-राजीव तांबे
कालपासून घरातल्या सिलींग फॅनचा खडाम खडाम, खुटूम खुटूम असा आवाज येत होता. आई वैतागून बाबांना म्हणाली “तो पंखा तरी दुरुस्त करा नाहीतर बंद तरी करा. सतत ख-ख खू-खू सुरूच त्याचं.”
बाबा म्हणाले,“तू सांगितलेली दुसरी गोष्ट आधी करतो आणि आधी सांगितलेली गोष्ट मग करतो. कळलं?” हात नाचवत सारा म्हणाली, “नाही कळलं.”

“अगं म्हणजे आधी पंखा बंद करतो आणि मग तो दुरुस्त करतो.” असं म्हणत बाबांनी दारामागे ठेवलेली ॲल्युमिनीयमची फोल्डींग शिडी आणली. पंख्याखाली ठेवून उघडली.
पदराला हात पुसत आईने पंखा बंद केला.
पंखा थांबताच बाबा सावकाश शिडीवर चढले.
“अरेच्या ती पंख्याची कॅनोपी खाली घसरली आहे. त्यामुळेच त्याचं ख-ख खू-खू सुरू आहे.”
“पण ती खाली का घसरली?”
“अगं सारा, पंखा फिरताना त्याची दांडी पण हलत असते. धक्के लागून त्या कॅनोपीचा स्क्रू सैल झाला आणि घसरली की ती. तो स्क्रू घट्ट केला की झालं.”
“म.. तुम्हाला तो स्क्रू ड्रायव्हर देऊ का?”
“हा कॅनोपीचा स्क्रू इतका लहान आहे की त्यासाठी आपल्याकडे तो छोटा टेस्टर आहे ना, तोच दे मला.”
टेस्टर घेऊन सारा आली. बाबा शिडीवर उभे होते. आता हा टेस्टर बाबांना द्यायचा कसा? साराला प्रश्न पडला.
हेही वाचा…
साखरेतून उजेड तयार करायची आयडिया
बाबांनी साराच्या मनातलं ओळखलं. “थांब मी तुला एक कोडं घालतो. ह्या टेस्टरचे टोक माझ्याकडे करुन जर तू माझ्या दिशेने वर उडवलास तर ते टोक मला लागू शकेल. आणि टोक तुझ्याकडे ठेवलंस तर तो खाली तुझ्या अंगावर पडेल कारण टेस्टरची मूठ जड असते.
म.. आता मला सांग हा टेस्टर अत्यंत सुरक्षितपणे माझ्याकडे तू कसा फेकशील?” बाबांच बोलणं थांबलं आणि साराचं विचार चक्र सुरू झालं.
इतक्यात आईने किचन मधून डोकावून पाहताना हात लांब केला. क्षणात साराला आयडिया सुचली.
सारा हसतंच शिडीच्या पायाशी उभी राहीली. तिने उजव्या हातात टेस्टर आडवा धरला. हात सरळ लांब केला. आणि बाबांना म्हणाली “आता कॅच पकडा.मी टेस्टर आडवा फेकणार आहे म्हणजे त्याचे टोक तुम्हाला लागणार नाही. टेस्टर आडवा वर आल्याने त्याचा कॅच पकडणं तुम्हाला सोपं होईल..”

“अगं पण माझा कॅच सुटला तर..?”
“समजा तुमचा कॅच जरी सुटला तरी टेस्टर माझ्यापासून ‘एक हात लांबच’ पडेल. हो किनई?”
बाबा काही बोललेच नाहीत फक्त हसत-हसत हं..हं.. करत गुरगुरले आणि कामाला लागले.
साराला थोपटत आई म्हणाली,“व्वा! दोघांचा ही आवाज बंद झाला. एक पंख्यांचा आणि दुसरा...”
आईकडे पाहात बाबा म्हणाले,“म्हणून तर मी साराचा फॅन आहे.”
आणि घरातले तीन सजीव पंखे हॅ हॅ करत हसू लागले.
me@rajivtambe.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


