आपण शेतकरी बनण्याचा अनुभव घ्यायचा का? त्यासाठी काय करायचं?

 Image: hindustantimes

बाहेर मस्त पाऊस पडायला लागला की आपल्याला घरात बसून काय वाटतं? मी सांगू.. कोणाला मस्त भजी खावीशी वाटतात. कोणाला पावसात जावून फुटबाॅल/क्रिकेट खेळावंसं वाटतं. कोणाला पावसात भिजवासं वाटतं, तर कोणाला खिडकीत बसून न भिजता पडणाऱ्या पावसाची गंमत पाहायला आवडते. आणि कोणी पाऊस बदाबदा पडून उद्या शाळेला सुटी मिळाली तर किती मज्जा? अशीही स्वप्नं पाहाण्यात मग्न होतात. तुम्हाला यापेक्षा काही वेगळं करावंसं वाटतं का? माझ्याकडे एक भारी आयडिया आहे.

पाऊस सुरु झाला की वर्तमानपत्रात, टीव्हीवर आपण शेतकऱ्यांच्या , शेतातल्या लगबगीच्या बातम्या वाचतो, पाहतो. इतक्या दिवस लांबलेल्या पावसामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांचे फोटो किंवा बातम्या येत होत्या. आता पाऊस सुरु झाल्यावर पेरण्यांच्या बातम्या येवू लागल्या आहेत. या बातम्या तुम्ही वाचता किंवा पाहाता का? या बातम्या वाचून/ पाहून तुम्हाला काय वाटतं. मला सांगा तुम्हाला शेतकरी व्हावंसं वाटतं का?

हेही वाचा! 

आता तुम्ही म्हणाल, काहीपण.. शेतकरी होण्यासाठी जमीन लागते, जमीन घेण्यासाठी पैसे लागतात, ते पैसे कमावण्यासाठी नोकरी लागते, नोकरी लागण्यासाठी शिक्षण पूर्ण व्हावं लागतं. आणि आम्ही तर अजून शाळेतच. मग कसं होणार शेतकरी? तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्हाला माझी आयडियाच कळाली नाही. थांबा मी सांगते मला काय म्हणायचं ते.

शेतकरी व्हायचं म्हणजे काहीतरी पेरायचं. उगवायचं. आपण पेरलेलं उगवल्यावर शेतकऱ्याला कसा आनंद होतो तसा आनंद आपण घ्यायचा. आता कळली का माझी शेतकरी होण्याची आयडिया?

मी म्हटलं तसं शेतकरी होण्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला जमीनच लागते असं नाही. आपल्या घरातल्या गॅलरीतला एक कोपरा आणि एक दोन कुंड्या मिळाल्या ना तरी आपल्याला शेतकरी होता येतं. आपण शेती करु शकतो. माझा एक मित्र आहे सूजल नावाचा. त्याचे बाबा गच्चीवरची शेती करतात. त्यांच्या गच्चीवर एक बाग आहे. फुलांची नाही, भाज्यांची. तर हा माझा मित्र  आणि त्याचे बाबा त्यांच्या घराच्या गच्चीवरच्या बागेत कुंड्यात विविध भाज्या लावतात. त्यासाठीची सेंद्रिय खतं, जैविक कीटकनाशकं ते स्वत: तयार करतात. ते स्वत: भाज्या पिकवतात आणि आपण पिकवलेल्या भाज्यांचा आनंद घेतात. सूजल तर मला नेहेमी सांगतो, ' मी उगवलेल्या मिरचीचा ठेचा पण मला भारी लागतो.' गच्चीवरची बाग असलेले सूजल आणि त्याचे बाबा शेतकरीच तर आहेत. ते स्वत: पेरण्याचा, भाज्या उगवण्याचा आनंद घेत आहेत.

असं आपणंही शेतकरी व्हायचं का? असं विचारतेय मी.

 Image: freepik

आपल्या गॅलरीतल्या किंवा अंगणातल्या एखाद्या कुंडीत आपण कुठल्याही भाजीचं बी पेरु शकतो किंवा रोप लावू शकतो. आता कोणत्या भाजीच्या बिया असतात आणि कोणत्या भाजीची रोपं असतात? ती कुठे मिळतात, बी पेरण्यासाठी किंवा रोप लावण्यासाठी कुंडी कशी तयार करायची याबाबत तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्यांची मदत घेवू शकतात. हे एकदा नीट समजून घेतलं की आपणही भाजीचं बी पेरायचं किंवा रोप लावायचं. त्यांना वेळच्या वेळी खत द्यायचं, त्याला किड लागणार नाही, याची काळजी घ्यायची. पुरेसं पाणी आणि सूर्यप्रकाश द्यायचा. आपल्या रोजच्या कामासोबत आपण पेरलेल्या बी कडे/ रोपाकडे जबाबदारीनं लक्ष द्यायचं. झाडाला फळधारणा कशी होते, भाज्या कधी तयार होतात हे सर्व बारकाईनं पाहायचं. असं करता करता एक दिवशी आपण पेरलेल्या भाज्या तयार होतील. आपण पेरेलेल्या बी तून तयार झालेली भाजी पाहून आपल्याला किती आनंद होईल ना.. अगदी शेतकऱ्याला होतो तसा आनंद होईल आपल्याला. भलेही कुंडीत मिरचीचं रोप लावलेलं असू देत पण आपण लावलेल्या मिरचीची चव कशी लागते किमान एवढं तर नक्कीच अनुभवता येईल ना!

मग काय म्हणताय, व्हायचं ना शेतकरी? पेरायचं ना काहीतरी? तुम्हाला ही आयडिया कशी वाटली, तुम्ही तुमच्याकडच्या कुंडीत काय पेरलं हे मलाही कळवाल का? मी तुमच्या या शेतकरी होण्याच्या अनुभवाची वाट पाहात आहे. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact