ब्रॅकन गुहेत राहातात २ कोटी वटवाघळं. या गुहेत काय घडतं?

 Image: in.hotels.com

तुम्हाला ब्रॅकन केव्ह माहिती आहे का? ही फार जगप्रासिध्द आणि विशिष्ट जागा आहे. ही आहे वटवाघळांची गुहा. आतापर्यंत आपण वाघ-सिंहाची गुहा ऐकत आलोय.. ही वटवाघळांची गुहा हा काय प्रकार आहे? ही गुहा म्हणजे मेक्सिकन फ्री टेल्ड या प्रजातींच्या वटवाघळांची जगातली सर्वात मोठी काॅलनी( वसाहत) आहे. उन्हाळ्यात रात्र झाली की कोट्यावधी वटवाघळं अन्नाच्या शोधात गुहेतून बाहेर पडतात आणि पहाट होण्यापूर्वी गुहेत परततात. गुहेतून बाहेर पडणारी वटवाघळं बघण्यासाठी जगभरातले पर्यटक येथे येतात. पर्यटकांचा या वटवाघळांना कोणताही त्रास होवू नये यासाठीचे कडक नियम असून पर्यटकही हे नियम पाळतात. 

ब्रॅकन केव्ह या गुहेने निसर्गासाठी अतिशय महत्त्वाच्या प्राण्याला आसरा दिला आहे. या गुहेमुळे वैज्ञानिकांनाही अभ्यासासाठी एक महत्त्वाची जागा आणि विषय मिळाला आहे. ब्रॅकन केव्ह ही केवळ एक जागा नसून ही अभूतपूर्व अशी नैसर्गिक घटना आहे.

हेही वाचा !

ब्रॅकन गुहा आहे कशी?  

ब्रॅकन  केव्ह ही नैसर्गिक गुहा आहे. अमेरिकेतील टेक्सास राज्यात सॅन ॲण्टेनियो येथे ही गुहा आहे. ही गुहा १,५२१ एकर एवढ्या आकाराची आहे. ही गुहा मानवनिर्मित नसून निसर्गनिर्मित आहे.

अभ्यासक सांगतात या गुहेत जवळजवळ २ कोटी वटवाघळं हिवाळ्यानंतरच्या काळात आसरा घेतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात सस्तन प्राणी एका ठिकाणी असलेलं  ब्रॅकन केव्ह हे जगातलं एकमेव उदाहरण आहे.

ही गुहा म्हणजे वटवाघळांचं प्रसूती गृह आहे. म्हणजे या जागेत वटवाघळं आपल्या पिल्लांना जन्म देण्यासाठी येतात.   

Image: texashillcountry

ब्रॅकन केव्हमध्ये अमेरिकेतले स्थानिक मेक्सिकन फ्री टेल्ड य प्रजातीची वटवाघळं राहायला येतात. जगभरात वटवाघळांची ही प्रजाती मोठ्या प्रमाणावर विखुरलेली आहे. दक्षिण अमेरिका ते कॅनडा या गरम प्रदेशात ही वटवाघळं आढळतात. या वटवाघळांचे पंख १८ इंच लांब आहे. या पंखाच्या मदतीनेच ही वटवाघळं तासाभरात ६० मैल अंतर सहज पार करतात. ही वटवाघळं मोठ्या प्रमाणावर डासांसारखे कीटक खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतात. किडे, कीटक खावून ही वटवाघळं शेतकऱ्यांची कीड नियंत्रणासाठी मदत करतात. मेक्सिकन फ्री टेल्ड वटवाघळं इयरवाॅर्म हे पतंग किडे खातात. हे किडे पिकांसाठी अतिशय उपद्रवी मानले जातात. पण वटवाघळांमुळे शेतकऱ्यांना शेताच्या किडनियंत्रणासाठी त्यांचा मोठा फायदा होतो. वटवाघळांमुळे परागीभवनाची, वेगवेगळ्या ठिकाणी बिया रुजण्याची क्रिया होते. ही मेक्सिकन फ्री टेल्ड वटवाघळं निसर्गासाठी अतिशय महत्त्वाची प्रजाती मानली जाते.

