अवघड स्पर्धा ‘कूल’ राहून जिंकता येते? फैजान झाकीने स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली त्याची गोष्ट

- माधुरी पेठकर

Image: thehindu

तुम्हाला eclaircissement हा शब्द माहिती आहे का? या शब्दाचं अचूक स्पेलिंग सांगून फैजान झाकी या १३ वर्षाच्या मुलाने जगातली प्रसिध्द आणि अवघड असणारी 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी २०२५' ही स्पर्धा जिंकली . फैजान हा अमेरिकेतील टेक्सास राज्यातल्या डल्लास शहरात राहातो. अमेरिकन भारतीय असलेल्या फैजानचे आई बाबा भारतातले. ही स्पर्धा जिंकल्यानंतर पहिल्यांदा फैजान आई बाबांसोबत नुकताच हैद्राबादला आला होता. तिथे त्याला भेटायला, त्याच्याशी बोलायला मुलांनी गर्दी केली होती. तेव्हा फैजानने ही स्पर्धा कशी असते? स्पर्धेची तयारी कशी केली याबाबत स्वत:चे अनुभव सांगितले.

फैजान म्हणतो आपण खेळताना जसा 'एन्जाॅय' करत खेळ खेळतो तसा अभ्यास, स्पर्धेची तयारीही करायची असते. गेल्या ६ वर्षांपासून फैजान या स्पर्धेत भाग घेत होता. त्यासाठी तयारी करत होता. पण ही तयारी करताना त्याला कधीच कंटाळा आला नाही. डिक्शनरी बघणं, नवीन शब्द समजून घेणं, ते लिहिणं हे सर्व त्याला खेळाप्रमाणेच आनंद देणारं होतं. २०१९ मध्ये जेव्हा तो ६ वर्षांचा होता तेव्हा त्याने पहिल्यांदा अमेरिकेच्या स्पेलिंग बी स्पर्धेत भाग घेतला होता. २०२३ मध्ये फैजान पहिल्यांदा स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला. २०२४ च्या स्पर्धेत फैजान जवळ जवळ ही स्पर्धा जिंकलेला होता. पण commelina हा शब्द आला. आणि त्याने या शब्दाचा अर्थ काय? त्याचं मूळ काय असा कोणताही विचार न करता घाईघाईत त्याचं स्पेलिंग सांगून टाकलं. ते स्पेलिंग सांगताना त्याने त्याची सुरुवात K-A-M या तीन अक्षरांनी केली. जे चूक होतं. या चुकीमुळे मागे पडलेले स्पर्धक पुन्हा स्पर्धेत आले आणि फैजान जिंकत आलेली स्पर्धा हरला. या अनुभवानंतर फैजानने नेहमीप्रमाणेच स्पर्धेची तयारी सुरुच ठेवली. आठवड्यातल्या पाच दिवसात तो ४० तास स्पेलिंग बीच्या परीक्षेसाठीचा अभ्यास करायचा. शनिवार रविवार या वीकेण्डच्या दोन दिवसात आठ आठ तास तो इंग्रजी शब्दांचा सराव करायचा. डिक्शनरी काढायचा, ती वाचणं, त्यातले शब्द अर्थासह समजून घेणं, नवीन, अनोळखी शब्द आला की तो समजून घेणं, लिहून बघणं असा त्याचा सराव चालायचा. अभ्यास करुन करुन बोअर झालं असं कधीच फैजानला व्हायचं नाही. ही प्रॅक्टिस तो खेळाप्रमाणे एन्जाॅय करायचा.

हेही वाचा!

नऊ वर्षांची गोपू आपल्या गावातल्या कोणत्या रहस्याचा शोध घेते?

Image:abcnews

अमेरिकेतली ही स्पर्धा जगातली मोठी स्पर्धा, अवघड स्पर्धा असं दडपण फैजानने घेतलं नाही. सहा वर्षांपासून तो स्पर्धेत सहभागी होत असल्याने स्पर्धेतल्या वातावरणाशी त्याने चांगलंच जुळवून घेतलं होतं. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत फैजान एकदम 'कूल' होता. परीक्षकांनाही तो 'ब्रो' म्हणत होता. स्पर्धेतली एक एक फेरी आत्मविश्वासाने पार करणाऱ्या फैजानपुढे eclaircissement हा शब्द आला. अभ्यास आणि सरावामुळे आधीच या शब्दाची ओळख झालेल्या फैजानने क्षणाचाही उशीर न करता त्याचं स्पेलिंग सांगितलं. मूळ फ्रेंच असलेला हा शब्द. त्याचा अर्थ स्पष्टीकरण/ ज्ञान/माहिती/ गोंधळ दूर होणे असा होतो. या शब्दाचं स्पेलिंग सांगतांना फैजानला आपण बरोबरच असणार असा आत्मविश्वास होता. पण स्पेलिंगचं एक एक अक्षर तो श्वास रोखून सांगत होता. शेवटचं अक्षर सांगितल्यानंतर तर त्याची उत्कंठा इतकी वाढली की तो स्टेजवर कोसळलाच. त्याने सांगितलेलं स्पेलिंग बरोबर होतं. त्याने स्पर्धा जिंकली. त्याला बक्षीस म्हणून त्याला ५२,५०० अमेरिकन डाॅलर म्हणजे ४५लाख रुपये मिळाले. एवढ्या लहान वयात एवढं मोठं बक्षीस फैजानने मिळवलं. आपल्या बक्षिसातली काही रक्कम तो अमेरिका आणि भारतातील गरजू समुहांना मदत म्हणून देणार आहे. अवघड स्पर्धा जिंकणाऱ्या फैजानचे त्याच्या हुशारीबद्दल तसेच लहान वयात त्याने दाखवलेल्या समजूतदारपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
मोठ्या स्पर्धांना न घाबरणारा फैजान कौतुकाने हुरळूनही जात नाही. आता ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याने त्याचं लक्ष गणिताकडे वळवलं आहे. गणितही त्याचा आवडीचा विषय आहे. आता त्याला 'इंटरनॅशनल मॅथॅमॅटिकल ऑलिम्पियाड' स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. या स्पर्धेची तयारी करतानाच तो स्पेलिंग बी स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना स्पर्धेची तयारी कशी करायची, अभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन करत आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact