संकटात सापडलेल्या जंगलाला शाळेत जाणाऱ्या नेत्राने वाचवले!ते कसे?

Image: linkedin

जगभरात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कारणांनी जंगल नष्ट होत आहेत. जंगल नष्ट करुन त्या जागेवर उद्योग वसवण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण करायचं असेल तर आपली जंगलं वाचायला हवीत. पण ती वाचवणार कोण आणि कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर नेत्रा पुरुषोत्तमन या १५ वर्षांच्या मुलीकडे आहे. ती म्हणते, 'आवाज उठवा, विरोध करा आणि जंगलाचं रक्षण करा!' हे तिचं वाक्य पुस्तकी नाही. कोणाकडून तरी ऐकलं आणि मग जगाला सांगितलं असंही नाही. तर आधी तिने हे करुन दाखवले आहे. तिच्या विरोधाच्या बळावर तिने जंगल वाचवून दाखवलं आहे.

अमेरिकेतल्या व्हर्जिनिया येथील हेरन्डन हे एक शहर. या शहरात नेत्रा राहाते. प्रिन्स जाॅर्ज परगाण्यातील मार्ल्टन जंगल वाचवण्यात नेत्राने पुढाकार घेतला होता. त्यासाठी तिला आपल्याच ' गर्ल्स स्काउटस काॅन्सिलविरुध्द एक याचिका दाखल करायला लागली.  या काॅन्सिलनं मार्ल्टन जंगलातील शेकडो एकर जमीन विकासकांना विकण्याचे ठरवले होते. काॅन्सिलच्या या निर्णयामुळे नवीन प्रकल्प जरी उभे राहणार असले तरी जंगलाचं मात्र मोठं नुकसान होणार होतं. ते  वाचवण्यासाठी नेत्राने २०२२मध्ये एक ऑनलाइन याचिका दाखल केली.  तिने जंगल वाचवणं किती महत्त्वाचं आहे हे लोकांना पटवून दिलं आणि त्यातूनच या याचिकेवर ३५०० लोकांनी स्वाक्षऱ्या करुन जंगल वाचवण्याच्या मोहिमेला पाठिंबा दिला.

हेही वाचा!

विकासकांना मार्ल्टन जंगलाची जमीन विकून जे पैसे येणार होते त्या पैशातून व्हीलचेअरवरील मुलींसाठी कॅम्पिंगच्या सुविधा, मेंदूशी संबंधित वेगवेगळ्या विकृती असणाऱ्यांसाठी शिबीरं घेणाऱ्यांना साधनं आणि शिष्यवृत्ती दिली जाणार होती. हे जंगल गिर्यारोहक, डोंगरातील दुचाकीस्वार, घोडेस्वार, पक्षीनिरिक्षक यांच्यासाठी मुक्कामाचं ठिकाण होणार होतं. पण हे सगळं करण्यासाठी जंगलाचा जात असलेला बळी मात्र नेत्राला मान्य नव्हता. त्यामुळे तिने आपण किती लहान किती मोठे याचा विचार न करता जंगल विकलं जावू नये यासाठी आवाज उठवला. या कृतीने नेत्रा आणि तिच्या मैत्रिणींना आपल्या योग्य मागण्यांसाठी आवाज कसा उठवायचा, लोकांचा दबाव कसा निर्माण करायचा आणि चांगल्या कामाला पुढे घेवून जाणारा नेता कसा तयार करायचा हे शिकवलं.

नेत्रा म्हणते, 'तुम्ही काय म्हणता, काय करता हे महत्त्वाचे. आणि त्यासाठी जेव्हा तुम्ही सतत प्रयत्न करता तेव्हाच गोष्टी शक्य होतात. त्यासाठी तुम्हाला आवाज उठवावा लागतो, बोलावं लागतं आणि ज्यांच्या हातात निर्णय घेण्याचे अधिकार असतात ते आपलं ऐकतील अशी कृती करावी लागते.'

सिबुला या गर्ल्स स्काउट्स नेशन्स कॅपिटलच्या कृती अधिकारी. जंगलाचा शेकडो एकर भाग विकण्याचा निर्णय त्यांच्याच नेतृत्वाखाली घेतला गेला होता. नेत्राच्या याचिकेने आणि त्यातून तयार झालेल्या विरोधाने सिबुला यांनी आपला निर्णय बदलला आणि ती जमीन जंगलाचं संवर्धन करणाऱ्या समुहाला विकण्याचे ठरवले. सिबुला आणि संस्थेला नेत्राच्या भूमिकेचं खूप कौतुक वाटलं. गर्ल्स स्काउट उपक्रमाने मुलींना धाडसी बनवलं हेच नेत्राने मार्ल्टन जंगल वाचवण्यासाठी घेतलेल्या पुढाकारातून दिसून येतं. लहान वयातही समुहात बदल करण्याची क्षमता मुलींमध्ये असते हे नेत्राने दाखवून दिलं आहे. 

Image: washingtonpost


काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact