- निखिल चव्हाण
(पर्यावरण मार्गदर्शक, वनविभाग मानोरा )
chavhannikhil135@gmail.com

मी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील माहुली गावात राहातो. मी आता फाॅरेस्ट विभागात काम करतो. झाडांची काळजी घेणं हेच माझं काम… गंमत म्हणजे हे काम करताना मला माझा छंदही जोपासता येतो. मला लहानपणापासून बिया गोळा करायचा छंद आहे. यंदा उन्हाळ्यात मी पंधरा लाखांपेक्षा जास्त बिया जमवल्या. कशा ते सांगतो, मग तुम्हालाही ते जमेल.
मी तिसरी चौथीत असेन तेव्हा. माझी आजी रोज घरातल्या अंगणात बसून कबुतरांना दाणे टाकायची. उन्हाळ्याचे दिवस होते. एकदा मीही आजीबरोबर बसून दाणे टाकू लागलो. कबुतरं येऊन दाणे टिपत होती. मधून मधून चिमण्या, साळुंक्याही दाणे खायला येत होत्या. मी त्यांना उडवून लावत होतो. कारण ते दाणे फक्त कबुतरांना द्यायचे असं मला वाटत होतं. तेव्हा आजी म्हणाली, 'खाऊ दे त्यांनाही… उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यांना कुठे मिळणार दाणा-पाणी?’
हेही वाचा!
पक्षी घरटं कसं बांधतात हे तुम्हाला पाहायचं आहे का?
आजी तेव्हा असं का म्हणाली ते मला कळायला वेळ लागला. अशाच एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आजोबांबरोबर फेरफटका मारायला गेलो. तेव्हा आम्हाला मरुन पडलेले पक्षी दिसले. दाणापाणी न मिळाल्यामुळे हे पक्षी मेले असं आजोबा म्हणाले. मी आजोबांना म्हटलं, आपण देऊ की पक्ष्यांना दाणे… आजोबा हसले, म्हणाले ‘आपण किती पक्ष्यांना दाणे घालणार? त्यांना त्यांचं अन्न झाडांवर मिळतं. तुला त्यांना खायलाच घालायचं असेल तर एक झाड लाव. एका झाडाची हजारो झाडं तयार करण्याची जादू बियांमध्ये असते. तू बिया जमव. तीच तुझी पक्ष्यांना खरी मदत!’

- तेव्हापासून मी बिया गोळा करायला लागलो. फळं खाल्ल्यानंतर एकही बी मी कचऱ्यात जाऊ दिली नाही. घरातल्यांना, मित्रांनाही फळं खाल्ली की बिया मला द्यायच्या हे सांगून ठेवलं होतं. बाहेर खेळायला गेल्यावर, गावात फिरतानाही मला झाडाखाली बिया दिसल्या की मी त्या घरी आणायला लागलो. त्या एका भांड्यात जमवायला लागलो. जमलेल्या बियांचं काय करायचं याचा विचार करताना माझे बाबा म्हणाले, आपण बिया वनविभागाला देऊया. मग काळी माती, शेण आणि राख वापरुन केलेले ४-५ हजार सीडबाॅल्स आम्ही वनविभागाला दिले.
गावातली मुलंही माझ्याबरोबर सीडबाॅल्स करु लागली. यावर्षी आम्ही १५ लाख बिया जमवल्या. त्यातल्या १० लाख बिया वन विभागाला दिल्या. उरलेल्या पाच लाख बिया आता वाशिम जिल्ह्यातल्या शाळांना वाटणार आहोत. तुम्हालाही हे जमेल. करुन बघा. करताना काही शंका आलीच तर मला ईमेल करून नक्की विचारा!

मला जमलं तुम्हालाही जमेल!
१. फळं खायची बिया फेकून न देता त्या एका पसरट भांड्यात जमा करायच्या.
२. बिया प्लॅस्टिकच्या बरणीत भरण्याआधी चांगल्या वाळवायच्या. बरणीत भरल्या की त्यात कापुराची वडी टाकायची म्हणजे आपण जमवलेल्या बियांना कीड/बुरशी लागत नाही.
३. रोपं तयार करताना प्लॅस्टिकच्या ऐवजी कापडी पिशवी वापरायची, त्यात काळी माती भरायची. त्यात बी घालायची, थोडं थोडं पाणी द्यायचं. रोप उगवलं की ते बागेत किंवा घराच्या जवळ लावायचं.
४. सिडबाॅल्स करायचे. ते वाळवायचे आणि पावसाळ्यात योग्य जागी फेकायचे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


