बिकीबसमुळे मुलांना शाळेत जाण्याची येतेय मजा! बिकीबस म्हणजे?

Image: momentummag

सायकलवर शाळेत जायला किती मज्जा येते ना! त्यात सोबत मित्र मैत्रिणीही सायकलवर येणारे असतील तर असं एकत्र सायकल चालवत शाळेत जायला भारी गंमत वाटते. पण शाळेत जाणारी सगळी मुलं काही सायकल चालवत शाळेत जावू शकत नाही. एकतर अनेक शाळांमध्ये इयत्ता ६-७ वी पर्यंत सायकलने शाळेत यायचं नाही हा नियम असतो. त्यानंतरही मुलं शाळेत सायकल नेवूच शकतात असं नाही. कारण आई बाबांना वाटणारी भीती. आपलं मूल रस्त्यावर सायकल नीट चालवेल ना? मस्ती तर करणार नाही, काही स्टंट तर करणार नाही? रस्तेच चांगले नाहीत, ट्रॅफिक खूप, शाळाच लांब अशा अनेक कारणांनी मुलांना इच्छा असूनही शाळेत सायकलवर जात येत नाही. मग जी मुलं सायकलवर शाळेत येतात, त्यांचा इतर मुलांना हेवा वाटू लागतो.  समजा शाळेत जाणाऱ्या सगळ्या मुलांना एकत्र सायकल चालवत शाळेत जाता आलं तर किती मजा येईल ना?  अशी मजा आपल्याला येत नसली तरी ती जगात कोणालाच येत नाही असं नाही. अशी मजा स्पेनमधील बार्सिलोना शहरातल्या मुलांना अनुभवता येते.

 हेही वाचा!

बार्सिलोना शहरात बिकीबस आहे. ही बिकीबस दर शुक्रवारी रस्त्यावरुन धावते. बिकीबस म्हणजे काय माहितीये का? बिकीबस म्हणजे बाइकबस. ही बस चालवण्यासाठी कोणी एक ड्रायव्हर नसतो. ही बस चालवणारे शेकडो ड्रायव्हर असतात. अहो ही बाइक बस म्हणजे सायकल. ती मुलं चालवतात. बार्सिलोना शहरात दर शुक्रवारी शाळेतली मुलं सायकल चालवत शाळेत जातात.

कशी चालते बिकीबस?

बिकीबस ही बार्सिलोना शहरातली एक योजना आहे. ती खास शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी आहे. बार्सिलोना हे स्पेनमधील दुसरं मोठं शहर आहे. या शहरात ठराविक रस्त्यांवर दर शुक्रवारी मुलं आपली सायकल घेवून बाहेर पडतात आणि एकत्र सायकल चालवत शाळेत जातात. ही योजना बार्सिलोना सिटी कौन्सिलने सुरु केली आहे. या योजनेत पालकही कार्यकर्ते म्हणून सहभागी होतात.

शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांचे ग्रूप केलेले आहेत. हे ग्रूप एकत्र येवून ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करतात. पुढाकार घेतात. आज बिकीबस या योजनेत १५,००० मुलं सहभागी आहेत

Image: manchestermoves.org

 हेही वाचा!

मार्च २०२१ मध्ये ही योजना सुरु झाली. तेव्हा बार्सिलोनाच्या एकाच रस्त्यावरील शाळांमध्ये जाणारी मुलं यात सहभागी होती. पण आता बार्सिलोना शहरात १५ मार्गांवर दर शुक्रवारी ही बिकीबस पळते. ८० पालक या योजनेत स्वयंसेवक म्हणून काम करतात.

मुलं जेव्हा सायकल चालवत शाळेत जातात तेव्हा पालकांच्या ग्रूपने ठरवलेला एक कार्यकर्ता प्रत्येक रुटवर मुलांच्या सोबत असतो. पालक कार्यकर्ता मुलं सुरक्षितरित्या सायकल चालवताय ना, वाटेत रहदारीचा धोका तर नाही ना याची काळजी घेतात. शहरातले पोलिसही बिकीबसच्या मार्गावर लक्ष ठेवतात, इतर वाहतुकीचा बिकीबस चालकांना अडथळा येणार नाही, काही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेतात.

बिकीबस कशासाठी?

Image: bicycling.com

वाहतुकीचे अनेक पर्याय असले तरी सायकल हाच शाश्वत आणि सुरक्षित पर्याय आहे, ही गोष्ट मुलांच्या मनावर ठसावी, मुलांना एकत्र सायकल चालवत शाळेत जाण्याची मजा घेता यावी, मुलांमध्ये सायकल चालवण्याची आवड निर्माण व्हावी, त्यांना सायकल चालवण्याची चांगली सवय लागावी, मुलांनी गाडी वापरणाऱ्या आपल्या आई बाबांचे मनपरिवर्तन करावे या उद्देशाने हा उपक्रम सुरु झाला आहे.

बिकीबस हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारा स्पेन हा काही एकमेव युरोपिय देश नाही. नेदरलॅण्डमध्येही असा उपक्रम सुरु झाला आहे. तिथे एक मोठी सायकल काही मुलं मिळून चालवत शाळेत जातात. मुलांना सुरक्षितपणे सायकल चालवता यावी यासाठी तिथे स्वतंत्र मार्गही आहेत. तसेच मुलं जेव्हा सायकल चालवत असतात, तेव्हा इतर वाहतूक थांबवण्यासाठीची विशिष्ट टेक्नाॅलाॅजीही येथे विकसित केली आहे.

सायकल चालवत शाळेत जाणं ही गोष्ट किती महत्त्वाची आहे आणि मुलांना याचा आनंद घेता यावा यासाठी मोठेही कसा प्रयत्न करतात हे वाचून भारी वाटलं ना! तुम्हाला या उपक्रमाबाबत काय वाटलं ते मला नक्की लिहून पाठवा. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact 

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact