अभ्यासातली अडचण सोडवण्यासाठी मुलंच करतात एकमेकांची मदत!

प्रत्येक विद्यार्थ्यांला वाचन, लेखन, गणन, अभिव्यक्ती  या गोष्टी जमायला हव्यात हा शाळेचा मुख्य उद्देश असतो. त्यासाठी शाळेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आमच्या 'जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोऱ्याचापाडा', तालुका शहापूर, जिल्हा ठाणे द्वारे आम्ही 'दत्तक मित्र' हा उपक्रम राबवतो. वर्गातील हुशार विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गातील प्रगतशील म्हणजेच अभ्यासात मागे असणाऱ्या मित्राला, दत्तक घेऊन त्याला शिकण्यात मदत करणं म्हणजे दत्तक मित्र उपक्रम होय.  आमची ही शाळा एका आदिवासी वस्तीवर असून येथे शिकणारे सर्वच विद्यार्थी आदिवासी समाजाचे आहेत. दत्तक मित्र हा उपक्रम सहाध्यायी शिक्षण पद्धती म्हणजेच 'मॉनिटोरिअल एज्युकेशन सिस्टिम'वर आधारित आहे.

 

हेही वाचा!

उदगीरच्या शाळेत प्रत्येक वर्गाचे आहे एक खास झाड !!

या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरानुरूप, त्यांच्या गतीप्रमाणे शिक्षण दिलं जातं. त्यामुळे संकल्पना स्पष्ट होतात. या उपक्रमात शिक्षकाची भूमिका ही सुलभकांची असते. शिक्षक वर्गात शिकवतात परंतु सर्वच विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर सारखा नसल्यानं, त्यांची शिकण्याची गती वेगवेगळी असल्यानं आणि गावातील काही कुटुंबाचे वीटभट्टीवर स्थलांतर झाल्यानं ते विद्यार्थी जेव्हा पुन्हा शाळेत येतात तेव्हा ते अभ्यासात मागे राहतात. अशा अभ्यासात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं आणण्यासाठी हा दत्तक मित्र उपक्रम राबवला जातो.

 

   ज्या विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, गणन येत नाही अशा विद्यार्थ्यांची सुरुवातीला यादी तयार केली जाते. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना लेखन ,वाचन, गणन न येण्याची कारणं शोधून काढली जातात. काही वेळा अशिक्षित आई-वडील, कौटुंबिक वातावरण, विटभट्टीवरील स्थलांतर, हे घटक जबाबदार असतात. तर काही वेळा विद्यार्थ्यांना अभ्यासात आवड नसणं, अन्य गोष्टीत अधिक लक्ष देणं ही कारणं सुद्धा असतात. अशावेळी नेमकं कारण कोणतं हे शोधून काढून उपाययोजना केली जाते.

वर्गातील प्रत्येक विद्यार्थी समान बुद्धिमतेचा नसतो. आपण वाचताना चुकलो तर आपल्याला हसतील ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली तर ते वाचतच नाही. अशावेळी या अशा विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी प्रयत्न करतात. वर्गातील हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासात मागे असणारे विद्यार्थी दत्तक मित्र म्हणून दिले जातात. हे देत असताना जे विद्यार्थी जवळजवळ राहतात अशा विद्यार्थ्यांचा गट किंवा जोडी तयार केली जाते. कोणत्या विद्यार्थ्याला कोणता विद्यार्थी दत्तक दिला आहे याची नोंद ठेवली जाते. हा विद्यार्थी आपल्या दत्तक मित्राला शिकण्यात मदत करतो. यासाठी कधीकधी माजी विद्यार्थ्यांचा देखील उपयोग केला जातो.

दत्तक मित्र हा उपक्रम शाळेत आणि घरी असा दोन्ही ठिकाणी राबवला जातो. शाळा सुटल्यानंतर देखील हे दत्तक मित्र अभ्यास घेतात. विद्यार्थ्याच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या जातात. मराठी, गणिताचे पायाभूत ज्ञान दिलं जातं. शिक्षक शाळेच्या वेळात दररोज त्याचा आढावा घेतात योग्य तेथे मार्गदर्शन करतात. त्यांना आलेल्या अडचणी सोडवतात आणि अध्ययन स्तरानुरूप नियोजनाप्रमाणे पुढील घटक स्पष्ट करतात. यासाठी प्रकट वाचनाचे व्हिडीओ तयार करून विद्यार्थ्यांना ऐकवणे, शिक्षकांनी आधी स्पष्ट उच्चारात व विद्यार्थ्यांना समजेल अशा पदधतीने मोठयानं प्रकट वाचन करणं, त्यानंतर विद्यार्थ्यांचा वाचन सराव घेणं, भाषापेटी आणि गणित पेटी यातील विविध साहित्य वापरून संकल्पना स्पष्ट करणं अशा प्रकारच्या कृती शिक्षक आणि विद्यार्थ्यां मार्फत घेतल्या जातात.

या उपक्रमामुळे विद्यार्थी आनंदाने शिकतात. त्यांची दैनंदिन उपस्थिती वाढते. दत्तक मित्र या उपक्रमाने 'मला अभ्यास येत नाही' हा न्यूनगंड नाहीसा झाला. दत्तक मित्र या उपक्रमात विद्यार्थी आपल्या सहकार्याकडून शिकतात. वर्गातील एक हुशार विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना शिकवतो. आपलाच मित्र शिकवत असल्याने तो त्यांना जवळचा वाटतो. त्यामुळे शिकणं सुलभ होतं  वैज्ञानिक दृष्टीनं विचार केल्यास दत्तक मित्र ही सहाध्यायी अध्यापन पद्धती उपयुक्त असून या शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थी जलद गतीनं शिकतात, हे लक्षात आलं आहे.

ज्योती बेलवले.

जि. प. शाळा दोऱ्याचापाडा

तालुका शहापूर, जिल्हा ठाणे

 

खूप शाळा आणि शिक्षक मुलांसाठी फार इंटरेस्टिंग काही ना काही करत असतात. अभ्यास असो किंवा अभ्यासाच्या बाहेरची मज्जा ; अशा उपक्रमांना ऊर्जामध्ये खास जागा ठेवली आहे. सगळ्याचा शाळांना "आयडिया शेअरिंग" साठी याचा उपयोग होईल. तर, उपक्रमाविषयीची माहिती फोटोसह जरूर पाठवा. 

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
इमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact