
आपण जिथे राहातो तिथे फक्त माणसंच राहात नाही. प्राणी, पक्षी आणि लहान मोठे किटकही राहातात. आपल्या भागात कोण कोणते प्राणी, पक्षी, किटक राहातात, त्यांची संख्या वाढतेय की कमी होतेय, त्यामागे काय कारण असेल? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत का? नसेल तर ती माहित करुन घ्यायला हवीत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मी असं का म्हणतेय? - तर त्यासाठी तुम्हाला जिया नावाच्या मुलीची आणि तिच्या प्रयत्नांची गोष्ट सांगायलाच हवी. जिया प्राॅव्हिडेण्ट ही ९ वर्षांची मुलगी. ती अमेरिकेतील न्यूयाॅर्क येथे राहाते. एवढ्या लहान वयात तिने तिच्या भागातील 'डायमंडबॅक टेरापिन' नावाची एक विशिष्ट प्रजातीची कासवं वाचवण्यासाठीचं काम सुरु केलं आहे. ही कासवं तिने तिच्या घराजवळील म्हणजे लाॅग आयलंडवरील ऑयस्टर बे शहरातील मासापेक्का येथे पाहिली होती. अशीच एकदा ती येथील समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेली असता तिथे तिला एक फलक दिसला. या फलकावर डायमंडबॅक टेरापिनचा फोटो होता. आणि त्याखाली लिहिले होते ' मी असा होतो!' अरेरे आपण जिथे राहातो तिथे आपल्यासोबत हे का नाहीये आता?' हा फलक वाचून जियाला धक्का बसला. आपण पाहिलेली ही सुंदर कासवं गेलीत कुठे? असा प्रश्न तिला पडला.
हेही वाचा!
वाया जाणाऱ्या अन्नातून प्राण्यांना मेजवानी देणाऱ्या कोईची यांच्या धडपडीची गोष्ट
नंतर जियाने या कासवांबद्दलची माहिती मिळवायला सुरुवात केली. डायमंडबॅक टेरापिन आता समुद्र किनाऱ्यावर का नसतात? या प्रश्नाचं उत्तर शोधायला ती तिच्या शहरातील पर्यावरण तज्ज्ञांना जाऊन भेटली. अनेकांशी बोलल्यानंतर जियाला डायमंडबॅक टेरापिन या प्रजातीतील कासवांबद्दलची वास्तव बाब समजली. उत्तर अमेरिकेत मचूळ पाणी जिथे खारं गोड पाणी एकत्र होतं. तिथे ही कासवं वास्तव्याला असतात. मे ते जुलै दरम्यान मादी कासव वालुकामय किनाऱ्यावर अंडी घालण्यास येतात. मादी कासव रहदारीच्या किनाऱ्यावरुन येथे प्रवास करत येतात. या प्रवासात गाडी, होड्या यांच्याखाली चिरडून त्यांचा मृत्यू होतो. तसेच गाडी आणि होड्यांखाली त्यांनी घातलेली अंडीही चिरडली जातात. ही कासवांची प्रजाती आता असुरक्षित झाली आहे. अनेक कारणांमुळे ही प्रजाती आता असुरक्षिततेचा टप्पा पार करुन धोक्याच्या पातळीत प्रवेश करणार आहेत. या कारणांमध्ये हे मानव निर्मित कारण ही कासवांची प्रजाती वेगाने नष्ट होण्यास कारणीभूत ठरत आहे. या मानव निर्मित कारणाचा अडथळा पार करायचा असल्यास लोकांना या प्रजातीतील कासवांच्या मृत्यूमागचं कारण समजायला हवं. आणि त्यासाठी लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं, कासवांचे मृत्यू टाळण्यासाठी, त्यांची संख्या वाढण्यासाठी माणसांनी काय करायला हवं ही बाब लोकांपर्यंत पोहोचायला हवी याची जाणीव जियाला झाली.

जिया डायमंडबॅक टेरापिनबद्दल अनेक लोकांशी, तज्ज्ञांशी, पर्यावरण तज्ज्ञांशी बोलली. त्यातून तिला माहिती फलकाची कल्पना सूचली. या माहिती फलकावर या कासवाबद्दल एखादं लक्ष्यवेधक घोषवाक्य लिहावं. आणि तो फलक येथील सर्व समुद्र किनाऱ्यावर लावावा असा उपाय तिला सूचला. टेरापिनचा फोटो असलेल्या फलकासाठी तिला 'गो स्लो टेरापिन बीलो' हे घोषवाक्यंही सूचलं. ' आपल्याला वाटतंय म्हणून हा फलक समुद्र किनाऱ्यावर लागणार नाही हे जियाला माहिती होतं. सर्वात आधी तिने ही कासवं वाचवण्याचा तिच्या मनातला प्रोजेक्ट 'डिस्ट्रिक्ट स्कूल सायन्स फेअर'मध्ये सादर केला. तिथे तो सगळ्यांना आवडला. मग प्रयत्नांची पुढची पायरी म्हणून जिया तिच्या शहरातील प्रशासन अधिकाऱ्यांना भेटली. त्यांना टेरापिनची घटलेली संख्या, त्यामागची तिने शोधलेली कारणं, उपाय आणि त्याचा कासवांना भविष्यात होणारा फायदा समजावून सांगितला.
कासवांना वाचवण्यासाठी, त्यांची संख्या वाढवण्यासाठी जिया ज्या अधिकाऱ्यांना भेटली त्या सर्वांना जियाची कासवांबद्दलची कळकळ समजली. ही कासवं आता समुद्र किनाऱ्यावर पहिल्यासारखी दिसत नाही हे पाहून या कासवांबद्दल प्रेम असणाऱ्यां वाटणारं दु:ख समजलं. जियाने मांडलेला उपायही पटला. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर ॲक्शन घ्यायला सुरुवात केली. फलक लावण्यासाठी, ते करुन घेण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या. तसे फलक बनवून ते समुद्र किनाऱ्यावर लावण्यात आले. गाडी चालवणारे, होड्या पाण्यात नेणारे, या किनाऱ्यावर येणारे-जाणारे सर्वजण हे फलक आता वाचतात.

जिया खरंतर खूप लहान आहे. तिचा आवाज/ म्हणणं ऐकून त्यावर कोणी खरंच काही कृती करेल एवढी मोठी ती नाही. पण तिने केलेला अभ्यास, शोधलेला उपाय आणि तिने दाखवलेली जिद्द यामुळे अधिकाऱ्यांसोबतच सामान्य जनतेचं लक्षही वेधलं गेलं. आपण धीट राहिलं आणि आपली मागणी योग्य असली तर मागे न हटता ती लावून धरल्यास त्याचा 'पाॅझिटिव्ह' परिणाम होतो असं जिया म्हणते. तिच्या प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाचा परिणाम म्हणून 'डायमंडबॅक टेरापिन' या प्रजातीच्या कासवांची संख्या वाढण्यास उपयोग होईल असा विश्वास तज्ज्ञांना वाटत आहे. तुम्हाला जियाच्या या खऱ्याखुऱ्या गोष्टीतून काय समजलं, काय प्रेरणा मिळाली हे मलाही नक्की सांगा!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


