तुम्हाला मैत्री करता येते?भांडण मिटवता येतं? ते येत नसेल तर हे स्किल्स शिकावे लागतात!

चला, शिकूया 'लाईफस्कील्स'

- गौरी पटवर्धन
( मुक्त पत्रकार)

Image: freepik

'मुलांनो sssss सांगा बरं… विद्यार्थी असतांना तुम्ही काय करणं सगळ्यात महत्वाचं आहे?'
असं जेव्हा केव्हा प्रमुख पाहुणे विचारतात त्यावेळी तुम्ही काय उत्तर देता? तर सगळे जण मोठ्या आवाजात सांगतात,
'अभ्यास!'
मग पाहुणे म्हणतात, 'शाब्बास! आता सांगा त्याशिवाय कुठली गोष्ट महत्वाची आहे?'
मग मुलं म्हणतात, 'व्यायाम!'
आणि मग पाहुणे ‘शिस्त, स्क्रीन टाइम, आईवडिलांचं ऐका’ असे उपदेश करतात आणि कार्यक्रम संपन्न होतो. हो ना? तर हे सगळे पाहुणे कायम याच ४-५ गोष्टींबद्दल तुम्हाला सांगत असतात कारण त्या गोष्टी आयुष्यात फार फार महत्वाच्या असतात. पण फक्त याच गोष्टी महत्वाच्या असतात का? तर तसं नाही. या सगळ्यांबरोबर अजून एक गोष्ट अशी आहे, की ती प्रत्येकाने शिकायलाच हवी; आणि ती गोष्ट म्हणजे लाईफ स्किल्स किंवा जीवनकौशल्यं!

हेही वाचा!

चंद्रावर घर बांधण्याचा मॅडनेस तुमच्या डोक्यात येतो का? यायलाच हवा!

जीवन कौशल्य या शब्दावरून म्हटलं तर पूर्ण अर्थ समजतो आणि म्हटलं तर काहीच कळत नाही. कोणी म्हणेल, जीवन कौशल्य म्हणजे काय? जिवंत राहण्याचं कौशल्य? ते तर आमच्यात आहेच ना? त्याशिवाय आम्ही जिवंत आहोत का? तर एका अर्थी हे म्हणणं बरोबर आहे. पण जगणं म्हणजे नुसतं जिवंत असणं नाही ना! तुम्हाला छान जगण्यासाठी, जगण्याचा आनंद घेण्यासाठी, जगतांना आपल्यावर जी वेगवेगळी संकटं येतात त्यातून मार्ग काढण्यासाठी, कधी ते संकट आपल्यावर येऊच नये यासाठी आपल्याला खूप कौशल्यं शिकावी लागतात. त्यांना म्हणतात जीवनकौशल्य.
पण एक गोष्ट चांगली आहे. ही जीवनकौशल्य शिकणं म्हणजे काही शाळेतला अभ्यास नसतो. त्यामुळे ती शिकायला वह्या पुस्तकं घेऊन बसायला लागत नाही. उलट अभ्यास नसलेल्या बऱ्याच गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण त्यातून जीवनकौशल्य शिकत असतो. त्यासाठी खूप गोष्टी करून बघायला लागतात. आईवडिलांची मदत न घेता, आपले आपण प्रश्न कसे सोडवायचे हे शिकावं लागतं. आणि ते करायला फार फार मजा येते. आपल्यासाठी महत्वाची जीवनकौशल्यं कुठली हे आपण शिकायला सुरुवात करुया!

लाईफस्कील्स सगळ्यांसाठी
एकसारखी असतात का?
१. मुंबईतल्या मुलांना आणि गडचिरोलीतल्या छोट्या पाड्यावर राहणाऱ्या मुलांना एकसारख्या गोष्टी महत्वाच्या असतात का?
२. सोलापूर आणि रत्नागिरीतल्या मुलांना एकसारख्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत का?
३. - तर याचं उत्तर होसुद्धा आहे आणि नाहीसुद्धा!
४. काही कौशल्यं सगळ्यांना सारखी शिकावी लागतात तर काहींमध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार फरक पडतो.

patwardhan.gauri@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact