स्वयंपाकघरातली लुडबुड
- सागर दामले

स्वयंपाकघरात केवळ भांडी नसतात. वापरानुसार, त्याच्या आकारानुसार त्यांना काही विशिष्ट नावं आहेत. स्वयंपाकाआधी स्वयंपाकघरातल्या या भांडीकुंडींची ओळख महत्त्वाची.
स्वयंपाकघराशी संबंधित शब्दांचा मोठा खजिना मराठी भाषेत उपलब्ध आहे. त्यात स्वयंपाकघरातील भांड्यांनाही एकदम खास नावं आहेत. तुम्हाला ऐकून ती थोडीफार माहितीही असतील. चला तर मग त्यांची यादीच करुयात..
अर्धगोलाकार असते ती 'कढई' पण उभ्या भिंती असणारं आणि काठ असणारं असतं ते 'पातेलं'. ताकाचा असतो 'गंज' आणि दह्याचा असतो 'सट'. कोशिंबिर ठेवण्यासाठी वापरतो तो 'कुंडा'. आकाराने मोठा असतो तो 'डबा' (डब्बा नाही हं!) आणि छोटीशी असते ती 'डबी' . ओट्यावर, तेल ज्यात ठेवतो त्याला म्हणतात 'कावळा' आणि रोज लागणारे मसाले ठेवतो 'मिसळण्याच्या डब्यात'
गव्हाचं पीठ आणि पाणी एकत्र करून, मळून झाल्यावर होते ती 'कणिक' आणि ती ज्यात तिंबतात ती असते 'परात'. झाकण्यासाठी वापरतो ती 'ताटली'.
जेवतो 'ताटात' आणि वड्या पाडण्यासाठी मिश्रण गार करतो ते 'तसराळ्यात'
हेही वाचा!
स्वयंपाक - एक लाईफ स्किल!
भात ज्याने वाढतात ती असते 'भातवाढी' किंवा *भाताचा हात* (तो आपल्या पंजासारखा दिसतो म्हणून. )
उसळ किंवा पातळ पिठलं वाढण्यासाठी वापरतात तो 'डाव' आणि ताक, आमटी, अशासारखे पातळ पदार्थ वाढायला वापरतात ती 'पळी'. पोळी भाकरी तव्यावर पलटण्यासाठी वापरतात ते 'उलतनं' किंवा 'उलथने' आणि तळलेला पदार्थ तळणीतून बाहेर काढण्यासाठी वापरतो तो 'झारा'.
बापरे.... एवढे प्रकार ! बऱ्याच लोकांना तवा, प्लेट, फ्राय पॅन, स्पॅच्युला एवढंच माहिती होतं ना... मग माहितीत भर पडली ना!
आता तुम्ही तुमच्या पालकांच्या मदतीने ' हे कशाला म्हणतात?' याची उत्तरं शोधा बरं!
घडवंची, चरवी, शकुंतला, लोटी, लोटा, तांब्या, ओगराळे, डेरा, रांजण, कळशी, घागर, सोऱ्या. हे शब्दं अनेकांसाठी एकदम नवीन असतील. पण ते नेमकं कशाला म्हणतात हे जर समजून घेतलं तर मग ही नावंही सहज लक्षात राहू शकतात. एकदा प्रयोग करुन पाहा!
(लेखक 'मुंबई स्वयंपाकघर फेसबुक ग्रुपचे सदस्य आहेत.)
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


