- डॉ. दत्ता दातीर

तुम्हाला मोबाइल आवडतो ना? गेम्स, व्हिडीओ, रील्स, कार्टून्स हे सगळं बसल्या जागी मिळालं की कुणाला आवडणार नाही म्हणा… उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकांनी सकाळ-दुपार-संध्याकाळ मोबाइल बघितला असेल, त्यावरुन आईबाबांची बोलणीही खाल्ली असतील. आईबाबा मोबाइल बघायला नको म्हणतात म्हणून तुमचं फुरंगटूनही झालं असेल. आता शाळा सुरु झाली ना? मग आता मोबाइलबरोबर कट्टी करायची वेळ झाली आहे. ती का करायची ते सांगतो.
हेही वाचा!
झोपण्याआधी टीव्ही पाहिला तर काय बिघडलं?
मोबाइल जास्त वापरला तर..
१) अभ्यास नीट होत नाही. पुस्तक उघडलं तरी ते वाचण्यात लक्ष लागत नाही.
२) ग्राऊंडवर खेळायचा कंटाळा येतो, त्यापेक्षा 'घरी बसून मोबाइल बघू' असं वाटतं. मग आपलं शरीर आळशी होतं.
३) रात्री उशिरापर्यंत मोबाइल बघितला की झोप पूर्ण होत नाही, मग डोकं दुखतं, चिडचिड होते आणि मूड जातो. ४) सतत स्क्रीन पाहिल्यामुळे डोळ्यांच्या तक्रारी सुरू होऊ शकतात. मोबाइल बघत जेवल्यामुळे किती खाल्लं याचं भान राहत नाही, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते, वजन अती वाढलं तर अनेक आजार मागे लागतात.

मोबाइलपासून लांब राहाण्यासाठी..
हे सगळं व्हायला नको असेल तर सगळ्यांनीच, खास करुन तुमच्यासारख्या, शाळा-अभ्यास-ग्राऊंड-खेळ असं धमाल आयुष्य असलेल्या मुलांनी मोबाइलपासून चार हात लांबच राहायला हवं. ते कसं जमवायचं? या घ्या टिप्स -
१) मोबाइलला हात लावताना ‘आज मी मोबाइलवर काही नवीन शिकणार आहे की फक्त टाइमपास करणार आहे?’ असा विचार करा. तुमचं उत्तर ‘टाइमपास करणार’ असं असेल तर मोबाइल लगेच खाली ठेवा.
२) मोबाइल वापरायची वेळ ठरवा. उदा. अभ्यास झाल्यावर अर्धा तास. रविवारी थोडा जास्त वेळ, म्हणजे पाऊण तास… आणि वेळ संपली की मोबाइल बाजूला ठेवायचा. ठेवायचा म्हणजे ठेवायचाच! कंपल्सरी! आईबाबा ओरडायची वाट न बघता आपला आपणच हा नियम करायचा आणि तो पाळायचा.
३) हात कामात असतात तेव्हा मोबाईलची आठवण येत नाही. त्यामुळे चित्र काढा, कोडी सोडवा, चेस, कॅरम, ल्युडो खेळा. गोष्टी लिहा. झाडांना पाणी घाला. मग तुम्हाला कळेल, मोबाइलशिवायच जास्त मजा येते.
४) ग्राऊंडवर घाम येईपर्यंत खेळा. क्रिकेट, कबड्डी खेळा. सायकल चालवा. धावा. मग मस्त व्यायाम होईल. रात्री छान झोप येईल आणि सकाळी फ्रेश वाटेल.
५) आई-बाबांशी एक 'डील' करा. आई-बाबांना सांगा, 'मी मोबाइल कमी वापरेन, पण तुम्हीही माझ्याशी बोलायला वेळ द्या.' एकत्र जेवा, गप्पा मारा आणि खूप हसा.
मोबाइल हे संपर्काचं साधन आहे. त्याचा वापर मर्यादित आणि कामापुरताच करायला हवा. मोबाइलचा स्क्रिन आकर्षक वाटतो पण मोबाइलच्या स्क्रिनबाहेरचं जग जास्त सुंदर असतं. आईबाबांबरोबरचा वेळ, मित्रांबरोबरचा खेळ आणि खरे खुरे अनुभव हे मोबाइल बाजूला ठेवल्यावरच मिळू शकतात. आता शाळा सुरु होईल. अभ्यासाशिवाय करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तेव्हा मोबाइलची सवय कमी करण्याची ही चांगली संधी आहे. तुम्ही मोबाइलचा वापर कमी केला का? मोबाइलची सवय कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं ते मला नक्की कळवा.


