उदगीरच्या शाळेत प्रत्येक वर्गाचं एक झाड! मुलंच होतात झाडाचे पालक!

वर्गात अभ्यासाच्या चौकटींच्या पलीकडेही खूप काही असतं. मुलांमधील सृजनशीलता आणि संवेदनशिलता जपण्यासाठी आमची 'लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय, उदगीर' ही शाळा  'माझा वर्ग माझा स्वर्ग' ही टॅगलाइन घेऊन  वर्गात विविधांगी उपक्रम राबवत असते. यामुळे शिकण्याबरोबरच मुलं इतर सर्व उपक्रम करण्यास उत्साही असतात. २०१८साली महाराष्ट्र शासनाने एकच लक्ष,दोन कोटी वृक्ष अशी मोहिम राबवली होती. आमच्या शाळेत या उपक्रमासाठी सर्व वर्गप्रतिनिधी मंडळाची बैठक झाली. सर्वांनी आपापली मतं मांडली. तेव्हा सर्वजणांनी आपल्या शाळेचा परिसर हिरवागार देखणा करण्याच्या अभूतपूर्व कल्पनेवर शिक्कामोर्तब केलं. लगेचच वर्गशिक्षकांना आणि संस्कार केंद्रप्रमुखांना (मुख्याध्यापक ) कळवलं गेलं. यातून 'आमचा वर्ग आमचा वृक्ष!' या एका सुंदर उपक्रमाची सुरूवात झाली.  

 

 हेही वाचा!

तू अभ्यासात मागे आहेस का?- मी करीन मदत !!

       आम्ही वर्गशिक्षकांनी आपापल्या वर्गातील मुलांच्या मदतीनं शालेय परिसरांत जागा निवडली. खड्डे खणण्यापासून ते रोपटे निवडीपर्यंत मुलांनीच उत्साहानं काम केलं. दुसऱ्या वर्गापेक्षा आपल्या वर्गाचे रोपटे अधिक निकोप, सुंदर,डेरेदार व्हावं यासाठी खड्याभोवताली संरक्षक जाळी बसवण्याचं ठरलं. या सर्व गोष्टीसाठी लागणारा खर्च मुलांनीच खाऊच्या पैशातून गोळा केला.

पहिल्या दिवशीच आम्ही मुलांना जाणीवपूर्वक सांगितलं होतं की, वृक्षारोपण सोपं असतं पण वृक्ष संवर्धन ही दीर्घ चालणारी आणि जबाबदारीनं पूर्ण करायची प्रक्रिया असते. आमच्या सांगण्यातल्या आशयाचं गांभीर्य मुलांनी ओळखलं आणि मुलांनी स्वत: वृक्षसंवर्धनाची मोहिम हाती घेतली. शाळेतील प्रत्येक वर्गातील एका मुलाची 'वृक्षमित्र' म्हणून नियुक्ती करण्यात आली. या वृक्षमित्रांनी हजेरीक्रमांकानुसार वृक्षाला पाणी घालण्याची जबाबदारी प्रत्येकाला दिली.

       प्रत्येक वृक्षाच्या संरक्षक कवच जाळीवर वर्गाच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे.  त्यामुळे  'आपला वर्ग आपला वृक्ष' या आपुलकीनं आणि जबाबदारीनं प्रत्येकजण आपापल्या वर्गाच्या वृक्षाला जपत राहिले. यातून वर्गाची एकजूट तर दिसलीच पण मुलांच्या मनात सृजनासोबतच संवेदनशीलतेचीही भावनिक गुंतवणूक होताना दिसली. शाळेच्या परिसरातील वृक्ष संवर्धनाची मोहीम मुलांद्वारे आजही सुरु आहे.

दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीमध्येही यात खंड पडत नाही. वर्गातील मुलं मुली त्यांना वृक्ष संवर्धनाबाबत दिलेली जबाबदारी सुट्यांमध्येही नेटानं पार पाडतात. या उपक्रमाने शालेय परिसर हिरवागार तर केलाच आहे पण सर्वच मुलांनी आपल्या वर्गाच्या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला.  आज आमच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी या उपक्रमाद्वारे पर्यावरण जगवा या चळवळीचा एक भाग झाला आहे. मुलांना निसर्गसन्मुख करणारा हा उपक्रम म्हणूनच विशेष आहे. 

 - अनिता यलमटे

लाल बहादूर शास्री माध्यमिक विद्यालय, उदगीर, लातूर 

खूप शाळा आणि शिक्षक मुलांसाठी फार इंटरेस्टिंग काही ना काही करत असतात. अभ्यास असो किंवा अभ्यासाच्या बाहेरची मज्जा ;  अशा उपक्रमांना ऊर्जामध्ये खास जागा ठेवली आहे. सगळ्याचा शाळांना "आयडिया शेअरिंग" साठी याचा उपयोग होईल. तर, उपक्रमाविषयीची माहिती फोटोसह जरूर पाठवा. 
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
इमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact