शब्द सारखे पण अर्थ वेगळा.. शब्दांचा असा खेळ खेळून तर पाहा!

-उज्ज्वला बर्वे,
माध्यम अभ्यासक

Image: sayali Bhagali-Damale

 

 

सगळे बाकाभोवती जमल्यावर मायरा आली आणि म्हणाली, “उज्जी, फूल!”आणि तिने माझ्या हातात एक छोटंसं फूल ठेवलं. आर्यांश ओरडला, “ए, उज्जीला फूल म्हणतेस. तू फार शहाणी आहेस वाटतं.” सगळे हसायला लागले. मायरा रडवेली झाली. शांभवी मायराला म्हणाली, “इंग्लिशमध्ये फूल म्हणजे वेडी. सेम शब्द आहे ना म्हणून मज्जा करतोय तुझी.”
यावर गप्प बसेल तर तो प्रणव कसला? “खरं तर सेम नाहीये बरं का. मराठीत फूल दोन्ही ओठांनी म्हणतात, इंग्लिशमध्ये वरचे दात आणि खालचा ओठ वापरून.”
“एवढा कुणी विचार करत नाही बरं का!” आर्यांशचा जोक प्रणवनं बिघडवला म्हणून भांडण सुरू व्हायच्या आत मला मधे पडणं भाग होतं.
त्यांना सांगितलं, “मराठी आणि इंग्रजीत तोच शब्द म्हणतो, पण त्यांचा अर्थ वेगळा असतो अशा जोड्या सांगा बरं. शब्दांचे अर्थदेखील सांगायचे हं. एक मिनिट देते विचार करायला. चारपाच शब्द आठवून ठेवा, कारण तुमच्या मनातला शब्द आधी सांगितला असेल तर वेगळा सांगायचा.”

हेही वाचा!

सुटी हा शब्द ऐकल्यावर तुमच्या डोक्यात काय काय येतं? खेळून तर पहा!

खूप विचार करत असल्याचा आव आणत सगळे मिनिटभर सगळे शांत बसले. मग गाडी अशी सुसाट सुटली की काही विचारू नका. अर्थ सांगताना हिंदी, इंग्रजी, मराठी, हातवारे सगळी सरमिसळ झाली. थोडी भांडाभांडी झाली. काही जोड्या चुकून बरोबर निघाल्या तेव्हा त्या शब्दांचे अर्थ मी सांगितले. बघता बघता चाळीसपन्नास शब्द आठवले.
गोल, टेक, पूल, फेस, गाय, पोल, मोड, बस, केस, नेक, सोल... असा आरडाओरडा सुरू होता तोवर प्रणवने त्यात थोडा बदल सुचवला, “मराठी ‘आ’चं ‘ॲ’ किंवा ‘ऑ’सुद्धा खरं तर चालायला पाहिजे. कान आणि कॅन, पान आणि पॅन…”
“तुला डिट्टो सेम आठवत नसतील, पण आम्हाला खूप आठवतायत” असं म्हणून गाडी पुन्हा बोट, कोट, दे, शेक, लेक... वर आली.

ujjwalabarve@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact