- राजीव तांबे
आज्जो किचनमधे गेले आणि वाटीत काहीतरी घेऊन आले. वाटी टेबलावर ठेवली. बाजूला कागद ठेवला. वाचता वाचता निवानने हळूच पाहिलं तर, हातातली छोटी काडी वाटीत बुडवून आज्जो कागदावर काहीतरी लिहित होते.
निवानला कळेना हा कुठला विचित्र प्रकार? निवानने ठरवलं, एव्हढी गोष्ट वाचून संपली की पाहू.
थोड्याचवेळात निवानने गोष्ट वाचून संपवली. तो धावतच आज्जोकडे गेला. आज्जोंनी ‘तो कागद’ ऊन्हात ठेवला होता. कागद कोराकरकरीत होता.
तो कागद निवानला देत आज्जो म्हणाले, “या वाटीतल्या पांढर्या शाईने पांढर्या कागदावर आजीसाठी चमचमीत प्रश्न लिहिलाय. दे आजीला नेऊन. आणि ये आजीचं उत्तर घेऊन.”
“अहो आज्जोsss या कोर्या कागदावर तर काही लिहिलेलंच नाहीए तर आजी वाचणार कसं?”
“अरे निवान तू आजीला नेऊन तर दे. मग पाहा आजी मला लगेचच उत्तर देते की नाही? जा..जा.”
निवान कोरा कागद आजीकडे घेऊन जात म्हणाला, “आज्जोंनी चमचमीत प्रश्न पाठवलाय. आता तू वाचणार कसं?”
हेही वाचा…
शिडीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात वस्तू कशी पोहोचवावी?
“मगाशी ते वाटीत थोडं दूध घेऊन गेले तेव्हाच वाटलं मला की आता येणार कोर्या कागदावरचा प्रश्न. चल वाचूया आपण.”
आजीने मेणबत्ती पेटवली. कागद जळणार नाही अश बेताने तो कागद मेणबत्तीवर धरला. कागदाला ऊष्णता मिळताच प्रश्न दिसू लागला.
निवानने टाचा ऊंचावून पाहिलं. कागदावर लिहिलं होतं, “संध्याकाळी भजी करूया की भेळ?”
आजीने दुसर्या कागदावर उत्तर लिहून दिलं. शाई सुकताच कागद निवानच्या हातात देत आजी म्हणाली, “हं. हे घे चमचमीत प्रश्नाचं चटकदार उत्तर. ही मेणबत्ती आणि काडेपेटी पण नेऊन दे आज्जोला.”
आज्जो वाटच पाहात होते. कागद गरम करून उत्तर वाचताच आज्जो आनंदाने टाळ्या वाजवत म्हणाले, “तुझी आजी अत्यंत हुशार आहे बरं का निवान. आजीने फक्त एका शब्दातच उत्तर दिलं आहे.”
“आँss कोणता शब्द?”
“दोन्ही.”
दोन्ही हात ऊंचावून निवान म्हणाला, “ऊssवॉssव! पण आज्जो, आजीसारखा मी पण हुशार आहे. तुमच्या वाटीत पांढरी शाई नव्हती तर ते दूध होतं, हो की नाही?”
“शाबास निवान. काडी दुधात बुडवून कागदावर मजकूर लिहायचा. तो वाळू द्यायचा. मग तो जवळजवळ दिसेनासा होईल, हे तू पाहिलंच आहेस. आता कागदाला खालून ऊष्णता दिल्याने दुधामधील सेंद्रिय पदार्थ जळतात. सेंद्रिय पदार्थांचे रेणू बाष्पाच्या रुपाने निघून जातात आणि कार्बन शिल्लक राहतो..”
“आणि आपल्याला मजकूर दिसतो.”
“बरोब्बर!”
‘दूध पिण्यासाठी वापरा किंवा लिहिण्यासाठी, संदेश हा जातोच’ ही हुनान प्रांतातील चिनी म्हण लक्षा ठेवा.
18
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