हेही वाचा !

Image: twitter.com

ब्रॅकन केव्हमधून रात्री बाहेर पडणारी वटवाघळं बघण्यासाठी मे ते सप्टेंबर या काळात पर्यटक तेथे येतात. वटवाघूळ निशाचर प्राणी आहे. त्यांना दिवसभर राहण्यासाठी एक सुरक्षित जागा हवी असते. ही गुहा या वटवाघळांना हवं तसं वातावरण पुरवते. या गुहेतल्या उंच छतांवर ही वटवाघळं लटकलेली असतात. त्यामुळे त्यांना शिकारीची भीती नसते. 

या गुहेत मादी वटवाघळं पिल्लांना जन्म देण्यासाठी येतात. या गुहेत पिल्लांचं भरण पोषण करतात, त्यांना उडण्यास शिकवतात. एक स्क्वेअर फूट एवढ्या जागेत ५०० वटवाघळांची पिल्ले लटकलेली असतात. एवढ्या पिल्लांमधून आपलं पिल्लू ओळखण्याचं कसब वटवाघळांकडे असतं. ते केवळ वासावरुन आपलं पिल्लू ओळखतात आणि त्याचं भरण-पोषण करतात.

गुहेतील वातावरण वटवाघळांना पोषक असं दमट असतं. दिवसभर कोट्यावधी वटवाघळं या गुहेत वर छताला उलटी लटकलेली असतात. रात्र व्हायला लागली की वटवाघळांना बाहेर जाण्याचे वेध लागतात. एकदम सर्व वटवाघळं गुहेच्या बाहेर पडत नाही. आधी त्यातील काही हिंमतबाज वटवाघळं बाहेर पडतात आणि पुन्हा गुहेत परततात आणि मग हळूहळू वटवाघळं बाहेर पडायला लागतात. 

पर्यटक जे बघण्यासाठी तिथे जमलेले असतात तो नजारा दिसण्यास सुरुवात होते. थवा, प्रवाह असं करता करता पूर यावा याप्रमाणे आणि इतकी वटवाघळं गुहेतून बाहेर पडायला लागतात. ही वटवाघळं गुहेतून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांची रांग ४२ कि.मी लांब आणि ३२  कि.मी रुंद असतात. पुढचे तीन तास गुहेच्या तोंडाजवळ वटवाघळं फिरतात. अन्नासाठी लांबवर उडत जातात. ज्या वटवाघळांनी पिल्लांना जन्म दिला आहे ती वटवाघळं रात्री बाहेर गेली तरी एकदा-दोनदा गुहेत येवून आपल्या पिल्लांना खाऊ घालतात.वर्षातून एकदा वटवाघळं पिल्लांना जन्म देतात. मेक्सिकन वटवाघळं ही त्यासाठी ब्रॅकन  गुहेत येतात.

Image: cepf.net

दरवर्षी गुहेत इतकी वटवाघळं जन्म घेतात. मग त्या गुहेत कधी वटवाघळांची गर्दी होत नाही का? असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण वटवाघळांची पिल्लं जेव्हा उडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची अंधारात एकमेकांशी टक्कर होते. त्यात काही पिल्लं खाली जमिनीवर पडतात. आणि गुहेतल्या जमिनीवर भुंगेरे असतात. भुंगेरे या पिल्लांवर कब्जा करतात. या भुंगेऱ्याची कुरतडण्याची क्षमता जबरदस्त असते. त्यामुळे एकदा खाली पडलेलं वटवाघूळ जिवंत राहूच शकत नाही. भुंगेऱ्यांशिवाय गुहेतल्या जमिनीवर साप, ससाणा, रॅकून्स, शिंगे असलेलं घुबड हे प्राणी राहतात.

१९९१ पासून 'बॅट कन्झर्व्हेशन इंटरनॅशनल ' ही संस्था या गुहेची देखभाल करत आहे.  

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact