मोठ्यांचं लहानपण

क्रिकेट म्हटलं की विराट कोहली हे तुम्हा मुलांचं लाडकं समीकरण आहे, हो ना? विराटने परवाच त्याचे क्रिकेट कोच राजकुमार शर्मा यांच्या क्रिकेट अकॅडमीचं दिल्लीत उद्घाटन केलं. वयाच्या आठव्या वर्षीपासून विराट शर्मा सरांकडे क्रिकेट शिकायला जातो आहे. आणि गंमत सांगू का? विराट असं म्हणत होता की अजूनही त्याला जेव्हा जेव्हा वेळ असतो तेव्हा तो सरांकडे क्रिकेटचे धडे गिरवायला जातो. विराट कोहलीला अजूनही क्रिकेट शिकत राहायला हवं असं वाटत असेल तर आपण अजून किती शिकायला हवं, ते तुमचं तुम्हीच ठरवा आता.
हेही वाचा!
तास न तास टीव्ही बघणारी वैशाली चेस चॅम्पियन कशी झाली?
तर, तुमचा हा लाडका विराट दिल्लीत लहानाचा मोठा झाला. लहानपणापासूनच तो खोडकर होता, सगळीच मुलं लहानपणी तशी असतात. पण गंमत म्हणजे त्याला खूप लहान असल्यापासून क्रिकेट खूप आवडायचं. घराजवळ तासनतास तो बॅट घेऊन खेळत बसायचा. विराटला क्रिकेट आवडतं आणि त्याला कुणीतरी नीट शिकवलं तर तो छान खेळू शकेल हे त्याच्या बाबांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी त्याला राजकुमार शर्मांकडे पाठवलं. शाळा, अभ्यास आणि क्रिकेटची भरपूर प्रॅक्टीस असं विराटचं 'रुटीन' असायचं.
क्रिकेटसाठी विराटला खूप लवकर शाळेतलं लक्ष कमी करावं लागलं. पण विराट म्हणतो, शाळेत आपल्याला शिकायला मिळतं, इथेच आपण मोठे होतो आणि एक चांगला माणूस होण्यात शाळा खूप महत्त्वाची असते. मला क्रिकेट खेळायचं होतं म्हणून मी लवकर शाळा सोडली, पण ते ठरवण्यासाठी, निश्चय करण्यासाठी मला शाळेची खूप मदत झाली असं तो म्हणतो. २००६ मध्ये विराट रणजी क्रिकेट खेळत असताना त्याचे बाबा देवाघरी गेले. त्यादिवशी विराट कर्नाटक विरुद्ध दिल्ली अशी रणजी मॅच खेळत होता, पण दुसऱ्या दिवशी परत विराट खेळायला आला आणि त्याने ९० रन केले. विराट तेव्हा जेमतेम १८ वर्षांचा होता पण त्याने दाखवलेल्या जिद्दीसाठी त्याचं खूप कौतुक झालं. काहीही झालं तरी आपण क्रिकेट सोडायचं नाही असं त्याने ठरवलं आणि त्यानंतर तो किती मोठा खेळाडू झालाय हे तुम्हाला तर माहितीच आहे.

हे तुम्हाला माहिती आहे?
- विराटने वयाच्या आठव्या वर्षीपासून क्रिकेट कोचिंग घ्यायला सुरुवात केली.
- तो रोज तासन्तास क्रिकेटची प्रॅक्टीस करायचा.
- तो अंडर-19 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमचा कॅप्टन होता.
- त्याचा फिटनेस आणि शिस्त जबरदस्त आहे. गेली काही वर्ष डाएटचा भाग म्हणून विराट व्हेजिटेरिअन झाला आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


