-डॉ वैशाली देशमुख
(लेखातील सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत.)

रात्रीचे दहा वाजले होते. राजू अभ्यास करायचा प्रयत्न करत होता. पण त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. तेव्हढयात बाबा आले. ‘राजू, झोप आता. उद्या परीक्षा आहे ना? सकाळी लवकर उठायचंय. झाला का अभ्यास?’ राजू म्हणाला, ‘अं, हो, झाला. झोपतो.’ ‘बरं’ असं म्हणून बाबा गेले. राजूच्या डोक्यात मात्र सगळा गोंधळ चालू होता. त्याला वाईट वाटत होतं की आपण अभ्यास झाला असं बाबांना खोटं सांगितलं. खरंतर त्याचा काही अभ्यास झाला नव्हता. त्याला खूप भीती वाटायला लागली होती आता. पुस्तक उघडलं की त्याला त्यात सारखा वर्गातल्या रश्मीचा चेहरा दिसायचा. तिचं हसणं आठवायचं. तसा तर तो तिच्याशी फारसा बोललाही नव्हता. पण सारखा तिचा विचार मनात येत होता. आणि मग काहीच डोक्यात शिरत नव्हतं.
दुसऱ्या दिवशी राजू परीक्षेला गेला आणि कसाबसा पेपर लिहून परत आला. लिहिताना त्यानं हळूच रश्मीकडे पाहिलं. ती भराभरा, मनापासून लिहीत होती. राजूच्या मनात काय चालू आहे याचा तिला पत्ताच नव्हता.
हेही वाचा…
सहामाही परीक्षेचा अभ्यास करताना लक्षात ठेवा फक्त २ गोष्टी .. पेपर सोपे जाणारच!
राजूसारखी परिस्थिती खूप जणांची असते. परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास करायला हवा हे त्यांना कळत असतं, पण या आगंतुक विचारांचं काय करायचं? बरं ते हवेहवेसे तर वाटतायत. तुमच्या वयात मेंदूत आणि शरीरात जे बदल होताहेत, त्यामुळे हे घडतंय. एखाद्या व्यक्तीबद्दल जबरदस्त आकर्षण वाटणं हा याचाच भाग आहे. हे आकर्षण इतकं जोमदार असतं की कितीही प्रयत्न केले तरी त्या विचारांवर ताबा ठेवणं कठीण जातं.
तुम्हांला प्रश्न पडला असेल की मग काहीच करता येणार नाही का? येईल ना, जिथे जिथे प्रश्न असतो, तिथे काही ना काही उत्तर असतंच. एक म्हणजे परीक्षेच्या फक्त आदल्या दिवशी तयारी करायची असते हे मनातून काढून टाकूया. रोज थोडा थोडा अभ्यास केला की ऐनवेळी टेन्शन येत नाही. दुसरं म्हणजे मनात एखादी काल्पनिक पेटी आणा आणि त्यात हे विचार एखाद्या मखमली गादीवर ठेवून पेटीला कुलूप लावा. परीक्षा झाल्यावर आपण हे हवेहवेसे विचार पुन्हा घेणार आहोत हे स्वत:ला सांगा. तरीही चुकार विचार यायचा प्रयत्न करतीलच. अशावेळी डोकं झटकणे, जागा बदलणे, पाणी पिणे, वाचत असाल तर लिहायला सुरुवात करणे आणि इतर लोक असतील अशा ठिकाणी अभ्यासाला बसणे अशा काही गोष्टी तुमचं मन जाग्यावर आणायला मदत करतील. ऑल द बेस्ट!
(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)
vrdesh06@gmail.com
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


