
Image: amarujala
'निसर्गाची खरी मैत्रीण' ही ओळख कोण्या मोठ्या मुलीची नाही. ही ओळख आहे एका १० वर्षाच्या मुलीची. ईहा दीक्षित तिचं नाव. ही ओळख निर्माण झाली ती तिच्या एका हट्टातून. ती फक्त ४ वर्षांची होती तेव्हा तिने आई बाबांकडे ' मला बागेत रोप लावायचं' असा हट्ट धरला. तिच्या आई बाबांनी सुरुवातीला तिचा हा हट्ट इतका मनावर घेतला नाही. लहान आहे म्हणून उगाच काही हट्ट करते असं वाटलं त्यांना. पण ईहाने काही रोप लावण्याचा तिचा हट्ट सोडला नाही. मग काय आई बाबांना तिचा हा हट्ट पुरवावाच लागला. ईहाने मग आई बाबांसोबत घराच्या बाहेरील बागेत लिंबाचं रोप लावलं. आता हे लिंबाचं झाड तिच्यासोबतच मोठं होतं आहे. पण एक रोप लावून काही ईहाचा हट्ट पूर्ण होणारा नव्हता. ती आई बाबांकडे रोज रोप लावण्याचा हट्ट करु लागली. तेव्हा त्यांना ईहाच्या या हट्टातला वेगळेपणा समजला. ईहाने कार्टूनमध्ये बघितलं होतं, झाडं लावल्याने पृथ्वीवर प्रदूषण कमी होतं, झाडं लावल्याने पृथ्वीचं आयुष्य वाढतं. मग हे पाहून ईहालाही आपण रोज झाड लावायला हवं असं वाटू लागलं आणि ती आई बाबांकडे झाडं लावण्याचा हट्ट धरु लागली.
हेही वाचा!
वयाने लहान असली तरी ईहा झाडं लावण्याच्या बाबतीत खूपच गंभीर होती. तिच्या मनात एकदा का एखादी गोष्ट आली की ती केल्याशिवाय तिला चैनच पडायची नाही. झाडं लावण्याच्या बाबतीत छोटीशी ईहा फारच आग्रही होती आणि ती असा हट्ट करत होती जो तिच्याच नाही तर सगळ्यांच्या आणि निसर्गाच्या फायद्याचा होता. ती झाडं लावण्यासाठी करत असलेला हट्ट तिचे आई बाबा डावलू शकत नव्हते. ईहामुळे दर रविवार हा झाडं लावण्याचा वार ठरला. दर रविवारी आपल्या घराच्या बागेत किंवा आसपासच्या मोकळ्या जागेत ईहा आई बाबांसोबत झाडं लावू लागली.
उत्तर प्रदेशातील मीरत शहरात राहणाऱ्या ईहाने आपला पाचवा वाढदिवस १००८ रोपं लावून साजरा केला. मीरत येथील मेडिकल काॅलेजमध्ये छोट्याशा ईहाने १००८ झाडं लावली. एक झाड ते १००८ झाडं हा प्रवास ईहाने अवघ्या एका वर्षात केला होता सहाव्या वाढदिवसाला तिने एका दिवसात मीरत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी २,५०० रोपं लावली. झाडं लावणाऱ्या ईहाकडे आधी मोठी माणसं, लहान मुलं, तरुण मुलं मुली मोठ्या कौतुकाने बघायचे. पण ईहा करते तर मग आपणही करावं म्हणून तिच्या सोबत इतर मुलं मुली, लहान मोठी माणसं झाडं लावू लागली. ईहाच्या या आवडीचं रुपांतर 'ग्रीन ईहा स्माइल क्लब'मध्ये झालं. २०१८ मध्ये सुरु केलेल्या या क्लबची सर्व जबाबदारी ईहानेच उचलली आहे. या क्लबद्वारे ईहा मीरत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दर रविवारी १० झाडं लावते. गेल्या पाच वर्षात ईहाने इतर लोकांनाही प्रेरित करुन मीरत शहरासोबतच भारतातल्या विविध ठिकाणी मिळून एकूण १२ हजार रोपं लावली आहेत.

Image: sundayguardianlive

Image: amarujala
आता या क्लबसोबतच ईहाने तिच्या घरी 'ईहा प्लॅण्ट बॅंक' सुरु केली आहे. या बॅंकेत लोकांनी रोपं द्यावीत यासाठी तिने लोकांना आव्हान केलं. मीरतमधील लोकांनीही तिच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्लॅण्ट बॅंकेसाठी रोपं दिली. आणि ज्यांना झाडं लावण्याची आवड आहे, ज्यांना झाडं लावायची आहे त्यांना ईहा आपल्या या प्लॅण्ट बॅंकेतून मोफत रोपं देते. घरात खाल्ल्या जाणाऱ्या कोणत्याही फळाची बी ईहा कचऱ्यात फेकू द्त नाही. या बिया लावण्यासाठी ती जपून ठेवते. प्लॅण्ट बॅंकेसोबत ईहाने स्वत:ची सीड बॅंकही तयार केली आहे.
हेही वाचा!
झाडांवर मनापासून प्रेम करणाऱ्या ईहाच्या कामाचं कौतुक देशभरातून होवू लागलं. या कामासाठी वयाच्या सहाव्या वर्षी तिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तिला राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाला. झाडं लावण्याच्या बाबतीत देशभरात आपली ओळख निर्माण करणारी ईहा अभ्यासातही खूप हुशार आहे. तिने इंग्रजी, गणित या विषयात आतापर्यंत अनेक बक्षिसं मिळवली आहेत. तिला मोठं होवून पर्यवरणाशी निगडित अनेक कामं करायची आहे. त्या कामासाठीचा पाया तिने लहान वयातच पक्का केला आहे. झाडं लावून निसर्गाची मैत्रिण झालेल्या ईहाला अजून खूप काम करण्याची इच्छा आहे. ही तिची इच्छाही आपल्या झाडं लावण्याच्या हट्टाप्रमाणे ती नक्की पूर्ण करेल.

Image: jagran.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact