तुम्ही आनंदासाठी खेळता की सतत हार-जीत करत राहातात?

- सुरेखा सबनीस

दिवाळीच्या सुट्टीत चिकू मावशीच्या घरी आला.

चिकू वय वर्ष सात. लाडकोड, खाणंपिणं, भटकणं चालू झालंच. पण रिकाम्या वेळात त्याने टी. व्ही. समोर बसून राहावं किंवा कम्प्युटरवर गेम्स खेळावेत,  हे काही बरोबर नाही असं मावशीला वाटलं. घरापासून थोडं दूर क्रिकेटचं मैदान होतं. तिथे  छोट्या मुलांसाठी क्रिकेटचं शिबिर घेतलं जाणार हे कळल्यावर मावशीला हुरूप आला. रोज दुपारी टी.व्ही. वर कार्टून पाहात रमून जाणाऱ्या  चिकूला तिने शिबिरात दाखल केलं.

आपल्या नावाने फाडली गेलेली पहिलीच रिसीट पाहून चिकूला काहीतरी विशेष वाटलं. ‘आता हे मैदान माझंच झालं ना?’ असंही त्याने विचारलं आणि ते गृहितही धरलं. रोज दुपारी तो उत्साहाने शिबिराला जाऊ लागला. दुपारी कुणीतरी त्याला मैदानावर सोडून येत असे. संध्याकाळी आणायला मात्र मावशीच जायची. थोडावेळ दूर उभी राहून कौतुकाने त्याचा खेळ पाहायची.

 

हेही वाचा!

सुटीत मजा करायची असं म्हणतो, पण मजा म्हणजे नक्की काय करायचं?

अशीच एका संध्याकाळी ती मैदानापाशी पोहोचली. आज मुलांच्या हाती बॅट किंवा बॉल नव्हता. धावण्याचा सराव चालला होता. चिकूच्या सरांची शिट्टी वाजली आणि मुलांचा जथ्था वेगाने धावत सुटला. पांढऱ्याशुभ्र पोशाखातली छोटी छोटी मुलं हिरव्यागार मैदानावर धावू लागली तेव्हा क्षणभर सारेच धावताहेत असं वाटलं. खूप सुंदर दृश्य. मात्र पुढल्या क्षणी मावशीचा आनंद विझला. धावणारी मुलं खूप पुढे निघून गेली होती. तिचा लाडका चिकू पार पाठी पडला होता. एखाद दुसऱ्या  मुलाबरोबर खूप मागे राहून धावत होता.

पुन्हा शिट्टी वाजली. दीर्घ आणि मग छोटी छोटी अशी तीनदा. आजचा खेळ संपल्याची. आपण आत्ताच येत आहोत तुमचं धावणं बिवणं काही बघितलंच नाही असा आव मावशीने आणला. उगीच चिकूला हिरमुसला कशाला करा?

पण मावशीला पाहून चिकू उत्साहाने तिच्याकडे धावलाच. म्हणाला ‘तुला माहीत आहे? आज आमची रनिंग घेतली, मी एका मुलाला मागे टाकलं ! मावशी आधी आवाक होऊन आणि मग कौतुकाने चिकूकडे पाहताच राहिली. आज ती चिकूकडून बरंच काही शिकली होती.

खेळताना  काय करावं? 

१) खरं बोलावं आणि बरं बोलावं.

२) खेळ आनंदासाठी असतो  हे जाणावं.

३) आपण किती मागे पडतो  यापेक्षा किती पुढे जाऊ शकतो  हे मोजता आलं पाहिजे.

 ४) जे झालं ते सांगताना चिकूसारखा पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड ठेवता आला पाहिजे.

५) यालाच आत्मविश्वासाने जगणं म्हणतात.

खेळताना काय करू नये? 

१) खेळातील स्पर्धेत ईर्षा नसावी. 

२) आपल्याला कुणी हरवलं याची खंत नसावी.

३) मुख्य म्हणजे जे घडलं त्याबाबतीत कसलीच लपवाछपवी नसावी. चिकूची मावशी मनातल्यामनात करत होती तशी !

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact