व्हीलचेअरवरील मायकॅला गेली अवकाशात! अडचणीवर मात करणाऱ्या जिद्दी मुलीची गोष्ट

image: business-standard

ठरवलं तर अशक्य काहीच नसतं. आपल्याला थोडंसं काही लागलं, खेळता खेळता हातपाय दुखावला तर मी शाळेत जाणार नाही, मी क्लासला जाणार नाही, मी खेळायला जाणार नाही असं म्हणत आपण आपलं दुखणं कुरवाळत राहातो. मायकॅला बेंटहाऊस ही तरुण मुलगीही असंच करु शकली असती. पण तिनं ते केलं नाही. त्याचाच परिणाम म्हणजे आज ती व्हीलचेअरवर असूनही एक अवकाश मोहीम यशस्वीपणे पार करुन परत आली. यासाठी जगभरात मायकॅलाच्या जिद्दीचं कौतुक होत आहे. आता ही मायकॅला कोण आहे? तिने नेमका कोणता पराक्रम केला? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्याचं उत्तर म्हणजे मायकॅलाच्या अवकाश मोहीमेची ही गोष्ट आहे.

जेफ बोझेस म्हणजे ॲमेझाॅन कंपनीचे मालक. त्यांची 'ब्ल्यू ओरिजिन' ही आणखी एक कंपनी आहे. या कंपनीद्वारे ते सामान्य माणसाला अवकाश मोहिमांचा अनुभव घेण्याची संधी देतात. 'न्यू शेपर्ड' ही या कंपनीची मोहीम. या मोहीमेचे २० डिसेंबर २०२५ रोजी ३७ वे उड्डाण होते. आणि या उड्डाणात या राॅकेटमध्ये बसून अवकाशातील सफरीचा अनुभव घेण्याची संधी मायकॅलाला मिळाली.

 हेही वाचा!

अवघड स्पर्धा 'कूल' राहून जिंकता येते? फैजान झाकीने स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली त्याची गोष्ट

मायकॅला बेनथाॅस ही जर्मन एरोस्पेस आणि मेकाट्राॅनिक्स इंजिनिअर आहे. २०१६ पासून ती विविध संशोधन केंद्रात काम करु लागली. २०२४मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये ती ट्रेनी म्हणून नेदरलॅंडमधील मार्स रेडियो ॲक्युलटेशन म्हणून रुजू झाली. २०२२ मध्ये तिने ह्यूस्टनहून पॅराबेलिक झिरो ग्रॅव्हिटी उड्डाण केले. या उड्डाणानंतर त्यांच्या शून्य गुरुत्वीय उड्डाण दलात मायकॅलाची ' ॲस्ट्रो ॲक्सेस ॲम्बेसेडर म्हणून निवड झाली. २०२४मध्ये मायकॅलाने 'लुनास रिसर्च स्टेशनमध्ये ॲनालाॅग अंतराळवीर मोहिमेत भाग घेतला. तरुण वयात मोठमोठ्या अवकाश मोहिमेत सहभागी झालेल्या मायकॅलाबद्दल विशेष सांगायचं म्हणजे मायकॅलाला चालता येत नाही. ती व्हीलचेअरवर बसून फिरते.

Image:smithsonianmag

२०१८ मध्ये डोंगर दऱ्यात सायकल चालवताना ती पडली. तिच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली त्यामुळे तिला चालता येईनासे झाले. व्हीलचेअर हीच तिच्या चलनवलनाची आधार झाली. व्हीलचेअर आयुष्यात आली म्हणून दु:खी होणाऱ्यातली मायकॅला नव्हती. चालण्याची क्षमता गमावलेली मायकॅला निराश न होता पुन्हा नव्या ऊर्जेने आपल्या कामाचे स्वप्नं पाहू लागली. ते स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ती धडपडू लागली. तिच्या या धडपडीतूनच तिला न्यू शेपर्ड मोहिमेत सहभागी होता आलं. या मोहिमेत तिच्यासोबत आणखी पाचजण होते. या उड्डाणात पृथ्वी संपून अवकाश सुरु होतं अशा १०० कि.मी अंतरावर पोहोचून मायकॅला आणि तिच्या सोबतच्यांनी शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला. व्हीलचेअर वापरणाऱ्या मायकॅलाला राॅकेटमध्ये बसून हा अनुभव नीट घेता यावा यासाठी राॅकेटमध्ये कंपनीने तिच्यासाठी खास व्यवस्था केली होती.

आपल्या अडचणींवर मात करुन अवकाशात जाऊन आलेली मायकॅला आता पुन्हा नवीन स्वप्न पाहण्यासाठी सज्ज झाली आहे. आपल्या कामात सतत मग्न असलेली मायकॅला आपली खेळाची आवडही जपते. ती व्हीलचेअर टेनिसपटू आहे. अपघात होण्यापूर्वी सामान्य आयुष्य जगणाऱ्या मायकॅलाने व्हीलचेअरवरील आपल्या नवीन आयुष्याशी आनंदाने मैत्री केली. त्याचा परिणाम म्हणजे नवीन नवीन आव्हानं पेलण्याचं धाडस ती सतत दाखवत असते!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact