आज काय 'कराल'?
-विनय र.र.

गहू, ज्वारी, तांदूळ, कडधान्यं सगळ्यांच्याच घरी असतात.ते घ्यायचे, त्याचा ढीग करायचा आणि तो मोजायचा. या मजेशीर खेळातून गणित भूमितीचा अभ्यासही होणार आहे.
तुमच्या घरी मोहरी आहे का? गहू, ज्वारी, तांदूळ, हरबरा, कडधान्ये, डाळी, भुईमूग, तीळ, कारळे, जवस यापैकी काय काय आहे? जे काही आहे ते आपल्याला लागणार आहे.
आपल्याला एकेकाचे ढीग करायचे आहेत. पण शिस्तीत करायचे आहेत. कसे ? ऐका. यादी पैकी जे तुमच्या घरात असेल ते मोजून शंभर ग्रॅम घ्या. सपाट टेबल किंवा पाट लागेल. त्याच्या मध्यभागी एक फुलस्केपच्या दुप्पट आकाराचा कागद पसरा. आलेखाचा कागद असेल तर फारच छान. या कागदाच्या मध्यभागी पेन्सिलीने एक खूण करा. त्या खुणेच्या वर हवेत दहा सेंटिमीटर अंतर मोजा. ती हवेतली जागा लक्षात ठेवा. आता शंभर ग्रॅम मोजून घेतलेल्या धान्यापैकी कोणतेही एक धान्य तुमच्या मुठीत घ्या. मुठीचे खालचे टोक हवेतल्या त्या दहा सेंटिमीटर वर असणाऱ्या जागेपाशी न्या. मुठीतले धान्य हळूहळू कागदाच्या मध्यभागी असलेल्या खुणेवर सोडा. एक मूठ संपली की पुन्हा मूठभर धान्य तसेच सोडा. या धान्यातील काही कण पसरत राहतील पण काही एकावर एक बसून त्यांचा ढीग बनेल.
हेही वाचा!
आपल्याला राग का येतो? राग आल्यानंतर काय घडतं?
या ढिगाची उंची मोजायची आहे. त्यासाठी एक वीणकामाची सुई किंवा काडी वापरा. सुई बरोबर ढिगाच्या मध्यभागी हलके खुपसा. ती किती बुडली ते पट्टीने मोजा. ही झाली ढिगाची उंची. ढिगातले दाणे कागदावर जिथपर्यंत पसरलेले दिसत आहेत तिथे पेन्सिल वापरून एक वर्तुळाकृती काढा. धान्याचे कण कागदावरून काढून घ्या. कागदावरील वर्तुळाचे क्षेत्रफळ मोजा. आलेखाच्या कागदावर किती चौरस ढिगाने पूर्णपणे झाकले गेले होते? अपूर्ण झाकले गेलेले चौरस अर्ध्यापेक्षा कमी झाकले असतील तर मोजू नका. अर्ध्यापेक्षा जास्त झाकले असतील तर मोजा. अशा प्रकारे ढिगाचा पसारा नोंदवा? कोणत्या धान्याचा ढीग जास्त पसरला ? कोणत्या धान्याचा ढीग जास्त उंच झाला ?
धान्याच्या कणांचा आकार, प्रकार, पृष्ठभागाचा खरखरीतपणा, घनता या गोष्टी ढिगाच्या उंची आणि पसारा यांवर परिणाम करतात? ढिगाची उंची आणि पसारा यांचे गणिती सूत्र काय आहे? १०० ग्रॅम गव्हाचा ढीग अंदाजे ३. ५ सें.मी. उंच आणि १२ सें.मी. पसरट असेल. १०० ग्रॅम मोहरीचा ढीग अंदाजे ३.० सें.मी. उंच आणि १३ सें.मी. पसरट असेल.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


