
संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी ए विंगच्या गच्चीत सोसायटीची मिटिंग सुरु झाली. बी विंगच्या गच्चीत आद्य, झेलम अवनी लपून बसून काय चाललंय ते ऐकत होते. आधी बराच वेळ मोट्या माणसांनी खूप बोअर केलं. कसले तरी पैसे, नोटीस, कुठलीतरी बिलं अशा सगळ्या गोष्टींची न कळणारी चर्चा करून झाल्यावर त्यांनी इतर विषय चर्चेला घेतले. एका ताईने आंब्याचं झाड तोडण्याचा विषय मांडला चर्चा सुरु झाली. त्यावर खूप जणांनी खूप मतं मांडली, खूप लोक खूप वेळ तावातावाने बोलले आणि शेवटी बऱ्याच लोकांनी मिळून असं ठरवलं की ते आंब्याचं झाड तोडून तिथे पार्किंगसाठी शेड बांधायची. आणि मग जाता जाता कोणीतरी म्हणालं, की आम्ही त्यासाठी माणूस आणून पुढच्या रविवारी ते तोडून घेऊ. त्यानंतर पण मीटिंग चालू होती, पण आद्य, झेलम आणि अवनी हळूच बी विंगचा जिना उतरून बाहेर खाली निघून गेले.
त्यांना ज्याची भीती होती तेच झालं होतं. सोसायटीच्या लोकांनी त्यांची ढाक असलेलं आंब्याचं झाड तोडायचं ठरवलं होतं. ते तिघं जण त्यांच्या झाडापाशी जाऊन उभे राहिले. आणि एरवी त्यांचं ज्याकडे लक्ष नसायचं अशा अनेक गोष्टी त्यांना त्या झाडावर दिसल्या.
पिल्लांना भरवणारे पक्षी, मधमाशांचं पोळं, खारुताईचं घरटं, आंब्याच्या झाडावर आलेल्या बांडगुळाला आलेली छान फुलं… हे झाड तुटलं तर हे सगळं तुटणार होतं. त्या तिघांनी एकमेकांकडे बघितलं आणि एकमेकांशी न बोलता त्यांनी एकमेकांचे हात धरले. काहीही करून हे झाड पडू द्यायचं नाही हे त्यांचं अजूनच पक्कं झालं. त्यांचा प्लॅन प्रत्यक्षात आणायची वेळ झाली होती.
हेही वाचा!
मोठ्यांचा प्लॅन हाणून पाडण्यासाठी छोट्यांनी केला भन्नाट प्लनॅ
ते तिघं झाडावर त्यांच्या जागेवर जाऊन बसले. तिथे बसून अवनीने शिट्टी मारली आणि मागच्या वेळी जमलेले त्या झाडावर राहणारे सगळे जीव त्यांच्या आजूबाजूला गोळा झाले. त्यात पक्षी, खारी, उंदीर, फुलपाखरं, भुंगे, कोळी, मुंग्या, मधमाश्या, बारीक किडे, टोळ, नाकतोडे आणि एक साप असे सगळे होते. हे सगळे जण आपापसातलं भांडण विसरून फक्त त्यांचं झाड वाचवण्यासाठी एकत्र झाले होते. त्यांना आद्यने थोडक्यात मीटिंग मध्ये काय झालंय ते सांगितलं आणि मग सगळ्यांनी मिळून दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे सोमवारपासून त्यांचा प्लॅन अंमलात आणायला सुरुवात केली.
सगळ्यात आधी सगळ्या पक्षांनी सभा घेऊन ठरवलं की त्या झाडाच्या खाली उभ्या केलेल्या गाड्यांवर शी करायची नाही. अगदी एखाद्या छोट्या, उडता न येणाऱ्या पिल्लाने केली तर चालेल. पण बाकी पक्ष्यांनी सोसायटीच्या बाहेर जाऊन शी करायची.
दुसरी गोष्ट म्हणजे खारींनी अर्धवट खाल्लेला खाऊ, टरफलं, वडाची फळं असा कचरा खालच्या गाड्यांवर टाकायचा नाही. एकतर खाली जाऊन कचरा टाकून यायचा किंवा खाली गाडी नाही ना असं बघून कचरा टाकायचा.

तिसरं म्हणजे उंदरांनी गाड्यांच्या वायर्स कुरतडायच्या नाहीत. मुंग्यांनी गाडीत पडलेले वेफर्स आणि बिस्किटांचा भुगा खायला हावरटासारखं गाडीत जायचं नाही. कारण दुसऱ्या दिवशी गाडीत बसायच्या आधी माणसं आतून गाडी झटकतात तेव्हा ते सगळं जमिनीवर, वारुळाच्या जास्त जवळ मुंग्यांना मिळू शकतं. हे आद्य आणि अवनीने मुंग्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनी तसं वागायचं मान्य केलं.
एखादी गाडी कितीही दिवस उभी असली तरी कोळ्याने तिच्यावर जाळं करायला जायचं नाही. सापाने माणसं आली की कुठेतरी लपून बसायचं. माणसांना फणा काढून दाखवून घाबरवायचं नाही. बारीक किडे झाडावर बसून काहीतरी चिकट चिकट गाड्यांवर पाडतात ते त्यांनी करायचं नाही. सगळ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडायची. एकमेकांवर लक्ष ठेवायचं. खालच्या गाड्या आपल्यामुळे घाण होऊ नयेत यासाठी एकमेकांना मदत करायची.
बाहेरून येणाऱ्या पक्ष्यांवर, उंदरांवर, कोळ्यांवर, मुंग्यांवर लक्ष ठेवायचं हे काम मधमाश्या, भुंगे आणि फुलपाखरांना दिलं. सगळ्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिल्यावर झाडाच्या फांदीवर बसलेली झेलम उडी मारून खाली उतरली आणि म्हणाली, “आधी आपण आपल्या बाजूने चांगलं वागायचं…”
तिच्यापाठोपाठ उडी मारून खाली उतरत आद्य म्हणाला, “त्यानंतर समोरच्याला थोडा वेळ द्यायचा…”
तेवढ्यात खाली आलेली अवनी म्हणाली, “आणि नाहीतर गुरुवारपासून आहेच मिशन ढाक पार्ट टू!”
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


