
झेलम जरा रागावून गप्प बसा म्हटल्यावर सगळे गप्प बसले. दोन मिनिटं शांततेत गेली. मग आद्य म्हणाला, “पुढे बोल ना काहीतरी…”
झेलम म्हणाली, “जरा थांब. मला विचार करू दे.”
सगळेजण अपेक्षेने तिच्याकडे बघत होते. दोन मिनिटं विचार करून झाल्यावर ती म्हणाली, “एक आयडिया आहे.”
“काय आयडिया?”
“सांग ना.”
“सांगते.” झेलम इकडे तिकडे बघत म्हणाली. मगाशी झाड तोडायचा प्लॅन करून गेलेली मोठी माणसं परत आलेली नव्हती. इन फॅक्ट सोसायटीच्या मागच्या बाजूला असलेल्या या आंब्याच्या झाडाकडे कोणीच आलेलं नव्हतं. ते तिघं इथे बसले आहेत हे कोणाला माहिती नव्हतं. तिने सगळ्यांना तिच्या जवळ सरकायची खूण केली. तसे सगळेजण तिच्या जवळ सरकले. आणि मग, अगदी कोणी झाडाखाली उभं असेल तरी त्याला ऐकू जाणार नाही अशा आवाजात झेलमने तिचा प्लॅन सांगितला. तो ऐकून सगळे जण खुदुखुदू हसायला लागले.
हेही वाचा!
सगळ्यांच्या चुकीची शिक्षा मिळणार झाडाला. त्याच्यावर अन्याय का?
सगळ्यांना तिचा प्लॅन पटलेला होता. मग सगळ्यांनी प्लॅन एकदम डिटेल्समध्ये डिस्कस केला. कोणी काय काम करायचं, कधी करायचं, कसं करायचं ते सगळं ठरवलं. सगळ्यांनी आपापल्या वाटणीची जबाबदारी आनंदाने घेतली. आता फक्त प्लॅन प्रत्यक्षात कधी आणायचा ते ठरवायचं बाकी होतं.
झेलम म्हणाली, “हे सगळं कधी करायचं ते आम्ही तिघं तुम्हाला सांगतो.” आणि मग तिघंही उरलासुरला अभ्यासाचा पसारा आवरून उड्या मारून खाली उतरले.
सगळ्या पक्ष्यांनी, मुंग्यांनी, कोळ्याने, मधमाश्यांनी, भुंग्यांनी, उंदरांनी, खारींनी त्यांना टाटा केलं. एवढंच नाही, तर आज त्यांच्या आंब्याच्या झाडाची पानंपण जास्त जोरात सळसळत होती. तिघं आपापल्या घरी दप्तरं टाकून परत आले. मग अवनी म्हणाली,
“अगं पण आपला प्लॅन कधी राबवायचा ते आपल्याला कसं कळेल?”

त्यावर झेलमने काही म्हणायच्या आधी आद्य म्हणाला, “सिम्पल! आपण सोसायटीच्या मीटिंगला जायचं. म्हणजे आपल्याला त्यांचा प्लॅन कळेल. मग आपण आपला प्लॅन बनवायचा… या माझ्या बरोबर!” असं म्हणून तो कुठेतरी निघाला.
आद्य कुठेतरी जायला निघाला, तशी अवनी आणि झेलम पण त्याच्यामागे निघाल्या. तो चालत चालत थेट सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेला आणि तिथे जाऊन नोटीस बोर्डवर काहीतरी बघून आला. बाहेर आल्यावर अवनी आणि झेलमला म्हणाला,
“सोसायटीची मीटिंग या रविवारी संध्याकाळी ५ वाजता आहे.”
“मग?” अवनीला अजूनही काही कळलेलं नव्हतं.
“अगं… हे सगळेजण सोसायटीच्या मिटिंग मध्ये झाड कधी पाडायचं ते ठरवतील. ते आपण ऐकायचं. आणि मग आपला प्लॅन बनवायचा.”
“पण सोसायटीच्या मीटिंगला आपल्याला कोण येऊ देईल?”
“आपल्याला नाहीच येऊ देणार.” झेलम म्हणाली.
“मग?” अवनीने त्या दोघांच्या तोंडाकडे बघून विचारलंच.
“मग काय??? आपण जायचं लपून!” आद्य म्हणाला.
“पण लपायचं कुठे?” अवनी ने विचारलं.
“चल जाऊन बघून येऊ. सोसायटीची मिटिंग ए विंग च्या गच्चीवर आहे असं लिहिलं आहे नोटीस मध्ये. तिथे जाऊ. आणि बघून येऊ.” असं म्हणून तिघंही ए विंग च्या गच्चीवर गेले. पण तिथे लपायला काहीच जागा नव्हती. पाण्याची टाकी सुद्धा उंचावर होती. तिथे जायला एकच जिना होता. आणि त्यातून सगळी मोठी माणसं जा ये करणार होती. ती जागा बघितल्यावर आद्य आणि झेलम दोघांनाही काही सुचेना. शेवटी आळीपाळीने त्यांच्या तोंडाकडे बघत अवनी म्हणाली,
“पण आपल्याला इथेच का लपायचं आहे?”
“का म्हणजे? सोसायटीची मिटिंग इथे आहे म्हणून…”
“हो… पण बी विंग शेजारीच तर आहे. आणि मीटिंगला कायम माईक वर बोलतात. आपण बी विंग च्या गच्चीत लपलो तर कोणाला दिसणार नाही आणि आपल्याला सगळं ऐकू पण येईल.” अगदी शेजारी असलेल्या बी विंग कडे हात करत अवनी म्हणाली. तिचं बोलणं ऐकून आद्य आणि झेलम ने डोक्यावर हात मारून घेतला. खरंच की! बरं झालं अवनीने तरी डोकं चालवलं… असं म्हणत तिघं बी विंगच्या गच्चीची पाहणी करून आले. तिथे त्यांनी सगळं दिसेल अशी जागा फायनल केली आणि रविवारी तिघांचे आईबाबा मीटिंगला गेल्याबरोब्बर बी विंगच्या गच्चीत त्या जागेवर जाऊन बसले.
पाच वाजून दहा मिनिटांनी सेक्रेटरी काकांनी माईक हातात घेतला आणि मीटिंग सुरु झाली.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


