मी कणीक मळतो, चहा करतो.. कारण मला स्वयंपाक करायला खूप आवडतो!

माझी गोष्ट

- अभयराजे गव्हाणे
इयत्ता आठवी,
एमआयटी व्हिजीएस स्कूल, बार्शी, सोलापूर

मला स्वयंपाकाची खूप आवड आहे. आई, आजी स्वयंपाक करायच्या तेव्हा मी त्यांच्याकडे बघत बसायचो. चौथी असताना पहिल्यांदा आईने मला चहा चहा शिकवला. नंतर मी काॅफी करायला शिकलो. मग हळूच मी स्वयंपाकघरात 'एन्ट्री' मिळवली.
आधी मी आई आजी कसा स्वयंपाक करतात ते पाहायचो. मग मी कणिक मळायला शिकलो, पोहे, उपमा करायला शिकलो. माझ्या आजोबांना इतक्या लहान वयात माझं स्वयंपाक शिकणं अजिबात आवडलं नव्हतं. त्यांना वाटे, माझा हात कापेल किंवा भाजेल. पण मला स्वयंपाक करायचाच होता. मग मी आईच्या सारखा मागे लागायचो, की शिकव ना गं!
मी पहिल्यांदा प्रॅक्टिस म्हणून चहा केला तेव्हा ऊतू गेला. आई खूप ओरडली मला. हळूहळू मी नीट करायला लागलो. आईला आजीला स्वयंपाकात मदत करायला लागलो. त्यांना सारखे प्रश्न विचारायचो. कापाकापी, चिराचिरी करुन द्यायचो.

सगळ्यांसाठी मी जेव्हा पहिल्यांदा चहा केला होता तेव्हा तो खूपच गोड झाला. पण मी केला म्हणून तो सगळ्यांनी आनंदाने घेतला. पण एकदा बटाट्याची भाजी केली. त्या भाजीत मीठ खूप जास्त झालं. एकदा पोळी करताना माझं लक्ष इकडे तिकडे गेलं आणि पोळी करपली. मग ती करपलेली पोळी मलाच खावी लागली. यानंतर मी लक्ष देऊन स्वयंपाक करु लागलो. स्वयंपाकामुळे मी एका वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष द्यायला, मल्टी टास्किंग करायला शिकलो.

हेही वाचा

एक आळशी मुलगा धावतच सुटला! त्याला पळण्याची आवड कशी लागली?

मी स्वयंपाक शिकतो ही गोष्ट माझ्या मित्र मैत्रिणींनाही माहिती आहे. माझ्या हातची पापड चटपटी, नूडल्स, फ्राइड राइस खाण्यासाठी ते नेहमी घरी येतात. मला माझ्या हातचा व्हेज फ्रॅंकी हा पदार्थ आवडतो. मी युट्यूबवर रेसिपीचे व्हिडीओ पाहून काय काय करतो. पापड चटपटी, ओरियो शेक यासारखे पदार्थ मी असे पाहून आणि प्रयोग करुनच शिकलो. गेल्या वर्षी मी माझं युट्यूब चॅनल सुरु केलं आहे. मी माझ्या रेसिपीचे व्हिडीओ बनवून टाकतो. आतापर्यंत माझे २२५ सबस्क्रायबर्स झाले आहेत. सर्व व्हिडीओज मिळून १५००० व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओजवरील कमेंटमध्ये कोणी माझं कौतुक करतात. कोणी माझी टिंगल करतात पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि माझं स्वयंपाक शिकण्याचं काम सुरु ठेवतो.

मला अभ्यास आणि स्वयंपाक दोन्ही करायला आवडतं. दिवाळीच्या, उन्हाळ्याच्या सुटीत , शनिवार-रविवारी मला जे आवडेल ते पदार्थ करुन पाहातो. घरी पाहुणे वगैरे आले की आई-आजीला मदत करतो. पाहुण्यांना चहा करुन द्यायला मला फार आवडतं आणि पाहुण्यांनाही माझ्या हातचा चहा आवडतो. आता मला पुरणपोळी करायला, भाकरी थापायला शिकायचं आहे. मला मोठेपणी शेफ व्हायचंय. मला अनेक गोष्टी करायला आवडतात. पण स्वयंपाक करताना मला जी मजा वाटते, जो आनंद मिळतो तो मला इतर कशातूनच मिळत नाही.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact