– डाॅ. श्रुती पानसे

एखादा विषय समजून सांगण्यासाठी, मुद्दा स्पष्ट करण्यासाठी, एखाद्या वस्तूची, अवयवाची अंतर्गत रचना कशी आहे हे दाखवून देण्यासाठी, भूरूप कशी असतात हे समजण्यासाठी. याशिवाय विविध भौमितिक आकृत्या त्रिकोण, चौकोन वगैरे पटकन नजरेसमोर यावेत, सिद्धांत समजून सांगण्यासाठी आणि त्याद्वारा गणित सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यांचा समावेश पाठ्यपुस्तकांमध्ये केलेला असतो.
याचा मूळ उद्देश धड्यातला मजकूर सोप्या पद्धतीने समजून घेता यावा हा असतो. मजकुराचं दृश्य रूप म्हणजेच आकृती असते असं म्हटलं तरी चालेल. आकृती समजली की आकलन सोपं जाईल. यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आकृती असते.
काही जणांना आकृती काढणं हे एक मोठं संकट वाटतं. कारण ती नीट येणार नाही, चुकेल असं वाटतं. आकृती चुकली असं खरं तर सहसा होत नाही. समजा तसं होत असेल यांचा अर्थ सराव करायला पाहिजे. कोणतीही आकृती एक दोनदा हातांखालून गेली तर चुकणार नाही.
काही जणांना आकृतीचा सराव करणं म्हणजे वेळ घालवणं वाटतं. पण आकृती काढण्याचा सराव केला तर त्याची भीती वाटत नाही. भूमितीची आकृती तर आवश्यक असतेच. उत्तरात ती आकृती काढून दाखवून गणित सोडवून दाखवायचं असतं.
हेही वाचा!
परीक्षेच्या काळात काय करा.. काय नको?

आकृत्यांमध्ये काही घटक दाखवलेले असतात, त्यांना नावं असतात. त्या नावांच्यासह आकृत्यांचा सराव झाला तर आपल्याला संपूर्ण विषय, तो मुद्दा, त्या विषयाचे स्पष्टीकरण, लक्षात यायला मदत होते.
काही वेळेला आकृती काढली तर त्याचे वेगळे मार्क सुद्धा असतात. त्यामुळे आकृतीला नको म्हणण्यापेक्षा आकृती समजून घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे.
ज्या विषयाची आकृती दिलेली नाही, त्याची आकृती किंवा त्या मजकुराशी संबंधित एखादं छोटं चित्र कसं असू शकेल याचा आपल्या मनाने विचार केला आणि तशी आकृती आपल्या वहीतल्या मजकुराजवळ काढून ठेवली तर तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो.
वेगवेगळ्या विषयातल्या, विविध पद्धतीच्या आकृत्या आपल्याला मदत करण्यासाठी असतात. एकदा आकृती लक्षात आली की त्या वस्तूची संरचना किंवा भूरूप किंवा त्यातली भौमितिक रचना चटकन कळते. आकलनाला सोपं जातं. तो विषय समजतो. त्यामुळे आपल्याला आकृतीची मदत होत असते.
( लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.)
shruti.akrodcourses@gmail.com


