बकऱ्या आणि उंदरांमुळे एक सुंदर बेट ओसाड झालं! ते कसं?

Image: accuweather

बेट म्हटलं की आजूबाजूला पाणी, बेटावर असंख्य झाडी, पक्षी,  स्वच्छ सुंदर वातावरण असं दृश्य नजरेसमोर उभं राहातं. पण रिडोंडा नावाच्या बेटावर असं वातावरण राहिलं नव्हतं. हे बेट संकटात आलं होतं. पण या संकटातून या बेटाची आता सुटका झाली आहे. रिडोंडा हे वेस्ट इंडिज  येथील कॅरेबियन बेट आहे. या बेटाची एक खास ओळख आहे. विशिष्ट पक्षी, प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींसाठी म्हणून हे बेट ओळखलं जातं. या बेटावरचं विशिष्ट वातावरण हे तेथील जमीन, पाणी आणि सभोवतालच्या हवेला पोषक असंच होतं.  पण बेटाची ही ओळख काही वर्षांपूर्वी पुसली होती. हे का घडतंय असं लक्षात येवून त्यावर उपाययोजना केल्यावर मात्र रिडोंडा हे बेट त्याच्या मूळ रुपात आलं आहे.

हेही वाचा!

रिडोंडा बेटावर काय झालं होतं?

रिडोंडा बेट हे जगासाठी रहस्यच होते. पण हे रहस्य उलगडलं ते कोलंबसने. यानंतरही शंभर वर्ष या बेटावर माणसांची वर्दळ नव्हती. ये-जा नव्हती. या बेटावरील माती  प्राणी पक्ष्यांच्या विष्ठेमुळे वैशिष्ट्य्पूर्ण होती. त्याचा उपयोग योग्य प्रतीचं खत होण्यासाठी बंदुकीची पावडर बनवण्यासाठी होतो हे कळल्यावर या बेटावर लोकांची वर्दळ वाढली. माणसांबरोबर मग शेळ्या, उंदरंही या बेटवर आली. या उंदरांनी बेटावर बिळं करायला सुरुवात केली. रिडोंडा बेटावर बूबी आणि फ्रिगेटबर्ड हे समुद्रपक्षी मोठ्या प्रमाणावर होते. हे पक्षी घरट्यात अंडी घालायचे. पण उंदीर या पक्ष्यांची अंडी खाऊन टाकायचे.  

 Image: theguardian

Image: earthisland

बकऱ्या या बेटावरची झाडं खायच्या. हळूहळू बेटावरची झाडंच नाहीशी व्हायला सुरुवात झाली. झाडांशिवाय माती आणि दगड यांना कोणी एकत्र पकडू शकत नव्हतं. त्यामुळे रिडोंडा बेटाची दगड माती समुद्रात पडू लागली. हे सर्व समुद्राच्या तळाशी जात होतं. यामुळे समुद्रातील जीवांचा श्वास घुसमुटू लागला. समुद्रातील अन्नसाखळी विस्कळीत झाली. अशा प्रकारे बेटाच्या जमिनीवर आणि समुद्राच्या आतही पर्यावरणाची मोठी हानी होवू लागली. उंदरांनी बेटाच्या उंच कडांवर असलेल्या पक्ष्यांची घरटीही उध्वस्त केली .रिडोंडा बेटावरील उंदरांनी एवढी दहशत पसरवली की पक्षी तिथे येईनासे झाले. बेटावरची हिरवळ संपली, झाडं वनस्पती संपल्या. बेट ओकंबोकं दिसू लागलं. त्यामुळे बेटावर असलेल्या बकऱ्या मरायला सुरुवात झाली.

हेही वाचा!

२०१६ मध्ये ॲंटिगुआ आणि बार्बुडा या बेटांच्या देशांनी या रिडोंडा बेटाकडे लक्ष पुरवायला सुरुवात केली. हे बेट ॲंटिगुआ आणि बार्बुडा या देशांच्या मालकीचं. या देशाने मग रिडोंडा बेटावर या बेटासाठी आक्रमक आणि घातक प्राण्यांचं निर्मुलन करण्याची मोहीम हातात घेतली. रिडोंडा बेटाच्या बचावासाठी आलेल्या माणसांनी आधी येथील बकऱ्यांना त्यांना अनुकुल असलेल्या बेटावर सोडलं. मग त्यांनी उंदरांचे निर्मूलन करायला सुरुवात केली. त्यासाठी तेथील उंदरांना त्यांनी विषारी औषधं घालायला सुरुवात केली. ही माणसं जेव्हा आपलं काम आटोपून तंबूत झोपायला जायची तेव्हा तंबूबाहेर विषारी औषध खाऊन तडफडणाऱ्या उंदरांचा आवाज त्यांना आत ऐकू यायचा. या बेटावरील ६,००० उंदरांचं निर्मूलन करण्यात आलं.

हे काम झाल्यावार ही लोकं तिथून निघून गेली. नंतर या बेटावर एक झाडं देखील माणसाकडून लावण्यात आलं नाही. थांबून वाट पाहाण्याचं धोरण अवलंबण्यात आलं. आणि काय आश्चर्य निसर्गाने त्याचं काम केलं. उंदरांच्या भीतीने गेलेले पक्षी बेटांवर पुन्हा आले. बेट सहा महिन्याच्या आतच हिरवंगार झालं. रिडोंडा बेटावरील ग्रीन ड्रॅगन या सुंदर स्थानिक सरड्यांची संख्या १,३०० टक्क्यांनी वाढली. स्थानिक वनस्पती, झाडं पुन्हा उगवल्या. ३०,००० एकरावर पसरलेलं रिडोंडा बेट आपल्या मूळ रुपात पुन्हा आलं. आता ते पुन्हा येथील विशिष्ट पक्षी आणि वनस्पतींच्या सौंदर्यामुळे जमिनीवरला स्वर्ग वाटू लागला आहे.

Image: earthisland

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact