लहान मुलांना माहितीये, पण मोठ्या माणसांना माहिती नाही असं सिक्रेट कोणतं?

“मी पुन्हा तिच्याशी कध्धीच बोलणार नाहीये!”

असं तुम्ही कधी म्हटलायत का? म्हणजे एखाद्या मैत्रिणीशी इतकं डेंजर भांडण होतं, की पुन्हा आपल्याला अक्षरशः तिचं तोंडसुद्धा बघावंसं वाटत नाही. असं कधी झालंय का? त्यामागे कारण काहीही असू शकतं.

मित्राने आपल्याशी गद्दारी केली. म्हणजे आपला मित्र असूनसुद्धा आपलं नाव टीचरना सांगितलं. किंवा मैत्रीण आपल्याला सोडून दुसऱ्याच कोणाशीतरी खूप वेळ बोलत बसली. किंवा आपला गृहपाठ राहिलेला असतांना आपण मित्राकडे वही मागितली, त्याने दिली नाही म्हणून आपल्याला शिक्षा झाली. किंवा मैत्रिणीने आपल्यामागे आपल्याबद्दल कोणालातरी वाईट काहीतरी सांगितलं… आपल्याबद्दल गॉसिप केलं. किंवा आपल्या मैत्रिणीने आपल्याला तिच्या वाढदिवसाला बोलावलंच नाही. किंवा मित्राने आपल्याला कबूल केलेली गिन्नी दुसऱ्याच कोणालातरी देऊन टाकली…

या किंवा यासारख्या कुठल्याही कारणाने तुमचं तुमच्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी भांडण झालं आहे का कधी? म्हणजे खरं तर किती वेळा झालंय असं विचारायला पाहिजे. कारण मैत्री म्हटलं की भांडण आलंच! तुम्हाला हे कदाचित पटणार नाही, पण ज्यांच्यात आजवर एकदाही भांडण झालेलं नाही असे मित्रमैत्रिणी नसतातच. काही जण कधीतरीच भांडतात आणि काहीजण सारखे सारखे भांडतात. पण त्यावरून काही कोणी मैत्री तोडत नाही. तशी ती तोडायचीही नसते. आणि खरं म्हणजे मित्रावर किंवा मैत्रिणीवर कितीही चिडलात तरी तुम्ही ती मैत्री तोडणार नसता, बरोबर ना?

हेही वाचा!

आपल्या मनातली सिक्रेटस आपल्या मित्र मैत्रिणींशी शेअर करावीत का?

कारण एखाद्या वेळी जरी भांडण झालं, तरी एरवी आपल्याला त्या मित्राइतकं किंवा त्या मैत्रिणीइतकं कोणीही जवळचं नसतं. आणि त्यामुळेच तुम्ही कितीही भांडलात, तोंड फिरवून निघून गेलात, तरी तुमचा मित्र किंवा मैत्रीण दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या नेहेमीच्या ठरलेल्या ठिकाणी भेटतो म्हणजे भेटतोच. मग त्याची किंवा तिची चूक असो नाहीतर नसो. आईकडून डब्यात तुमच्या आवडीचा खाऊ घेऊन किंवा साचवलेल्या पैशातून अर्धं अर्धं करून खायला चॉकलेट घेऊन तुमचा मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला भेटते आणि मग तुम्ही दोघंही असे एकमेकांशी बोलता की जसं काही तुम्ही कधी भांडलाच नव्हता.

आणि या भांडणातली सगळ्यात मोठी गंमत काय आहे माहितीये? इतकं मोठं भांडण इतक्या लगेच मिटवायचं कसं हे सिक्रेट फक्त लहान मुलांनाच माहिती असतं. त्यामुळे ते भांडण कसं मिटवायचं हे सिक्रेट मी तुम्हाला सांगणार नाहीये, कारण तुम्हाला तर ते माहितीच आहे. जमलं तर तुम्हीच तुमच्या आजूबाजूच्या मोठ्या माणसांना ते शिकवा… 

आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा...  तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..

व्हाॅट्सॲप मेसेज करा  : ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact