लाइफस्कील्स
- गौरी पटवर्धन,
मुक्त पत्रकार

लाइफ स्किल्स म्हणजे जीवनकौशल्य; म्हणजेच वेगवेगळ्या परिस्थितीत सुखरूप जिवंत राहण्याची कौशल्यं! बापरे! किती जड आहे हे वाक्य. किती बोअर आहे. त्याचा अर्थपण समजत नाहीये. मग काय करायचं? तर तेच सोप्या भाषेत समजून घ्यायचं.
म्हणजे बघा, असं समजा की तुम्ही कुठेतरी ट्रेकला गेले आहात. तिथे तुम्ही थोडेसे मागे राहिलात आणि पुढे झाडीमध्ये तुम्ही रस्ता चुकलात आणि एकटेच मागे राहिलात. आता काय करायचं?
किंवा, आईबाबा घरात नाहीयेत. दोघंही ऑफिसच्या मीटिंगमध्ये आहेत त्यामुळे त्यांना फोन करता येणार नाही. नेमका त्याच वेळी एक कुरियरवाला आला. त्याच्याकडे आई किंवा बाबांच्या नावाचं कुरियर आहे. त्यावर ‘अर्जंट’ असं लिहिलेलं आहे. पण ते कुरियर पैसे देऊन सोडवून घ्यायला लागणार आहे. घरात पैसे कुठे असतात ते तुम्हाला माहिती आहे. पण हे कुरियर सोडवून घ्यायचं की नाही?
किंवा, शाळा सुटली, सॉलिड भूक लागली आहे, ‘आईने खायला काय केलं असेल बरं?’ असा विचार करत तुम्ही घरी आलात आणि बघता तर काय! घराला भलं मोठं कुलूप! आता???
किंवा, मित्रांबरोबर सायकलवर कुठेतरी लांब गेलात आणि अर्ध्या रस्त्यात जाऊन सायकलच पंक्चर झाली तर? किंवा घरात तुम्ही एकटे असतांना गॅसचा वास यायला लागला तर काय करायचं असतं?
हेही वाचा!
तुम्हाला मैत्री करता येते?भांडण मिटवता येतं? ते येत नसेल तर हे स्किल्स शिकावे लागतात!
शाळा सुटल्यावर कोणीतरी अनोळखी माणूस घ्यायला आला आणि म्हणाला, की “तुझ्या वडिलांचा अपघात झालाय. मी त्यांचा मित्र आहे. त्यांनी मला तुला घेऊन डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं आहे.” तर त्याच्याबरोबर जायचं का नाही?
हे आणि असे खूप प्रश्न आपल्याला केव्हा ना केव्हा सोडवावे लागतात. प्रत्येकाला यातली प्रत्येक अडचण येईलच असं नाही. पण अशा वेळी आपण काय करायचं हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि ते माहित असणं म्हणजेच 'लाइफ स्किल्स'. आता आपण कितीही ठरवलं तरी प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यात कधीतरी येऊ शकणाऱ्या प्रत्येक अडचणीची यादी करणं हे काही शक्य नाही. त्यामुळे आपल्याला एक अशी आयडिया शोधावी लागेल, जी या सगळ्या प्रश्नांचं एकत्र उत्तर देऊ शकते. आणि ती आयडिया आहे, सेफ्टी फर्स्ट! म्हणजे सुरक्षित राहणं हे सगळ्यात महत्वाचं असतं.
सेफ्टी फर्स्ट हा नियम कधीही विसरायचा नाही. कुठलीही गोष्ट करतांना आपल्याला यातून काही धोका आहे का? काही इजा होऊ शकते का? याचा विचार सगळ्यात आधी करायचा. आणि जर का धोका दिसला तर ती गोष्ट करायची नाही.
patwardhan.gauri@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


