मी कानात इअरफोन्स घालून गाणी ऐकली तरी आई चिडते. ते का?

image : 123RF

तुम्ही मोबाईलवर गाणी कशी ऐकता? कशी म्हणजे, मोबाईल स्पीकरवर टाकून ऐकता का? किंवा मित्राचा किंवा मैत्रिणीचा फोन आला आणि त्यावर खूप वेळ हातात धरून बोलता का? किंवा फोन स्पीकरवर टाकता का? का या प्रत्येक वेळी शक्यतो हेडफोन्स किंवा इअरफोन्स वापरता?

इअरफोन्स वापरण्याची कारणं वेगवेगळी असतात. काहीजण आपण जे ऐकतोय त्याचा इतरांना त्रास होऊ नये म्हणून इअरफोन्स वापरतात, काही जण आपण किती मोठ्याने गाणं ऐकतोय ते आईवडिलांना कळू नये म्हणून इयरफोन्स वापरतात, तर काही जण आपण काय बोलतोय ते इतरांना ऐकू जाऊ नये म्हणून इअरफोन्स वापरतात. पूर्वी कानाच्या वर लावण्याचे हेडफोन्स जास्त वापरले जायचे. आता बहुतेक वेळा कानात घालण्याचे इअरफोन्स वापरले जातात. त्यातही आता आलेले लेटेस्ट इअरफोन्स जे आहेत, त्यांना तर वायरसुद्धा नसते. त्यामुळे ते फोन संपल्यावर सहज काढून ठेवता येत नाहीत. त्यांची डबी असते, पण ती फार कोणी वापरत नाही. आणि मग एकदा कानात घातलेले इयरफोन्स तसचे तास तसेच कानात ठेवले जातात. घरातली मोठी माणसं असं करू नको म्हणून सांगत असतात. पण आपण तर आपण असतो, त्यामुळे आपल्याला ते पटत नाही. आणि आपल्याला असं वाटतं, की आपण काहीही केलं, तरी मोठी माणसं उगाच रागावतात. “माझ्या कानात मी माझे इयरफोन्स घातले तर आईला काय प्रॉब्लेम आहे?” असं म्हणून आपण उलटून आईशी भांडतो, दादा नको म्हणत असतांना त्याचे इयरफोन्स वापरतो…

इअरफोन्स वापरणं खूप वेळा सोयीचं आणि गरजेचंही असतं हेही बरोबर आहे, पण तरीही फार वेळ इअरफोन्स वापरल्यामुळे खूप नुकसान होऊ शकतं हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं की खूप मोठ्या आवाजात सतत गाणी ऐकली तरच नुकसान होतं, पण खरं म्हणजे इतरही बऱ्याच प्रकाराने इअरफोन्स नुकसान करतात.

 

हेही वाचा!

मी शाळेत जातो म्हणून मी इन्स्टावर जायचं नाही.. ते का?

इअरफोन्स वापरल्याने काय नुकसान होतं?

  • image : istock

    पहिला मुद्दा अर्थातच मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याचा आहे. सतत मोठ्या आवाजात गाणी किंवा इतर काहीही ऐकल्याने तुमच्या ऐकू येण्याच्या क्षमतेवर कायमचा परिणाम होऊ शकतो. तुम्हाला कमी ऐकू येऊ शकतं.

  • कानात सतत इअरफोन्स घातल्याने कानाच्या आतला भाग दमट राहतो. कारण तिथे हवा पोचून तो कोरडा होत नाही. अशा दमट वातावरणात जंतूंची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे कानात जंतुसंसर्ग होऊ शकतो.
  • सतत इअरफोन्स वापरल्यामुळे कानातला मळ सतत आत ढकलला जाऊ शकतो.
  • जास्त वेळ इअरफोन्स वापरल्यामुळे कान दुखू शकतो.

इयरफोन्स वापरतांना काय काळजी घ्यायची?

  • इअरफोन्स सतत कानात ठेऊ नका. थोड्या थोड्या वेळाने ते बाहेर काढा.
  • मोठ्या आवाजात गाणी किंवा इतर काही ऐकू नका.
  • एकमेकांचे इअरफोन्स वापरू नका.
  • इअरफोन्स दर आठवड्याला स्वच्छ करा. महिन्यातून एखाद्या वेळी सॅनिटाईझ करा.
  • इअरफोन्स कानात घट्ट बसवू नका. हलक्या हाताने कानात घाला.

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact