उज्जीचे खेळ
- उज्ज्वला बर्वे
माध्यम अभ्यासक

आमच्या सोसायटीतल्या मुलांनी माझं नाव ठेवलं‘उज्जी’ आणि मग आमची एकदम दोस्तीच होऊन गेली. संध्याकाळी त्यांचा खेळ झाला की माझ्या बाकाजवळ सगळ्यांनी जमायचं, जागा मिळेल तिथे बसायचं- माझ्या शेजारी, मांडीवर, जमिनीवर, बाकाच्या हातांवर. मग आमच्या गप्पा सुरू. गप्पा कसल्या- बडबड. मी 'असं बोलूया का? तसं करू या का?' असं विचारायचं आणि पोरांनी 'होsss' म्हणायचं. तीन वर्षांची मायरादेखील त्यांच्यात लुडबुड करायची.
काल मुलं बाकाजवळ आली तेव्हा मी मायराला विचारलं, 'मगाशी रडत का होतीस?'
ती म्हणाली, 'माझी पच्चल हवरली होती'.
मी पटकन विचारलं, 'पासडली का?' उज्जीदेखील मायरासारखं बोलतीये हे ऐकून पोरं खिदीखिदी हसायला लागली. मग काय, आम्हाला नवा उद्योग मिळाला.
मी मुलांना विचारलं, 'तुम्ही अशी शब्दांची अदलाबदल करून एकेक वाक्य तयार करा. बघू इतरांना ओळखता येतंय का!'
हेही वाचा!
दोन शब्द एकत्र करा आणि एक नवीन शब्द बनवा! हा खेळ कसा खेळायचा?
'पहिलं-दुसरं बदलायचं की दुसरं-तिसरं?'- प्रणवची शंका.
'आधी कसंही करा. मग बनवू नियम. केलेलं वाक्य ओळखायचं बरं का. नुसतं बडबडत नाही बसायचं.'
'बातडबोत रकतो.'- प्रणवचं पहिलं वाक्य आलं.
अनीहा- हा सगळंच ताबडतोब करतो. पण रक्तो म्हणजे रक्त म्हणल्यासारखं वाटतंय. मी सांगते चांगलं. विनाम ऑलडेरी उरतलं.
रियांश- फुस्स. विमान ऑलरेडी उतरलं. पण मला काही सुचत नाहीये.
मी- तोवर मी सांगते. गदड कोड्यावर डपला.
आर्यांश- दगड कोड्यावर पडला.
शांभवी- कोड्यावर नाही, डोक्यावर... तुझ्याच पडला वाटतं. आता माझं वाक्य- आबोजांनी पकटन घबितलं.
मायरा- आबोजा नाही- आजोबा.
शांभवी- कळलं. तुझी पच्चल सांभाळ, नाहीतर हवरेल पुन्हा. आजोबांनी पटकन बघितलं.
सुमेश- मला भारी सुचलंय वाक्य- रिवाट होकली गांचला ळेखतो.
रियांश एकदम ओरडला- विराट कोहली चांगला खेळतो. माझं ओळखा- मला मोकेपॉन, मोरेडॉन आणि रानूतो आडवतात.
प्रणव- कुणी तुला अडवत नाहीये. जा तू.
मी- मला कोमेपॉन, रोमेडॉन आणि नूरातो आवडतात.
उज्जीला साधे पोकेमॉन, डोरेमॉन आणि नारूतो माहीत नाहीत! असं म्हणून पोरं अशी दखादखा सहायला लागली की आचाम गसळा ळेख गलेच पंसून गेला.
ujjwalabarve@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


