आरुषचा हट्ट पुरवण्यासाठी राणीमाशी परवानगी देणार का?

 

image : freepik

मधमाशी आणि तिच्या मैत्रिणी एकाच घरात राहतात पण त्यांना खेळायला वेळ नसतो हे ऐकून आरुषला मोठाच प्रश्न पडला. तो मधमाशीला म्हणाला,

“एवढं काय काम असतं तुम्हाला?  शाळा पूर्ण दिवस असते?”

“आमची शाळा नसते, पण आम्हाला दिवसभर मध गोळा करायला लागतो ना…”

“का पण?”

“नाहीतर आम्ही खाणार काय?”

“तुम्ही फक्त मध खाता का?”

“नाही काही… मध आणि फुलांचे परागकण.”

“ऐश आहे गं तुमची.” आरुष हेव्याने म्हणाला, “मी खूप हट्ट केला तर आई मला पोळीबरोबर चमचाभर मध देते खायला. आणि तो पण रोज नाही…”

“तू पण मध गोळा करतोस का?” मधमाशीने विचारलं.

“नाही नाही. आई दुकानातून मधाची बाटली विकत आणते.”

“अच्छा…!” मधमाशी म्हणाली, “म्हणजे आमचा मध माणसं घेऊन जातात तो तू खातोस???”

“मी तुमचा मध नाही खात!” आरुष जरा शिष्ठपणे म्हणाला, “मी माझा माझा मध दुकानातून घेऊन येतो.”

“हो का?” आता मधमाशी पण चिडून म्हणाली, “आणि दुकानात मध कुठून येतो?”

“फॅक्टरीतून!”

“कसल्या फॅक्टरीतून?”

“मधाच्या…” आरुष म्हणाला खरा, पण त्याच्या उत्तरात अजिबात जोर नव्हता. मध बनवण्याची फॅक्टरी असते का ते त्याला माहिती नव्हतं. मधमाशीने पुढच्या दोन पायांची घडी घातली आणि मागच्या चार पायांवर उभी राहत ती म्हणाली,

“अशी काही मधाची फॅक्टरी नसते. जगातला सगळा मध आम्ही मधमाश्या तयार करतो. आणि माणूस येऊन आयता आमचा मध घेऊन जातो.”

हेही वाचा : 

आरुषला समजलं फुलांवर बसलेल्या मधमाश्यांचं सीक्रेट

“तुम्ही कुठे मध तयार करता?” आता आरुषपण तिच्यावर जरा चिडलाच, “मध तर फुलं तयार करतात. तुम्ही पण तो नुसता घेऊन जाता. आणि फुलं तर मी लावली आहेत.”

“हो क्का? मग तुझ्या फुलातला मध काढून खाऊन बघ. कसा लागतो ते.”

image : possibilitarian garden

आरुषने त्या फुलांकडे बघितलं, पण त्यातला मध तो काढणार कसा? त्याला थोडीच सोंड होती? पण मधमाशीशी इतकं भांडल्याच्या नंतर तिला मध काढून द्यायला सांगणार तरी कसं??? शेवटी त्याला एक आयडिया सुचली. त्याने त्यातलं एक लांब देठ असलेलं फूल तोडलं, त्याचा देठ तोंडात घातला आणि स्ट्रॉ मधून कोल्ड ड्रिंक ओढून पितात तसं सुर्रर्रर्रर्र करून ओढून बघितलं, की त्यातून मध येतो का?

आरुषने फुलाच्या देठातून स्ट्रॉ सारखा मध ओढून बघितला, तर त्यातून खरंच थोडुसा मध आला. पण थोडा म्हणजे किती थोडा? तर एक थेंबसुद्धा नाही. आरुषला जिभेच्या टोकावर जेमतेम गोड चव जाणवली, एवढंच! त्याने अजून एक फूल तोडून त्यातला मध चोखला, आता त्याच्या लक्षात आलं, की तो मध बाजारातून आणलेल्या मधासारखा नव्हता, तर बराच पांचट होता. त्याने जरा तोंड वाकडं केलं आणि म्हणाला, 

“या मधात कोणीतरी पाणी घातलंय वाटतं.”

आता मधमाशी हसायला लागली आणि म्हणाली,

“या मधात पाणी नाही घातलेलं. फुलातला मध असाच असतो.”

“पण मग त्याचा घट्ट मध होतो कसा?”

“आम्ही करतो.”

“हॅट!”

“अरे खरंच!”

“तुम्हाला कसा काय त्याचा घट्ट मध करता येईल?”

image : dreamstime

“आम्हाला येतो.”

“कसा पण?”

“ते मी नाही सांगू शकत. आमचं सीक्रेट आहे ते.” मधमाशी म्हणाली. 

“ए याला काय अर्थ आहे? तुम्हाला मध मिळावा म्हणून मी फुलांची झाडं लावली, त्यांना रोज पाणी घातलं, त्याला फुलं आली, तू त्यातला मध नेतेस, आणि तरी मला तुमचं सिक्रेट सांगत नाहीस? ही चीटिंग आहे. मला नाही बोलायचं तुझ्याशी.” आरुष तिथून उठत म्हणाला.

“अरे अरे चिडू नको.” मधमाशी उडत उडत त्याच्या समोर गेली आणि म्हणाली, “ते खरंच आमचं सीक्रेट आहे. पण तू इथेच थांब. मी आमच्या राणीमाशीला विचारून येते. ती जर हो म्हणाली, तर मी तुला ते सांगू शकते.”

“तू लगेच परत येशील का?”

“अगदी लगेच येईन.”

“ओके.” आरुष परत मांडी घालून खाली बसला. 

मधमाशी उडत उडत त्या आंब्याच्या झाडाकडे गेली. ती लांब जाऊन दिसेनाशी झाली. पाच मिनिटं झाली, दहा मिनिटं झाली. तेवढ्यात बागेत दोन फुलपाखरं आणि तीन पक्षी येऊन गेले. एक सरडा डोकावून गेला. तरी मधमाशी परत येण्याची काही चिन्ह दिसेनात. आरुषला वाटलं की तिने आपल्याला शेंडी लावली. ती काही आता परत येणार नाही. म्हणून तो जागचा उठणार, एवढ्यात त्याला आंब्याच्या झाडाकडून त्याच्याकडे काहीतरी उडत उडत येतांना दिसलं. पण ते जे काही उडत येत होतं ते काहीतरी विचित्रच होतं. आरुष आ वासून त्याच्याकडे बघत राहिला. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact