
माणसाप्रमाणे काम करणाऱ्या रोबोटचं आपल्याला किती कौतुक वाटतं ना.. हे रोबोट आणखी काय काय करतील याची उत्सुकताही वाटते. तुम्हाला बीजिंगमध्ये मानवी स्पर्धकांना हरवणाऱ्या रोबोटची गोष्ट तर सांगायलाच हवी. तर नुकतीच चीन देशातल्या बीजिंग या राजधानीच्या शहरात बीजिंग हाफ मॅरेथाॅन ही स्पर्धा पार पडली. १२,००० धावपटुंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी खास दोन धावपट्ट्या ( ट्रॅक्स) तयार केल्या होत्या. एक धावपट्टी मानवी धावपटुंसाठी आणि एक धावपट्टी ही ह्यूमनाॅइट (माणसासारख्या) रोबोटसा दिली होती. मानवी स्पर्धक आणि रोबोट हे एकाच वेळी या स्पर्धेत धावणार हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य होतं.
तुम्ही 'हाफ मॅरेथाॅन' या नावावर जाऊ नका. हाफ मॅरेथाॅन म्हणजे छोटी स्पर्धा नसते. चांगली २१ किलोमीटरची स्पर्धा असते. अतिशय अवघड असते ही स्पर्धा. या वर्षी मार्चमधे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जेकब किपलिमो याने हाफ मॅरेथाॅन स्पर्धा ५७ मिनिटं आणि २० सेकंदात पूर्ण केली होती. हा एक विक्रमच होता. मागच्या वर्षीच्या बीजिंग हाफ मॅरेथाॅन या स्पर्धेत पहिल्यांदा ही स्पर्धा मानवी स्पर्धक आनि रोबोटसाठी एकत्र भरवली गेली होती. पण त्या स्पर्धेत अनेक अडथळे आलेत. वेगवान रोबोटनी ही स्पर्धा २ तास ४० मिनिटं ४२ सेकंदात पूर्ण केली. मानवी धावपटुंच्या तुलनेत का कालावधी खूप जास्त होता. पण त्यानंतर एकाच वर्षात चित्र एकदम उलटं झालं. यामागे तंत्रज्ञानाची कमाल होती. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रोबोटमधे खूप बदल आणि सुधारणा केल्या गेल्या. लाइटनिंग नावाच्या रोबोटने ही स्पर्धा फक्त ५० मिनिटं २६ सेकंदात पूर्ण केली. रोबोटने ही स्पर्धा फक्त जिंकली असं नाही तर रोबोटने किपलिमोने केलेला विक्रमही मोडला. नुसता मोडला असं नाही तर त्याच्यापेक्षा रोबोटला स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ७ मिनिटं कमी लागले.
हेही वाचा!
दहा वर्षाची काएला थेट नासालाच प्रश्न विचारते तेव्हा...
या स्पर्धेत टकरा, अपघात टाळण्यासाठी मानवी धावपटू आणि रोबोटस स्वतंत्र ट्रॅकवर धावत होते. पण रोबोटच्या स्वतंत्र ट्रॅकवरही एकमेकांवर न आदळण्याचे आव्हान या स्पर्धेनंतरही कायम आहे.

या स्पर्धेत रोबोटचे दोन गट होते. रोबोटचा एक गट माणसं नियंत्रित करत होते. आणि रोबोटचा दुसरा गट स्वयंशासित होता. म्हणजे ते ऑटोनोमस रोबोट होते. ऑटोनोमस रोबोटस त्यांची स्वत:ची कृत्रिम बुद्धिमत्ता ( आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापरत होते. या रोबोटसना पुढच्या समस्यांही, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची व्यवस्थित जाण होती. पण म्हणजे सर्वच रोबोट हे छान पळालेत असं नाही. काही रोबोटस हे स्पर्धेबाहेर पळाले. काही रोबोटस काही समस्यांमुळे थांबले. जो रोबोट विक्रमी वेळ नोंदवून जिंकला तो रोबोटही एका ठिकाणी पडला होता. पण तो पुन्हा उठला आणि धावू लागला. अशा ४७ रोबोटसनी ही स्पर्धा पूर्ण केली.
या स्पर्धेत अनेक लाइटनिंग रोबोट होते. त्यातील एक रोबोट रिमोट कंट्रोलवर धावणारा रोबोट होता. ज्याने वेळ सेट केलेली होती. या रोबोटने ४८ मिनिटं आणि १९ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. पण प्रत्यक्ष ट्रॅकवर धावतानाचे तंत्र बघून गुण देण्यात आले आणि खास स्वयंशासित लायटनिंग रोबोटच जिंकला.

लायटनिंग रोबोटचं वैशिष्ट्यं तरी काय?
लायटनिंग रोबोटचे पाय लांब असतात. त्यांच्यात थंड करणारी द्रवप्रणाली असते. जी त्यांना अति तापण्यापासून वाचवते. शिवाय त्यांच्यात संतुलन राखण्याची व्यवस्थाही असते. स्वयंशासित लायटनिंग रोबोटच या स्पर्धेत पहिले, दुसरे आणि तिसरे आलेत. हे लायटनिंग रोबोट 'ऑनर' या चायनीज कंपनीने तयार केलेत. ही कंपनी खास फोन तयार करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. ही स्पर्धा म्हणजे चीन रोबोट तंत्रज्ञान तयार करण्यात किती पुढे गेला याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. मागच्या वर्षीच्या स्पर्धेच्या तुलनेत रोबोटने असामान्य कामगिरी केली. ती पाहून आता तज्ज्ञ मंडळी रोबोट भविष्यात आणखी काय करतील याचा अंदाज बांधायला लागली आहेत.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


