स्वयंपाक – एक लाईफ स्किल!

स्वयंपाकघरातली लुडबुड 

- सागर दामले.

Image - Google.

 

आपण पाठ्यपुस्तकात शिकलो आहोत की माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या तर अन्न, वस्त्र आणि निवारा. याशिवाय आपण जगूच शकत नाही. या गरजांशी निगडीत सर्व कौशल्ये सर्व मनुष्यांना यायला हवीत ही झाली मूलभूत अपेक्षा. त्याचबरोबर आधुनिक काळात आपलं रोजचं आयुष्य सुखकर आणि सोयीचे व्हावे म्हणून बाकी कौशल्ये पण यायला हवीत जसं लिहायला, वाचायला, पोहायला यायला हवं, सायकल चालवायला यायला हवी, फळे भाज्या ओळखायला यायला हव्यात इत्यादी.

सध्याच्या काळात बऱ्याच मुलामुलींना वरील बरीचशी कौशल्ये येतात. पण या सुट्टीत एक कौशल्य आपल्याला जमवून घ्यायचं आहे, ते म्हणजे स्वयंपाक घराची ओळख आणि त्यातल्या कामांची सवय! पाच वर्षापूर्वी करोनाने आपल्याला सगळ्यात मोठा धडा शिकवला. घरातल्या सर्व सदस्यांना एका समान तागडीत आणून ठेवलं. काही घरात, ज्यांना घरकामाची, स्वयंपाकाची ओळख नव्हती त्यांची धांदल उडाली पण त्यांनी प्रयत्न पूर्वक त्यावर मात केली.

आजकाल मोठी मुले परदेशी, परगावी शिक्षण घ्यायला जातात, त्यावेळी मुले पहिल्यांदा काय शिकतात तर स्वयंपाक आणि घरकाम. ज्यांनी कधी कांदा चिरलेला नसतो त्यांची तर पार त्रेधातिरपीट उडते... डोळ्यातून पाणी, नाकातून पाणी. कढई धुताना कित्येकदा हातातून सटकून खाली पडते, कचऱ्याची बादली उघडताना नाकी नऊ येतात... काही विचारू नका... पण आपल्याला इथे हिरो बनायची संधी आहे बरं का...! कशी?

तर मुलामुलींनो, या सुट्टीत आपण काही मूलभूत कौशल्ये शिकणार आहोत. 1. लसूण सोलणे. 2. पालकांकडून गॅस पेटवायला शिकणे आणि त्याचा सराव करणे. 3. चिमट्याने पातेल पकडणे. 4. ज्यांना गॅस पेटवता येतो त्यांनी डाळ भाताचा कुकर लावणे. 5. कणिक मळायला शिकणे. 6. रोज आपलं ताट, वाटी, कप, फुलपात्र धुवून ठेवणे. 7. रोज जेवायच्या आधी पाटपाणी घेणे, म्हणजे सर्वांसाठी टेबलावर, ताट, वाट्या, पेले मांडणे, पाणी घेणे, पोळ्यांचा डबा, चटणी , कोशिंबिरीचा कुंडा इत्यादी ठेवणे. मग माझ्या छोट्या दोस्तांनो, आपणच होऊयात आपल्या घरचे स्टार.. आणि कौतुक म्हणून, आईस्क्रीम खाऊन होऊ गारेगार ..

(लेखक मुंबई स्वयंपाकघर फेसबुक ग्रुपचे सदस्य आहेत.)