एक आळशी मुलगा धावतच सुटला! त्याला पळण्याची आवड कशी लागली?

माझी गोष्ट 

- जीत सावंत,
श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक शाळा
पंढरपूर

Image: freepik

मी एक अतिशय आळशी मुलगा होतो. माझ्या आळशीपणाला घरातले सर्वच वैतागलेले होते. मला सगळ्याच गोष्टींचा फार कंटाळा यायचा. स्वत:च्या गोष्टी आवरायचो नाही. सकाळी लवकर उठायचो नाही. आई बाबा माझ्यावर सतत ओरडायचे. पण ते कितीही रागावले तरी माझ्यावर काहीच परिणाम व्हायचा नाही. मी तसाच आळशीच्या आळशीच राहायचो.
पण आता मी आळशी नाही. माझ्यात हा बदल झाला तो मी श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक शाळेत प्रवेश घेतल्यानंतर. या शाळेत मला टापरे सर आणि भोसले सर भेटले. त्यांच्याकडे बघून स्वत:ला चांगल्या सवयी लावाव्याशा वाटल्या. या दोन्ही सरांनी आम्हा सर्व मुलांना व्यायामाची सवय लावली आहे. दर शनिवारी दोन्ही शिक्षक आम्हाला सकाळी यमाई तलावाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर धावायला नेतात. पळून झालं की आम्हा मुलांकडून 12 सूर्यनमस्कार घालून घेतात. यामुळे इतर दिवसांपेक्षा मला शनिवारी अगदी फ्रेश फ्रेश वाटायला लागलं..

 

हेही वाचा!

एक परीक्षा दिली आणि 'नासा'ला जाण्याची संधी मिळाली! त्या नासा भेटीची गोष्ट

आता मी सकाळी लवकर म्हणजे पाचलाच उठतो. रोज सकाळी रनिंगला जातो. बारा सूर्यनमस्कार घालूनच मी घरी परत येतो. घरी आलो की शाळेची तयारी करतो. पूर्वी मला व्यायाम म्हटलं तरी राग यायचा पण आता मला व्यायाम केल्याशिवाय करमत नाही. आधी धावायचो नाही त्यामुळे त्याचे फायदे माहीतीच नव्हते. आता मी रोज पळायला जातो.
तुम्हाला सांगतो, धावण्याचे खूप फायदे आहेत. एकतर सकाळी रनिंग केल्याने सकाळी थंडी वाजत नाही. पटापट अंघोळ करावीशी वाटते. आंघोळ करताना अंगाला कापरं भरत नाही. वेळेत तयार झाल्यामुळे शाळेला जायला उशिर होत नाही. घरी लवकर उठण्यावरुन आई बाबा ओरडत नाहीत. धावायला लागल्यावर आपण सारखे सारखे आजारी पण पडत नाही. आधी मला हे सगळं खरं वाटायचं नाही, पण आता पटलंय!
आमचे भोसले सर मॅरेथाॅन रनर आहेत. ते मॅरेथाॅनमध्ये 10 कि.मी. पळतात. विविध स्पर्धांमध्ये त्यांना बक्षिसं आणि मेडल्सही मिळाली आहेत. त्यांचं घर बक्षिसांनी भरुन गेलंय. आता मलाही सरांसारखं दहा कि.मी. पळावंसं वाटतं. सर सांगतात की आपण आपल्यासाठी धावायला जावं. मला सरांचं हे म्हणणं पटलं आहे

तुम्हाला तुमची अशी काही गोष्ट सांगायची आहे? लक्षात राहिलेला एखादा प्रसंग, अजिबात न आवडलेली एखादी गोष्ट तर नक्की ऊर्जाला लिहून पाठवा.ती गोष्ट दैनिक लोकमतमधे रविवारी प्रसिध्द होणाऱ्या 'ऊर्जा'च्या पानावर प्रसिध्द केली जाईल.

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact