विराट कोहलीला राग येतो, मग मला राग आला तर कुठं बिघडलं?

मी नव्हतोच ना आऊट, नव्हतोच एलबीडब्ल्यू तरी मला अनन्याने आऊट दिलं.. मुर्ख कुठली. स्वत:ला काही खेळता येत नाही, आणि मला शिकवतेय क्रिकेट..

images : google

-दहा वर्षांचा अर्णव तणतणत घरी आला. बॅट जोरात आदळली. ग्लोव्हज काढून फेकले . आणि आईला म्हणाला, मी नाही सहन करुन शकत चुकीचं वागणं.
आई शांतपणे म्हणाली, मी पण नाही करु शकत. आधी बॅटला सॉरी म्हण. ग्लोव्हज जागेवर ठेव. आवाज खाली घे मग आपण बोलू.
आईचा शांत अवतार पाहून अर्णवने ती म्हणाली ते केलं..
मात्र फणकाऱ्यात म्हणाला, तुला माहिती नसेल पण याला स्पोर्ट फायर म्हणतात. फायर नसेल ना तर परफॉर्म नाही करता येत.
आई म्हणाली, ‘मला फक्त एवढंच माहिती आहे की कपील देव ८३ च्या वर्ल्ड कपमध्ये बल्लूला म्हणाला होता, हारजीत सिर्फ स्कोअर बोर्ड पर दिखनी चाहिये.. आंखों मे नही! पाहिलास ना तू दहा वेळा तरी तो सिनेमा..’
‘पाहिला आहे गं.. पण हे १९८३ नाही, २०२३ आहे. पाहिलं नाहीस का परवा आयपीएलमध्ये कोहली किती चिडला होता. सिराज कसा भडकला होता. गंभीर पण सटकला होता. त्यालाच म्हणतात स्पोर्ट फायर..’ अर्णवचा संताप कमी होत नव्हता. तो अजून चिडला. म्हणाला..

हेही वाचा!

राग आल्यावर तोंडातून शिवी येते. आई बाबा एवढे चिडतात कशाला?

जर विराट कोहलीला राग येऊ शकतो तर मला का नाही?
आई शांतपणे म्हणाली, तू त्याच्या एवढा भारी प्लेअर आहेस का?
म्हणजे त्याच्यासारख्यांना चिडणं अलाऊड आहे आणि आम्हाला लहान मुलांना नाही, द्या आम्हालाच ग्यान द्या..तू नाही का चिडत, बाबा नाही का चिडत.. आता बोल ना?
अर्णवचा मुद्दा तर करेक्टच होता. जर घरात आईबाबा चिडतात, शाळेत शिक्षक चिडतात, विराट कोहली चिडतो, राेहित शर्मा भडकतो तर मग लहान मुलांनी चिडलं तर काय बिघडलं?

आता बोला..

अर्णवचे प्रश्न तर बरोबरच आहेत पण त्या प्रश्नाचं त्याला जे उत्तर त्याच्या आईने दिलं ते तिनं सचिन तेंडुलकरकडून ऐकलं होतं ते ही ती शाळेत असताना.
आईनं जे सांगितलं ते उत्तर अर्णवला तर पटलं. पाहा, तुम्हाला पटतं का?

सचिन तेंडूलकर १६ वर्षांचा असताना इंडियन टीममध्ये खेळत होता, पाकिस्तान दौरा. समोर वकार-वासिम-मुश्ताक. ते सगळे त्याला चिडवत होते. म्हणाले, शाळा बुडवून आलास का? आईला नाव सांगू का? दूध प्यायल्यास का आज? मरशील ना फुकट?
हे कमीच म्हणून वकार युनूसचा एक असा बाऊन्सर पडला की सचिनचं डोकंच फुटलं. त्याला सगळे हसत होते.
अशावेळी सचिनने काय करायला हवं होतं? चिडून रडायला हवं होतं? भांडायला हवं होतं मला चिडवलं म्हणून?
त्यानं काहीच केलं नाही. तो शांतपणे खेळत राहिला. त्यानं उत्तर दिलं ते त्याच्या बॅटने. ना कुणाला उलट उत्तर ना भांडण, ना संताप.
मग त्याच्यात स्पोर्ट फायर नव्हती का?
होती. पण ती त्यानं वाया नाही घालवली. आपल्या बॅटिंगसाठी त्यानं ती जोरदार वापरली. १९८९ मध्ये त्यानं बॅटने दिलेलं उत्तर अजून पाकिस्तानी खेळाडूंना ऐकू येतं म्हणतात. सचिन म्हणाला, मी तेव्हा चिडलोच होतो आतून, मग ठरवलं दाखवतो तुम्हाला रन्स करुन!
त्यानं तसंच केलं. तेव्हा आणि रिटायर होईपर्यंत नेहमी. कधीच त्यानं संताप, राग मैदानात दाखवला नाही. शून्यावर आऊट झाला. बाऊन्सर पडले तर त्यानं नंतर त्या बॉलरला ठोकून काढला. शेन वॉर्न, मॅकग्रा, डोनाल्ड, शोएब अख्तर, मलिंगा.. सगळ्यांनाच संतापून ठोकलं बॅटिंग करताना.
आता बोला, तुम्हाला सचिनसारखं उत्तर द्यायला आवडेल की उगीच भांडाभांडी करायला आवडेल?
अर्णवने तर ठरवलं आहे शॉट विराटसारखे मारायचे, डोकं थंड तेंडुलकर-धोनीसारखं ठेवायचं..

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact