
विमानात बसायाला किती मज्जा येते ना. मोठी माणसंसुध्दा लहान मुलांप्रमाणे विमानात बसायला अतिशय उत्सुक असतात. विमानाने प्रवास करायचा म्हणजे आधी विमानतळावर यावं लागतं. मोठंच्या मोठं विमानतळ बघितलं की पहिले काही सूचतच नाही. विमानतळावरील तिकिटाशी निगडित सर्व कामं संपली की विमानात बसण्याची ओढ लागते. विमानतळावर अनेकदा दोन तासांपेक्षा जास्त वेळ बसावं लागतं. विमानाने होणारे छोटे छोटे प्रवास तर काही मिनिटांचे किंवा काही तासांचे असतात. पण आपल्याला विमानतळापेक्षा विमानच जास्त लक्षात राहातं. पण जपानमधील नोटो विमानतळाच्या बाबतीत मात्रं असं होणार नाही. विमानात बसण्यापेक्षाही येथील विमानतळावर येणं, ते पाहाणं हा कौतुकाचा आणि कुतुहलाचा विषय असणर आहे. कारण या विमानतळावर एक गंमत आहे.
हेही वाचा!
मानवावर मात करुन रोबोटने विक्रमी वेळेत हाफ मॅरेथाॅन जिंकली!
हे नोटो विमानतळ जपानमधील इशिकावा या प्रांतामधील वाजिमा शहरात आहे. हे विमानतळ २००३ मध्ये उभारलं गेलं. १ जानेवारी २०२४ मध्ये जपानमध्ये मोठा भूकंप झाला. या भूकंपात या विमानतळाचं खूप नुकसान झालं होतं. विमानतळाच्या धावपट्टीला मोठ मोठाले तडे गेले होते . या विमानतळावरच भूकंपामुळे अडकून पडलेल्या बाहेरच्या देशातील प्रवाशांची , रस्तेच नसल्याने पुढे जाण्यासाठी खोळंबलेल्या इतर प्रवाशांसाठी राहण्याची व्यवस्था या विमानतळावरच करण्यात आली होती. त्यामुळे नोटो विमानतळ हे दुरुस्तीसाठी म्हणून बंद करण्यात आले.
या दुरुस्तीदरम्यान धावपट्टीची आणि इतर बाबींची दुरुस्ती करण्यासोबतच पूर्ण विमानतळाचा चेहरामोहराच बदलला गेला. तो बदलताना या विमानतळाला ज्या भूकंपाच्या आठवणी जोडलेल्या होत्या त्या पुसल्या गेल्या. त्या पुसण्यासाठी पोकेमाॅन या कार्टूनची मदत घेण्यात आली. आणि याच कारणामुळे हे विमानतळ आता जगभरात चर्चेचा विषय झालं आहे.

आता या विमानतळाचं नाव नोटो एअरपोर्ट असं नसून 'नोटो साटोयामा पोकेमाॅन विथ यू एयरपोर्ट' असं आहे. या विमानतळावर पोकेमाॅनचे १११ कार्टून कॅरेक्टर्स भेटतात. ते विमानतळावर आलेल्या प्रवाशांची सोबत करतात. संपूर्ण विमानतळाचा आतील परिसर पोकेमाॅन कॅरेक्टर्सने सजलेला आहे. त्यामुळे विमानतळाच्या आत प्रवेश केला की लोकांना आपण विमानाने प्रवास करण्यासाठी विमानतळावर आलोय की पोकेमाॅन कार्टूनच्या जगात आलोय? असा प्रश्न पडतो. विमानतळावर यायला, इथे थांबून विमानाची वाट पाहायला लोकांना फार आवडत आहे. या विमानतळावर फक्त भिंतीवरील चित्रातूनच पोकेमाॅन भेटतो असं नाही तर विमानतळावरील रेस्टाॅरण्टच्या मेन्यूमध्ये पोकेमाॅन थीमचे पदार्थही आहेत. या आगळ्या वेगळ्या विमानतळाचं नुकतंच उद्घाटन झालं. या विमानतळावर प्रवाशांसोबतच इतर नागरिकही मोठ्या प्रमाणावर भेट देतील. यामुळे नोटो प्रदेशाची भूकंपामुळे झालेली हानी भरुन येण्यासही मदत होईल. या विमानतळाच्या उदघाटनानंतर थोड्याच वेळात टोक्योच्या हानेडा विमानतळावरुन उडालेलं विमान या विमानतळावर लॅंड झालं. पायलटचा ड्रेस घातलेल्या पिकाचू कॅरेक्टरने प्रवाशांचं स्वागत केलं. त्यांना नोटो येथील प्रेक्षणीय स्थळांची माहिती सांगणारे ब्रोशर्स आणि स्टिकर्स दिलेत.

नोटोच्या स्थानिक रहिवाशांही विमानतळाचा झालेला बदल पाहून आनंदी झालेले आहेत. पोकेमाॅन कॅरेक्टर्सचं रुप घेतलेल्या या विमानतळाला बघण्यासाठी प्रवाशांना हे विमानतळ आकर्षित करेल. त्यामुळे नोटोचा विकास होण्यास मदत होईल. नोटो पुहा उंच झेप घेईल असा विश्वास तेथील लोकांना वाटतो आहे. जगात नोटोचं हे एकमेव विमानतळ आहे ज्याने आपल्या नावात पोकेमाॅनचा समावेश केलेला आहे. आणि या विमानतळाचं रुपही जगातल्या कोणत्याच विमानतळाचं नसेल इतकं आकर्षित झालं आहे ते या पोकेमाॅनच्या कॅरेक्टर्समुळेच. हे वाचून तुम्हालाही हे पोकेमाॅनचं विमानतळ पाहायची इच्छा झाली ना?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


