
Image:.freepik
खरं म्हणजे मैत्री ही शाळेतली सगळ्यात भारी गोष्ट असते. आणि मित्र किंवा मैत्रीण हे जगातले सगळ्यात भारी लोक असतात. पण तरीही, या जगातल्या सगळ्यात भारी लोकांमुळे आपल्याला जगात सगळ्यात जास्त त्रास होऊ शकतो. तुम्ही म्हणाल की हे अशक्य आहे. आमचे मित्रमैत्रिणी आम्हाला कधी त्रास देऊच शकत नाहीत. ते चांगले आहेत.
तर हो, ते चांगलेच आहेत आणि तुम्ही पण चांगलेच आहात, आणि तुमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला त्रास देतील असा विषयच नाहीये. विषय असा आहे की त्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कसा?
तर असा विचार करा, की समजा, तुमच्या मित्राच्या गल्लीत शेजारच्या गल्लीबरोबर क्रिकेटची मॅच आहे. तुमची आणि तुमच्या मित्राची ओपनिंग बॅट्समन म्हणून शाळेतली एकदम हिट जोडी आहे. त्याच्या गल्लीत पण तुम्ही नेहेमीच खेळायला जाता. त्यामुळे तुम्ही दोघं या मॅचमध्ये ओपनिंग बॅट्समन असणार असं तुम्ही गृहीत धरून चालता. पण प्रत्यक्षात जर का त्याने तुम्हाला टीममध्ये घेतलंच नाही तर? किंवा तुमच्या गल्लीत मॅच असतांना तुमच्या बाजूने खेळण्याच्या ऐवजी तुमचा मित्र समोरच्या टीममधील त्याच्या मित्राकडून खेळला तर? किती संताप होईल तुमचा?
हेही वाचा!
एखाद्या मैत्रिणीला छान मेंदी काढता येते त्यामुळे ती तुम्हाला नेहमीच मेंदी काढून देते. पण समजा तुमच्या घरी अगदी जवळच्या नात्यात लग्न असतांना तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला मेंदी काढून दिलीच नाही आणि त्याऐवजी ती तिच्या दुसऱ्याच एखाद्या मैत्रिणीकडे गेली तर? किती चिडचिड होईल तुमची?
अगदी आपल्या जवळचे मित्रमैत्रिणी आपल्या शेजारी न बसता दुसऱ्या कोणाच्या शेजारी बसले, दुसऱ्या मित्राबरोबर घरी गेले तरी आपल्याला किती त्रास होतो? हा त्रास का होतो माहितीये? कारण आपण आपल्या मित्रांवर किंवा मैत्रिणींवर हक्क गाजवायला लागलेले असतो. आपल्या मित्राने आपण म्हणू तसंच वागावं असं आपल्याला वाटायला लागलेलं असतं. आणि मग ते जरा वेगळे वागले की आपल्याला लगेच राग येतो, रडू येतं, आता आपली मैत्री संपली असं वाटायला लागतं. आणि मग त्या वाटण्याचा आपल्याला त्रास होतो. पण खरं बघितलं तर अशी सहज मैत्री संपते का?
मैत्री पक्की कशी होईल?
आपल्या मित्राने किंवा मैत्रिणीने इतर कोणाशीही मैत्री केल्याने आपली मैत्री संपत नाही. पण जर का आपण आपल्या मित्रावर किंवा मैत्रिणीवर "माझी खरी मैत्रीण असलीस तर इतर कोणाशी बोलू नकोस" असा दबाव टाकत असलो, तर मात्र आपल्या मैत्रीत भांडण होऊ शकतं. कारण "मी कसं वागायचं" हे दुसऱ्या कोणी ठरवलेलं कोणालाच आवडत नाही. मग ते तुमच्या मित्राला तरी कसं आवडेल? आणि त्याला जवळ धरून ठेवण्याच्या नादातच तो तुमच्यापासून दूर जाईल.
त्यापेक्षा तुमच्या मित्रमैत्रिणींना मोकळं सोडा, त्यांना पाहिजे त्यांच्याबरोबर खेळू द्या, राहू द्या. असं वागल्याने तुमच्या मित्राशी असलेली तुमची मैत्री अधिक पक्की होईल.

Image: .freepik
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact