माझी गोष्ट
‘वीर गाथा 5.0’ या केंद्रीय संरक्षण आणि शिक्षण मंत्रालयाच्या कार्यक्रमासाठी अख्ख्या देशातून १०० मुलं निवडण्यात आली. त्यात माझीही निवड झाली होती. रिझल्ट लागला तेव्हा मी नाटकाच्या प्रॅक्टिसला होते. आईने मला निवड झाल्याची बातमी दिली. हा कार्यक्रम दिल्लीला होणार होता. दिल्लीला जायची, विमानात बसायचीही माझी ही पहिलीच वेळ होती.
गोव्याच्या एअरपोर्टवरुन आमचं दिल्लीचं विमान होतं. विमानात बसायचं म्हणून चेकिंग, बोर्डिंग पास मिळणं या सगळ्याची मला खूप गंमत वाटत होती. विमानात मला विंडो सीट मिळाली. भीती आणि मज्जा असं दोन्ही एकदम वाटत होतं. विमान आकाशात गेलं आणि मग मी ढगांच्या वरच होते. थोड्याच वेळात आम्ही दिल्लीत पोहोचलो.
पहिल्यांदाच मी आणि आई फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलो. तिथे खूप मोठ्ठा स्वीमिंग पूल होता. मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या मुलींना भेटायला मिळालं. कतार आणि मलेशियाहून आलेल्या मुलांशीही माझी ओळख झाली. मला इंग्लिशमध्ये बोलायला जरा भीती वाटते, पण मोडक्या तोडक्या मराठी-हिंदी-इंग्लिशमध्ये मला त्यांच्याशी गप्पा मारता आल्या.
हेही वाचा!
मी कणीक मळतो, चहा करतो.. कारण मला स्वयंपाक करायला खूप आवडतो!
आम्ही राहत होतो त्या हॉटेलमध्ये एक बौद्ध तत्त्वज्ञानावर एक कॉन्फरन्स सुरु होती. तिथे खूप बौद्ध भिक्कू म्हणजे मॉंक आले होते. एका माँक आजोबांनी मला टेडीबेअर आणि चॉकलेट दिलं. आमच्या कार्यक्रमासाठी मला ब्लेझर मिळाला. माझा पहिला ब्लेझर… मला खूप मस्त वाटलं.
आमचा कार्यक्रम २४ जानेवारीला डीआरडीओच्या ऑडिटोरिअममध्ये होता. तिथे भारतीय नौदल आणि वायुसेनेचे प्रमुख, संरक्षणमंत्री आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या. आम्हाला मेडल आणि सर्टिफिकेट दिलं. या कार्यक्रमामुळे मला मोठ्या माणसांचा वक्तशीरपणा, शिस्त, देशप्रेम हे सगळं जवळून पाहायला मिळालं. हा दिवस मी कधीही विसरू शकणार नाही.

दिल्ली भेटीत आम्ही राष्ट्रपती भवन पाहिलं. तिथल्या बागा पाहिल्या. सगळं केवढं भव्यदिव्य आणि मस्त आहे. दि. २५ जानेवारीला आम्ही पंतप्रधान म्युझियम बघितलं. दि. २६ जानेवारीची परेड दरवर्षी मी टीव्हीवर पाहिली आहे. यावेळी मी दिल्लीत कर्तव्यपथावरून ती बघितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही मी खूप जवळून बघितलं. या अनुभवाच्या भरपूर आठवणी आणि देशाबद्दलचं भरपूर प्रेम घेऊन मी दिल्लीहून परत आले.
- सावी वैभव मुद्राळे,
कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे
ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग


