– डाॅ. श्रुती पानसे

ज्या वेळेला परीक्षा अगदी तोंडावर येते आणि अभ्यास पुरेसा झालेला नसतो त्या वेळेला त्यातून सुटका करण्याचा एक मार्ग म्हणजे काही धडे ऑप्शनला टाकणं आणि उरलेल्या सोप्या धड्यांचा अभ्यास करणं हा एक मार्ग असू शकतो असं काही मुलांना वाटतं.
जे शिक्षक परीक्षेचा पेपर काढतात, ते शिक्षक वर्गात शिकवलेल्या अभ्यासक्रमावर आधारित आणि सर्वच धडयांचा संपूर्णपणे विचार करूनच पेपर काढतात. त्यांनी धडे ऑप्शनला टाकलेले नसतात. ते सर्व धड्यांवर काही ना काही प्रश्न नक्कीच तयार करतात. जर त्यांनी धडे ऑप्शनला टाकलेले नाहीत तर आपण धडे ऑप्शनला कसे काय टाकणार?
जर आपण काही संपूर्ण धडे ऑप्शनला टाकले आणि त्यातलंच समजा काही पेपरमध्ये आलं, आपण अर्थातच ते वाचलेलं नाही त्याचा अभ्यास केलेला नाही, तर आपल्याला त्यातले मार्क कसे काय मिळणार हा विचार सर्वप्रथम करायला पाहिजे .
हेही वाचा!
आकृत्यांचा अभ्यास आवश्यक असतो का?
समजा तुम्हाला अजिबात वेळ नाही किंवा काही वेगळ्या कारणांमुळे, घरगुती समस्यांमुळे किंवा तब्येतीच्या कारणांमुळे जर तुमचा पुरेसा अभ्यास झालेला नसेल आणि तुम्हाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता असेल तर संपूर्ण धडे ऑप्शनला टाकण्यापेक्षा प्रत्येक धडा वाचून त्यातला महत्त्वाचा भाग कोणता हे बघा. तेवढ्यावर तुम्ही भर दिला तर एक वेळ चालू शकतो.
त्यामुळे सर्व धडे तुमचे वाचून होतील आणि त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्हाला भर देता येईल. मात्र अख्खा धडा ऑप्शनला टाकणं आणि असे अनेक धडे ऑप्शनला टाकणं म्हणजे आपल्याला परीक्षेत मार्क कसे काय मिळणार याचा विचार न करता घेतलेला निर्णय आहे.
कोणत्याही धड्यामध्ये जे महत्वाचं असेल त्या संदर्भातले प्रश्न धड्याखाली घेतलेले असतात. जर अभ्यास करण्यासाठी अजिबातच वेळ नसेल तर संपूर्ण धडा वाचण्यापेक्षा केवळ धड्याखालचे प्रश्न वाचा आणि मनात त्यांची उत्तरं द्या. (शक्य असेल तर लिहा ) यामुळे सर्व धड्यांची उजळणी होईल. कोणताही मुद्दा सुटून जाणार नाही. प्रत्येक धडा नजरेखालून गेलेला असेल.
अभ्यासाला वेळ नसेल तर संपूर्ण धडे वाचण्यापेक्षा आपली अभ्यासाची वही वाचावी. लेखन केलं नाही तरी चालेल. मात्र सर्वच धड्यातला मजकूर वाचला जाईल. जे ऑप्शनला टाकलं आहे तेच पेपर मध्ये आलं, तर नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच अभ्यास करणं हे योग्य आहे.
( लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.)
shruti.akrodcourses@gmail.com


