
आपल्या अवतीभवती अनेक सूक्ष्म कीटक असतात. काही तर सहजी आपल्याला डोळ्यांनी दिसतही नाही. हे कीटक कसे जगतात, त्यांचं आयुष्य कसं असतं असे प्रश्न पडतात का तुम्हाला? खरंतर पडायला हवेत. प्रश्न पडले की उत्सुकतेपोटी आपण त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यातूनच आपल्यासमोर या कीटकांचं रहस्यमय जग उलगडतं. मेफ्लाय नावाचा कीटक त्याच्याकडे जगण्यासाठी फक्त २४ तास असतात. म्हणजे फक्त एक दिवस. आपल्याला जर कंटाळा आला तर आपण एक काय अनेक दिवस वाया घालवतो. आपल्याला टतं आपल्याकडे भरपूर वेळ आहे. या मेफ्लाय कीटकाच्या तुलनेत आपल्याकडे खरंच पुष्कळ वेळ आहे असं नक्की वाटेल तुम्हाला.
हेही वाचा!
छोट्याशा मधमाश्या निसर्गाची मोठी मदत करतात. ती कशी?
एका दिवसात मेफ्लाय कसे जगतात? त्यांचं आयुष्य एवढं लहान कसं?
मेफ्लाय हे जलीय कीटक आहेत. नाजूक पंखांच्या या कीटकाला जलीय अप्सरा असं देखील म्हणतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर आधी अळीच्या रुपात असतात. या अवस्थेत ते दोन वर्ष तर कधी कधी त्यापेक्षा जास्तही जगतात. त्यांच्या या अवस्थेला निम्फज अवस्था असं म्हणतात. मेफ्लाय कीटकाच्या तीन अवस्था असतात. अळीच्या रुपात निम्फज अवस्था. पंख फुटले की सबइमॅगो अवस्था आणि त्यानंतरच्या अवस्थेला इमॅगो असं म्हणतात. सबइमॅगो या अवस्थेत मेफ्लाय तरुण असतात तर इमॅगो या अवस्थेत ते प्रौढ होतात. या दोन अवस्थेत मेफ्लाय पाण्यातून जमिनीवर आणि जमिनीवरुन हवेत संक्रमण करतात. सबइमॅगो अवस्थेतील मेफ्लायचे पंख निस्तेज होतात आणि मग ते जसे प्रौढ होतात तसे त्यांचे पंख पारदर्शक होतात. या अवस्थेत प्रजनन करण्यासाठी मेफ्लाय जोडीदार शोधतात.
अळीच्या अवस्थे दोन वर्षांपेक्षा जास्त जगणारे मेफ्लाय तरुण आणि प्रौढ झाल्यावर एकच दिवस किंवा काहीच तास का जगतात यामागे विशिष्ट कारण आहे. कारण पंख फुटलेल्या मेफ्लायना खाण्यासाठी ना तोंड असतं ना पचनासाठी पचनसंस्था असते. अळी अवस्थेत त्यांनी साठवून ठेवलेली ऊर्जा ते आपल्या तरुणपणात आणि प्रौढावस्थेत वापरतात. मादी मेफ्लायच्या शरीरात नर मेफ्लायच्या तुलनेत थोडी जास्त जागा असते. ही जागा अंड्यांसाठी असते. मादी मेफ्लायच्या संपूर्ण शरीरात अगदी डोक्यापर्यंत अंडी असतात. एक मादी मेफ्लाय १०,००० अंडी घालतात.
नुकतेच पंख फुटलेल्या तरुण मेफ्लाय कीटकांची पक्षी मोठ्या प्रमाणात शिकार करतात. त्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटतेही. सर्वच मेफ्लाय २४ तास जगतात असं नाही. काही नर मेफ्लाय तर प्रौढ अवस्थेला पोहोचल्यावर म्हणजे त्यांचे पंख पारदर्शक झाल्यावर फक्त एकच तास जगतात तर काही मादी मेफ्लाय अंडी दिल्यानंतर पाचच मिनिटात मरुन जातात. तर असे असतात फक्त एक दिवस किंवा त्यापेक्षाही कमी जगणारे मेफ्लाय कीटक. आहे ना त्यांचं जगणं रहस्यमय!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact.


