बाय बाय करा पण हाताने नाही पायाने ! पण असं उलटं कशाला?

तुम्ही मित्र-मैत्रिणी एकत्र आले की कशी धम्माल करता ना? गप्पा मारताना किती वेळ निघून जातो, हे कळतच नाही. मग तुम्ही शाळेत असा, क्लासला असा किंवा घरी. कुठेही असलो तरी आपलं मित्र-मैत्रिणींचं टोळकं जिथेतिथे खुसफुस करत असतंच. मला माहीत आहे, शाळेत टिचर शिकवत असतानाही बऱ्याचदा तुमच्या गप्पा सुरू असतात ते! टिचरची पाठ वळली रे वळली, त्यांचं लक्ष दुसरीकडे किंवा फळ्यावर काही लिहायला घेतलं की लगेच तेवढ्या वेळात तुम्ही डोळ्यांच्या इशाऱ्यांनी म्हणा, हावभाव करून म्हणा, किंवा कुजबुजत का होईना, तुम्ही लगेच गप्पा मारून घेताच!
आणि थोड्या वेळासाठी का होईना, टाटाऽऽ बाय बायऽऽ करायची वेळ आली की तुम्हाला किती वाईट वाटतं ना?
हो, मला माहीत आहे ते.
पण आज तोच व्यायाम मी तुम्हाला शिकवणार आहे. टाटा, बाय बाय कसं करायचं ते!
नाही, तुमच्या मित्र-मैत्रिणींना नाही टाटा करायचा. ते आता आपल्या जवळ आहेतच कुठे, टाटा करायला!
पण आजच्या व्यायामात एक गंमत आहे. आपल्याला  टाटा करायचाय, पण तो हातानं नाही, पायानं!

हेही वाचा!

पायाचा १८० अंशाचा कोन करुन त्या स्थितीत शांत बसायचं. कसं शक्य आहे?

काय करायचं?

image : verywell

1. झोपा एका कुशीवर. हात डोक्याखाली घ्या.
2. अरे, सांगितलं, म्हणून काय लगेच खरोखर नाही झोपायचं!  टीव्ही पाहाताना काही वेळा तुम्ही सोफ्यावर बसल्या बसल्या झोपता किंवा झोपल्या झोपल्या बसता तसं. हां, बरोब्बर. चित्रात मी झोपलेय ना, तस्संच.
3. दुसरा हातानं जमिनीचा आधार घ्या. आता हळूहळू उचला वरचा पाय. जास्त ताण द्यायचा नाही, पण दोन्ही पायातला कोन नव्वद अंशाचा झाला तर चांगलं.
4. काही सेकंद थांबा. या पायानं टाटा करा. नंतर दुसऱ्या पायानं तसंच..
5. यामुळे तुमच्या पायाच्या, मांड्यांच्या मसल्समध्ये ताकद येईल आणि मुख्य म्हणजे बसून बसून तुमचं आळसावलेलं ‘ढू’ही फ्रेश होईल!

- तुमची ‘टाटा करो’ मैत्रीण,
ऊर्जा

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact