मी शाळेत मैत्री कोणाशी करु? मैत्री करण्यासाठी कोण चांगलं हे कसं ठरवू?

- शोभा भागवत

Image : freepik

तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का? की वर्गात चांगल्या विचारांच्या, चांगल्या मनाच्या मुलींसोबत राहायचे, की हुशार मुलींसोबत राहायचे? कारण चांगल्या वागणाऱ्या मुली हुशार नाहीत आणि हुशार मुली या चांगल्या मनाच्या नाहीत. त्या खूपच स्वार्थी आहेत. मी कुणासोबत राहायला पाहिजे? कुणाशी मैत्री करू?

असा प्रश्न शाळेत जाणाऱ्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो. म्हणून मग हा प्रश्न मी विचारला शोभा मावशीला. आणि त्यावर ती काय म्हणाली माहितीये?

खरं म्हणजे वर्गातल्या सर्वच मुलींची एकमेकींशी मैत्री असायला हवी. हुशार - कमी हुशार, गरीब- श्रीमंत, दिसायला छान - बेताच्या असा भेदभाव मैत्रीत असायला नकोच. तू म्हणतेस तशा तुझ्या वर्गातल्या हुशार मुली स्वभावाने चांगल्या नाहीत आणि अभ्यास मागे असलेल्या मुली स्वभावाने चांगल्या आहेत. असं का बरं व्हावं?

 

हेही वाचा!

तुम्ही आनंदासाठी खेळता की सतत हार-जीत करत राहातात?

सगळ्याच हुशार मुली वाईट स्वभावाच्या नसतात. आणि अभ्यासात मागे असलेल्या सगळ्याच मुली सुस्वभावी नसतात. काही वेळा असं होतं की हुशार मुलींचं शाळेत कौतुक होतं. त्यांना बक्षिसं मिळतात. मग त्यांना असं वाटू लागतं की, आपण फार खास आहोत, महत्त्वाच्या आहोत. त्यामुळे त्या इतर मुलींशी मैत्री करत नाहीत. तसं पाहिलं तर प्रत्येक मुलीत, मुलात काहीतरी विशेष गुण असतोच. तो शिक्षकांना ओळखता आला तर प्रत्येकच मुलीला आनंद होईल. एखादी मुलगी अभ्यासात मागे आहे म्हणजे ती काही कमी दर्जाची आहे असं मुळीच नाही. शाळेतल्या विषयांच्या पलीकडचे खूप गुण मुला-मलींमध्ये असतात. त्यांना वाव मिळायला हवा.

मी तर असं म्हणेन की, तू सर्वांशीच चांगली मैत्री कर. अगदीच कुणी आपल्याशी वाईटच वागत असेल मुद्दाम, तर सोडून दे. पण आपण मनमोकळं असावं. इतरांच्या गुणांचं मनापासून कौतुक करावं. आपल्यातही काही गुण असतात, ते वाढवावेत म्हणजे आपणही इतरांना आवडतो. मैत्री करण्यासारखं आपल्यातही काही हवं ना? आपण आपल्याकडून भेदभाव नाही करायचा असं ठरव आणि मग बघ काय होतं ते. तुझ्या अशा वृत्तीनं तुझा सगळा वर्गच बदलेल आणि सर्वांची एकमेकींशी मैत्री होईल. सगळ्या एकमेकींना अभ्यासात मदत करतील.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact