उज्जीचे खेळ
- उज्ज्वला बर्वे

काल मुलांची क्रिकेटची मॅच होती. त्यामुळे त्यांच्या घरातलं कुणी ना कुणी मॅच बघायला आलं होतं. मुलांनी मोठ्या उत्साहाने आमची ओळख करून दिली.
“ही आमची उज्जी, ही माझी आई”,
“उज्जी, माझा बाबा आलाय”
बोलताबोलता आमच्या खेळांचा विषय निघाला. अचानक अनीहा ओरडली, 'उज्जी आज यांचे खेळ घे.' सगळ्यांनी तिची री ओढली. मग घेतला छोट्या-मोठ्यांचा एक खेळ.
'असं करू या. मी एकेका मुलाला प्रश्न विचारीन. त्याचं उत्तर एखादा मराठी शब्द असेल. त्याच्या घरातल्या व्यक्तीने लगेच त्या शब्दाचा एक मराठी समानार्थी शब्द सांगायचा. जास्त जमले तर जास्त चांगलं.'- मी म्हणाले.
त्यावर 'आई, नीट लक्ष दे.' 'आजी तुला ऐकायला येईल ना?', 'बाबा, फोन बाजूला ठेव' वगैरे सूचना ऐकायला यायला लागल्या.
पहिला प्रश्न मायराला विचारला, 'भू भू असं कोण ओरडतं'
मायरा म्हणाली, 'कुत्रा. आई तू सांग आता. लवकर लवकर.'
तिची आई म्हणाली, 'हो गं, श्वान.'
इतकं पटकन उत्तर आल्यावर बाकीचे सरसावून बसले.
'सुमेश, पक्षी कुठे उडतात?'
सुमेश म्हणाला,'आकाशात. बाबा समानार्थी शब्द सांग पटकन'
हेही वाचा!
शब्द सारखे पण अर्थ वेगळा.. शब्दांचा असा खेळ खेळून तर पाहा!
'अं...बाप रे...' सुमेश रडायच्या बेतात होता तेवढ्यात बाबा म्हणाले, 'नभ.'
'आर्यांश, कोणत्या प्राण्याला सोंड असते?'
आर्यांश म्हणाला, 'हत्ती.' तो हत्ती म्हणतोय तोवर त्याची आजी म्हणाली 'गज'. आर्यांशची कॉलर एकदम ताठ.
'रियांश, आकाशातून जे पाणी पडतं त्याला काय म्हणतात?'
रियांशला पटकन उत्तर सुचलं. तो म्हणाला,'अं... पाऊस. आजोबा, तुमची टर्न. पावसाला आणखी एक शब्द सांगा.'
त्याच्या आजोबांचं आधी लक्ष नव्हतं. रियांशने दोनदा सांगितल्यावर मात्र ते म्हणाले, 'पर्जन्य.'
'प्रणव, कर्वे, लक्ष्मी, पौड, बाजीराव ही कशाची नावं आहेत?'
- माझा प्रश्न ऐकून प्रणव आधी जरा गोँधळला. मग ओरडला, “रस्त्यांची! आता आईने रस्त्याला शब्द सांगायचा ना?'
प्रणवची आई पटकन म्हणाली, 'रोड'. प्रणवला राग आलेला तिच्या लक्षात आलं. जरा विचार करून म्हणाली, 'मार्ग.'
मोठ्यांनी इज्जत राखली म्हणून छोट्यांना आनंद झाला. छोटे असे खेळ खेळतात म्हणून मोठ्यांना बरं वाटलं. ते बघून मी खुश.
ujjwalabarve@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


