- अश्विनी बर्वे

आता संक्रांत येईल आणि तुम्ही सगळेच मस्त पतंग उडवायचे प्लॅन करत असाल.आपला पतंग आकाशात उंच उंच उडायला लागला की कसलं भारी वाटतं ना… पण तो तसा उडत असताना त्याच्यामुळे कुणाला दुखापत झाली तर त्यात काही मजा नाही. मग आपल्यामुळे कुणाला इजा व्हायला नको असेल, पतंग उडवताना त्यातली धम्माल कमी व्हायला नको असेल, आपल्या पतंगामुळे एखादा पक्षी जखमी व्हायला नको असेल किंवा अगदी रस्त्यावर टूव्हिलरवरुन जाणाऱ्या कुणालाही आपल्या पतंगाचा मांजा लागून दुखापत व्हायला नको असेल तर आपल्याला काय करता येईल?
हे सगळं व्हायला नको असेल तर पतंग उडवताना नायलॉन मांजा किंवा चायनीज मांजा वापरायचा नाही. आपल्याला मजा यायला हवी म्हणून इतर कुणाला त्रास होत असेल, तर तशी मजा करण्यात काहीच गंमत नाही. पतंग उडवणं हे एक कौशल्य आहे, हां पण त्यात जीवतोड स्पर्धा, काटाकाटी आली की तो खेळ खेळण्यातली गंमत कमी होते हे मात्र लक्षात ठेवायचं.
कुठलाही उत्सव साजरा करताना तो सगळ्यांना आनंद देणाराच असायला हवा. सगळ्यांना म्हणजे पतंग आकाशात उडतो तेव्हा आकाशात मुक्तपणे विहार करत असतात त्या सगळ्या पक्ष्यांनाही… आणि ही काळजी कुणी घ्यायची? तर पतंग उडवणाऱ्या प्रत्येकाने!
हेही वाचा!
ती फक्त २वर्षांची आहे पण घोडा चालवते. खेळण्यातला नाही खराखुरा!
पतंग उडवायचाय ना? मग पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ही अज्जिबातच विसरायची नाही. साधा दोरा वापरला तर पतंग उंच उडणार नाही आणि नायलॉन किंवा चिनी मांजा वापरला म्हणजे तो सगळ्यांपेक्षा उंच उडेल असं काही नसतं. पतंगासाठी जो नायलॉन किंवा चिनी मांजा वापरला जातो त्याचा त्रास पक्ष्यांना होतो. प्लॅस्टिक किंवा सिंथेटिक मांजा वापरताना दोऱ्याला काचेची पूड लावलेली असते. तुम्ही पतंग उडवताना ती काचेची पूड तुमचे हातही रक्तबंबाळ करु शकते. तो मांजा जे लोक तयार करतात त्यांचे हातही त्यात कापले जातात, पण तरी पोटापाण्यासाठी करतात बिचारे. काचेच्या पुडीने माखलेला हा असला मांजा गळ्याला लागून पक्ष्यांचा जीव जातो. एवढंच कशाला? माणसांचाही जीव मांज्यामुळे गेल्याच्या घटना घडतात, तुम्ही पेपरमध्ये त्याच्या बातम्या वाचल्याही असतील.
आकाश आणि झाडं ही पक्ष्यांची ‘स्पेस' आहे. आपल्या घरी आलेल्या कुणी आपल्याला त्रास देऊ नये असं आपल्याला वाटतं ना? तसंच पक्ष्यांनाही ते वाटत असणारच. त्यांच्या स्पेसमध्ये शिरुन आपण मज्जा करायची आणि त्यांना त्रास द्यायचा हे बरोबर नाही एवढं तुम्हाला नक्की कळतं, बरोबर ना?
मग चला, धम्माल करा, पण काळजीही घ्या.

पतंग तयार करायची साधी सोपी पद्धत
बांबूच्या काड्यांची चौकट तयार करायची.
त्या चौकटीवर पतंगाचा कागद किंवा प्लॅस्टिक नीट ताणून चिकटवायचं.
दोऱ्याचा सांधा घट्ट बांधून शेपटी बांधायची. त्यामुळे पतंगाला स्थीर उडायला मदत होते.
शेवटी चांगला दोरा जोडला की पतंग उडायला सज्ज होतो.
अर्थात् हे करताना पतंग तयार करण्यात एक्सपर्ट असलेल्या एखाद्या दादा किंवा ताईला मदतीला बोलवा, म्हणजे काम फत्ते!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


