- स्मिता पाटील,
(मुक्त पत्रकार)

घर बांधणं हे फक्त माणसालाच जमतं असं वाटतं का तुम्हाला? घराच्या खिडकीत किंवा बागेतल्या झाडावर तुम्ही पक्ष्यांची घरटी बघितली आहेत का? या घरट्यांचं तुम्ही बारकाईनं निरिक्षण केलं आहे का? माणसाप्रमाणे कोणतंही शिक्षण न घेता, तंत्रज्ञानाची मदत न घेता पक्षी कसं घरटं बांधतात, घराची डिझाइन ते कशी ठरवता? सामानाची जुळवाजुळव कशी करता? पक्ष्यांची घरटी मजबूत कशी असतात? असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरं जेव्हा मिळतात तेव्हा पक्ष्यांच्या जगातलं स्थापत्यशास्त्र म्हणजे आर्किटेक्चरचा भला मोठा खजिना आपल्यासमोर खुला होतो. हा खजिना तुम्हालाही पाहायचा आहे का? या खजिन्यातल्या विविध पक्ष्यांच्या घरट्याबद्दलची बारीक सारीक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर 'जंगल बाॅक्स' नावाची १३ मिनिटांची डाॅक्युमेण्टरी तुम्ही पाहायलाच हवी! या माहितीपटामुळे जगभरातील पक्ष्यांच्या दुनियेतल्या थक्क करणाऱ्या गोष्टी समजतात.
हेही वाचा!
विराट कोहली अजूनही त्याच्या पूर्वीच्या कोचकडे जाऊन सराव का करत असेल?
पक्षी त्यांच्याकडील अद्भुत कौशल्याचा वापर करुन सुके गवत, पानं, माती, अगदी कोळ्याचे जाळे वापरून कशी घरटी तयार करतात हे बघायचं असल्यास तुम्ही' जंगल बाॅक्स' ही डाॅक्युमेण्टरी फिल्म बघायलाच हवी. प्राणीजगतात केवळ माणूसच आलिशान घर बांधू शकतो हा तुमचा भ्रम पक्ष्यांचं हे कौशल्य पाहून नक्कीच दूर होईल. काही घरटी तर एवढी अप्रतिम असतात की त्यांच्यासमोर माणसानं बांधलेल्या मोठ्या वास्तूही फिक्या वाटू लागतात.
'जंगल बाॅक्स'मध्ये काय आहे? या माहितीपटात जगातील सर्वात सुंदर १० घरट्यांची माहिती मिळते. हे पक्षी कधी, कुठे आणि कशी घरटी बांधतात याचे बारीकसरीक तपशील अतिशय रंजकपणे या माहितीपटात दाखवलेले आहे.
* इंटीरियर डिझायनर 'बोवर बर्ड' : सगळेच पक्षी फक्त अंडी घालण्यासाठी घरटे बांधत नाहीत. ऑस्ट्रेलियात आढळणारा 'बोवर बर्ड' हा जमिनीवर चक्क माणसाच्या झोपडीसारखे घरटे तयार करतो. इतकेच नाही, तर हा निसर्गातला अनोखा कलाकार आहे आहे. हे पक्षी आपले घरटे रंगीबेरंगी फुलं, पानं, फळं आणि आजूबाजूला मिळणाऱ्या चमकदार वस्तूंनी एखाद्या इंटिरियर डिझायनरसारखे सजवतात.

* स्ट्रेचेबल घरटे: 'हमिंग बर्ड' हे आपलं घरटं विणताना चक्क कोळ्याच्या जाळ्याचा वापर करतात. यामुळे हे घरटं लवचिक होतं. जसा जसा पिल्लांचा आकार वाढतो, तसा या घरट्याचा आकारही वाढतो! दुसरीकडे, 'बाल्ड ईगल' चे घरटे इतके महाकाय असते की फ्लोरिडामध्ये सापडलेल्या एका घरट्याचे वजन चक्क ३,००० किलो होते! तर आफ्रिकेतील 'सोशिएबल विव्हर' पक्ष्यांचे संपूर्ण नेटवर्क एकत्र येऊन एकाच झाडावर ३०० ते ४०० पक्षी राहू शकतील असा महाकाय 'अपार्टमेंट'सारखा किल्ला बांधतात, ज्याची रचना उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहील अशी असते.
*पानांची शिलाई आणि कॅक्टसमधील छिद्र: 'टेलर बर्ड' म्हणजे शिंपी पक्षी चक्क झाडाची मोठी पानं एकत्र आणून, वनस्पतींच्या धाग्यांनी किंवा कीटकांच्या रेशमाने पानांना १०० ते २०० टाके घालून आपलं घरटं शिवतो! तर दुसरीकडे 'एल्फ आउल' हा चक्क वाळवंटातील काट्यांनी भरलेल्या कॅक्टसच्या (कोरफडीच्या प्रजातीचे विशाल झाड)आत छिद्र करून राहतो, जिथे कोणताही शिकारी पोहोचू शकत नाही.
जंगल बाॅक्स ही डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर पक्ष्यांकडे बघण्याची आपली नजर नक्कीच बदलेल. आपल्याला पक्ष्यांमध्ये दडलेला आर्किटेक्ट दिसू लागेल. पक्ष्यांमधील ऊर्जा समजेल.
डाॅक्युमेण्टरी पाहिल्यानंतर..
- तुम्हाला या माहितीपटातली सर्वात थक्क करणारी गोष्ट कोणती वाटली? ती तुमच्या वहीत लिहून ठेवा.
- माहितीपटातल्या सगळ्या पक्ष्यांची मराठी नावे काय आहेत हे पण शोधा.
- आपल्या घराजवळ , बागेत झाडावर एखादं पक्ष्यांचं घरटं दिसलं तर त्याचं लांबूनच पण बारकाईने निरिक्षण करा.
- निसर्गातली पक्ष्यांची ही घर बांधण्याची कला दाखवणारी डाॅक्युमेण्टरी पाहण्यासाठी यूटुबवर जा आणि तिथे jungle Box हे नाव टाइप करा.
smita.patilv@gmail.com


