घरासमोरच्या कचऱ्यावर आगळं वेगळं उत्तर शोधणाऱ्या मुलाची गोष्ट

images : google

- शिल्पा दातार

केरळमधल्या एका शहरातल्या मुलाची ही गोष्ट आहे. हा मुलगा तुमच्या आमच्यासारखा वाटत नाही. थोडा वेगळा वाटतो. त्याला जाड भिंगाचा चष्मा आहे. त्याच्या एका पायाला जयपूर फूट बसवला आहे. जयपूर फूट म्हणजे काय, माहीत आहे का? ज्यांना एक पाय नसतो, त्यांना कृत्रिम पाय बसवतात, त्याला जयपूर फूट म्हणतात. या पायाच्या आधारे तो चालतो. हा मुलगा आपल्याच विश्वात रमलेला असतो. आर्टिस्टच असतो तो! आपल्याला खेळायला कसे मित्र-मैत्रिणी लागतात, आजूबाजूला माणसं लागतात, तसं त्याला खेळायला दुसरं कुणीही लागत नाही आणि आजूबाजूला कुणी नसलं तरी चालतं. आपलं कलाकुसरीचं जग,चित्रकला, घरासमोरील बागेतली झाडं-पक्षी-प्राणी-अळ्या-किडे हेच त्याचं जग असतं. या मुलाचा बराचसा वेळ बैठ्या खेळात किंवा चित्रकला, कातरकामात जात असतो. कधी कागदाचं घुबड कर, कधी बागेतल्या फुलांच्या सावलीचं निरीक्षण कर, कधी ओरिगामीच्या वस्तू तयार कर... यात तो रमतो. मस्तपैकी रंगपेटी, कागद आणि ब्रश पसरून चित्र काढतो. आपणही कधी कधी आवडती गोष्ट भान हरपून करतो ना, तस्सच!

 

हेही वाचा!

काळा रंग वाईट असतो का? काळ्या रंगाच्या वाट्याला द्वेष, टीका का येते?

 

निवडणुका आलेल्या असतात आणि आपल्या कामात खूप बिझी असलेले या मुलाचे बाबा मात्र अलिकडे खूपच वैतागलेले असतात. खरं तर तो मुलगा इतका शहाणा असतो, मग त्याचे बाबा त्याच्यावर कसे वैतागतील बरं! त्याचं होतं असं. त्यांचं ना, जुन्या पद्धतीचं मोठ्ठं घर असतं. ऐसपैस. घरासमोर भरपूर मोकळी जागा आणि तिथं झाडं.घराला सिमेंटचं कुंपण असतं. त्या भिंतीवर सतत कुणीतरी निवडणुकांच्या प्रचाराचे कागद चिकटवत असतं. रोज सकाळी गेटपाशी आलेला पेपर उचलताना त्याच्या बाबांना हे चिकटवलेले कागद दिसतात. आणि त्यामुळं त्यांची सटकते. कोण रोज आपली भिंत घाण करतं, या लोकांना काही उद्योग नाही का? कुणीतरी रात्रीतून भिंतीवर उमेदवारांच्या प्रचाराचे कागद चिकटवणे आणि रोज सकाळी त्यांनी तो काढून टाकणे, हा उद्योगच झालेला असतो. निवडणुका आल्या की तुम्ही मुलं- ‘याला निवडून द्या’, ‘त्याला निवडून द्या’ हे सांगणाऱ्या जाहिराती बघत असालच. तसंच! हे थोडं की काय, त्यांच्या कुंपणाच्या भिंतीपाशी कुणीतरी काचेची बाटलीही टाकतं. तिचा खळ्ळकन फुटण्याचा आवाज येतो. अक्षरशः त्यांची ही भिंत आणि तिच्या परिसराला या लोकांनी कचरापेटी करून टाकलेलं असतं. हा कचरा, भिंत खराब करणं थांबवायचं कसं, याचं उत्तर काही त्यांना सापडत नाही.

… पण त्यांच्या छोट्या मुलाला बरोब्बर सापडतं. हा मुलगा रोज आपल्या बाबांची होणारी चिडचिड पाहत असतो. खरं तर कधी कधी लहान मुलांना कळतं, कचरा करू नये म्हणून पण मोठ्या माणसांना अजिबात समजत नाही. बाबांना त्रास कशामुळं होतोय आणि त्यांचा त्रास कमी कसा करता येईल, याचा तो खूप विचार करतो. आणि काय, त्याला एक मस्त आयडिया सुचते. ती आयडिया नेमकी काय असते? त्यामुळं त्यांच्या भिंतीवर निवडणुकांच्या जाहिरातींचे कागद चिकटवणं, तिथं कचरा टाकणं बंद होतं का, हे पाहण्यासाठी ‘द वॉल’ ही शॉर्टफिल्म तुम्ही नक्की पाहा. त्यानं शोधलेला उपाय फिल्मच्या शेवटी आपल्याला थक्क करतो. जे बाबांना सुचलं नाही ते या मुलाला सुचलं कसं, याचं आपल्याला आश्चर्य वाटतं. चला, मग भेटूया आपल्या या कलाकार मित्राला. त्याच्या मनात नक्की काय असतं, ते पाहूया. कारण या फिल्ममध्ये तो एकही शब्द बोलत नाही. पण त्याचे हावभाव आपल्याला बरंच काही सांगतात.

या मुलाचा रोल बालकलाकार विशाल कृष्णा यानं केला आहे.त्याने ऑटिस्टिक म्हणजे आपल्याच जगात रमलेल्या आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग मुलाची भूमिका छान केलीय. या लहान मुलाचे विचार दाखवण्यासाठी झगमगाट करणारा बल्ब, सावलीचे परिणाम यांसारख्या इतर अनेक सूक्ष्म तपशिलांसह पर्यावरण आणि स्वच्छतेचा संदेशही दिला आहे. २०१८ सालच्या या लघुपटाला दोन पुरस्कार मिळाले आहेत.

शॉर्टफिल्म - द वॉल

कुठे पाहाल? - यूट्युब

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact