक्यावर जणू काटेरी मुकुट असतो. त्यांच्या डोक्यावरचे काटेच असतात ज्यामुळे त्यांच्यावर आक्रमण करणाऱ्यांपासून ते स्वत:चं रक्षण करु शकतात.

हेही वाचा!

झाडांवरचे हे तुडतुडे कधी एकदम विचित्र -भयंकर दिसतात तर कधी इतके आकर्षक दिसतात की पाहाणाऱ्याला ते हातात उचलून घ्यावेसे वाटतात. तुडतुड्यांबद्दल सांगण्याची विशिष्ट गोष्ट म्हणजे त्यांचं पालकत्व. म्हणजे तुडतुडे जेव्हा आई होतात तेव्हा त्यांच्यात एक वेगळीच ताकद येते. आपल्या अंड्याकडे, अंड्यातील अळ्यांकडे, छोटुकल्या तुडतुड्यांकडे ते कोणाला जावू देत नाही आणि आपले तुडतुडे पिल्लं कुठे जाणार नाही याकडे त्यांचं अगदी बारीक लक्ष असतं. आपली बाळं मोठी होईपर्यंत त्यांची काळजी घेणं एवढंच या तुडतुडे आयांना माहीत असतं. तुडतुडे किड्यांची मादी झाडांच्य देठात आपली अंडी घालतात. अंडी घातली की त्यांचं पालकत्व सुरु होतं. आधी जिथे अंडी घातली आहे, त्या देठाला टोचून टोचून भोकं पाडतात. यामुळे अंड्यातील अळ्यांपर्यंत त्यांना पोहोचता येतं. देठांवरील छिद्रांद्वारे तुडतुडे आया अंड्यातील अळ्यांकडे लक्ष ठेवतात. आपल्या अळ्या कुठे दुसरीकडे जाणार नाही किंवा कोणी तिऱ्हाईत, अनोळखी किडा या अळ्यांपर्यंत येणार नाही, याची काळजी तुडतुडे आया घेतात. पण एवढं लक्ष देवूनही जर एखादा शत्रू अंड्यांकडे, पिल्लू तुडतुड्यांकडे फिरकलाच तर तुडतुडे आया इतकं जोरात अंग हलवतात विशेषत: पोटाकडचा भाग. यामुळे तिथे आलेला तो शत्रू किडा गांगरतो, गोंधळतो, घाबरतो आणि पळून जातो. पिल्लू तुडतुडे चांगले मोठे होईपर्यंत तुडतुडे आया त्यांच्याकडे नजर ठेवून असतात.

Image: .freepik

या तुडतुडे किड्यांचा अभ्यास करणारे अभ्यासक सांगतात की या तुडतुड्यांच्या डोक्यावरचे काटे जितके मोठे तितके हे तुडतुडे आपल्या पिल्लांचं चांगलं रक्षण करतात. तुडतुडे पिल्लं मोठे होईपर्यंत त्यांना सुरक्षित ठेवू शकतात.

हेही वाचा!

तुडतुड्यांच्या जगात

तुडतुडे हे किडे जगभरात आढळतात. फक्त अति थंड प्रदेशात ते आढळत नाही. उष्ण कंटिबंधातील प्रदेशात त्यांची संख्या आणि त्यांचे प्रकारही जास्त आहेत. या तुडतुड्यांच्या ३००० प्रजाती आहेत. प्रत्येक तुडतुड्यांचं आपलं आवडतं झाड असतं. त्या झाडावरच ते राहतात. अमेरिकेत आढळणाऱ्या या झाडांवरच्या तुडतुड्यांना ओकच्या झाडावर राहायला आवडतं. तुडतुडे विविध आकारात आणि प्रकारात पाहायला मिळतात. काही तुडतुडे झाडाच्या पानांसारखे दिसतात तर काही तुडतुडे झाडांच्या सालांसारखे. पण आपलं रुप पालटण्यात मात्र सगळेच तुडतुडे तरबेज असतात. स्वत:ला आणि आपल्या पिल्लांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना हे करावंच लागतं.

Image: freepik

झाडांवर राहाणाऱ्या या तुडतुड्यांची कोणाशीच मैत्री नसते असं नाही. हे तुडतुडे झाडावरील चावऱ्या मुंग्यांशी मात्र चांगलं जमवून घेतात. त्याचं कारण म्हणजे या तुडतुड्यांचा खाऊ. या तुडतुड्यांचं खाद्य म्हणजे झाडाच्या कोवळ्या देठातला रस. हा रस तुडतुडे शोषून घेतात. रस शोषल्यानंतर हे तुडतुडे जो स्त्राव सोडतात त्याला 'हनीड्यू' असं म्हणतात. हा मधासारखा चिकट स्त्राव म्हणजे मुंग्यांचा खाऊ. मुंग्या तो फस्त करतात. यामुळे तुडतुडे जिथे राहातात ती जागाही स्वच्छ राहाते. तुडतुडे आपल्याला एवढा चांगला खाऊ पुरवतात म्हटल्यावर मुंग्याही या तुडतुड्यांच्या वाटी जात नाही आणि कोणी जात असेल तर त्याला आधीच धोक्याची सूचना देतात. एवढुशे हे तुडतुडे. पण आहे ना यांच्यात दम!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact