
Image: freepik
विहान सातवीतून आठवीत गेलेला. उन्हाळ्याच्या थोड्याच सुट्या शिल्लक असल्याने दुपारी चार वाजल्यापासून खेळायला गेलेला विहान रात्री आठ साडे आठपर्यंत मित्रांसोबत काॅलनीतल्या मैदानवरच असतो. शाळा सुरु झाल्यावर संपूर्ण दिवस विहान बिझीच असणार हे माहीत असल्याने आईही विहानला काही टोकत नाही. त्या दिवशीही विहान खेळून रात्री आठ वाजता घरी आला. घरी आल्यावर मस्त हात पाय धुतले. फ्रेश झाला. माठातलं पाणी बाटलीत भरलं आणि हाॅलमध्ये खुर्चीवर बसून घोट घोट पिऊ लागला. तोच आतल्या खोलीत काहीबाही करत असलेली नृपा, विहानची लहान बहिण दादा आला आता कॅरम खेळायचा म्हणून हाॅलमध्ये आली. ' दादा तू मला माझ्यासोबत कॅरम खेळायचं प्राॅमिस केलेलं. चल ना आता खेळू ना आपण' म्हणत विहानकडे हट्ट करु लागली. खरंतर खेळून घामेघूम झालेल्या विहानला आता नुसतं शांतपणे पडून् राहायचं असतं. त्याला नृपासोबत अजिबात खेळायचं नसतं. पण स्वयंपाकघरातून आई विहानला दरडावते. मग मारुन मुटकून विहानला नृपासोबत कॅरम खेळायला बसावंच लागतं. पण खेळताना विहान अजिबात आनंदी नसतो. सारखी त्याची नृपावर चिडचिड सुरुच असते. स्ट्राइकर असा का ठेवलास, गोटी बोटानेच का ढकलली... असं काहीबाही सुरुच होतं त्याचं.
पण विहानच्या या चिडचिडीकडे आईनं दुर्लक्ष केलं होतं. नृपा सोबत थोडा वेळ का होईना खेळतोय ना तो, यातच तिला समाधान वाटत होतं. नृपाही बिचारी दादाची धूसफूस सहन करत खेळत होती. तोच विहान नृपावर भडकलाच. ' तू मला 'चूतिया' बनवू नकोस नृपा, स्ट्राइकरनं नाही, बोटानं गोटी ढकललीस तू ' म्हणत तिच्यावर जोरानं ओरडला. नृपा दचकलीच. विहानच्या तोंडातून निघालेली शिवी ऐकल्याबरोबर आई हातातला स्वयंपाक सोडून, गॅस बंद करुन थेट हाॅलमध्ये धावतच आली.
हेही वाचा!
'विहान काय म्हणालास तू आता?' आईनं रागानंच विहानला विचारलं 'आई तुला काय करायचंय, आम्ही खेळतोय ना!' विहाननं वैतागून उत्तर दिलं. पण आईनं पुन्हा विहानला तेच विचारलं. विहानने थोडं सावध होत म्हटलं, ' नृपा, स्ट्राइकरनं नाही, बोटानं गोटी ढकललीस तू' असं म्हणालो मी आई!
'विहान मला नीट ऐकू आलं होतं, तू काय म्हणालास ते!' आईचं हे वाक्य ऐकल्यावर विहान पुन्हा वैतागला. 'तुला नीट ऐकू आलं होतं, तर परत का विचारते आहेस मला, मी तू म्हणते म्हणून खेळतोय ना नृपाशी!
विहानची ही वैतागाच्या स्वरातली सारवासारव पाहून तर आईचा पारा आणखीनच चढला. 'विहान अरे जो शब्द माझ्यापुढे उच्चारायला तुला भीती आणि लाज वाटते, तो शब्द तू उच्चारलास का? का तू शिवी दिलीस आता?'
आता आईचा पारा पुरता चढलेला बघून विहानची काही बोलण्याची हिंमत झाली नाही. आपण चुकलो, आपण शिवी दिली, हे विहानला कळून चुकलं होतं. त्यामुळे तो धुसफूसतच होता, पण शांत बसला. अरे चांगली मुलं कुठे शिव्या देतात का? आईचा हा प्रश्न म्हणजे विहानला लूज बाॅलच मिळाला जणू. त्याने त्याचा फायदा घेत जरा वादाच्या स्वरातच म्हणजे ' वाईट मुलांनी शिव्या दिल्या तर चालतात का?' असा प्रतिप्रश्न आईला केला.
विहानशी वाद घालत बसलं तर मुळ मुद्दा बाजूला राहील हे आईलाही आता समजलं होतं. आई काही सेकंद डोळे मिटून शांत उभी राहिली. मग हात पुसत विहानच्या शेजारी खाली बसली. 'विहान मला चांगली मुलं आणि वाईट मुलं असा फरक करायचा नाहीये, त्यांच्यात तुलनाही करायची नाही. पण आपण जे वागतो, बोलतो ना त्यावरच आपलं चांगलं वाईटपण ठरत असतं. आपल्याला राग आला, कोणाचं वागणं बोलणं पटलं नाही तरी आपल्याला आलेला राग देखील चांगल्या शब्दात , योग्य पध्दतीने व्यक्त करता यायला हवा!'
आईचा समजूतीचा सूर ऐकून विहानही वादाच्या मोडवरुन संवादाच्या मोडवर शिफ्ट झाला. ' पण का गं आई, शिव्या सुध्दा शब्दच असतात ना?' विहानच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचंच हे आईनं ठरवलं होतं, कारण तिला विहानपर्यंत योग्य मुद्दा पोहोचवायचाच होता. ' हो शिव्या म्हणजे शब्दच. मराठी, हिंदी, इंग्रजी अगदी कोणत्याही भाषेत शिव्या असू शकतात. देणाऱ्याला या शिव्यांचा अर्थ माहीतच असतो असं नाही!' विहान आईला मध्येच तोडत आईला 'चूतिया' म्हणजे मूर्ख असं सांगू लागतो.
आई विहानला विचारते, मला सांग ही शिवी तू कधी ऐकली, कुठे आणि कोणाकडून ऐकलीस?'
विहान म्हणाला, 'परवा क्रिकेट खेळताना मी अंपायर होतो. मी ध्रूवचा एक बाॅल नो बाॅल दिला तर त्याने मला चिडून ही शिवी दिली!'
यावर आईने विहानला विचारलं, 'तुला ध्रुवने ही शिवी दिल्यानंतर काय वाटलं?' ' आई राग आला, मला ध्रुवचा. माझा एवढा चांगला मित्र असूनही त्याने मला शिवी दिली!'
आता आईलाही विहानचा लूज चेंडू सापडला होता. हाच मुद्दा पकडून आई विहानला म्हणाली, ' म्हणजे ही शिवी ऐकून तुला राग येवूनही, तू आता नृपाशी खेळताना हीच शिवी वापरलीस विहान, का दिली तू शिवी? '

Image: freepik
'साॅरी आई, तोंडातून चुकून निघाली, नाही देणार पुन्हा!' विहाननं आईची माफी मागण्याचा प्रयत्न केला. तो आईलाही समजला.
'विहान अरे शिव्या म्हणजे अपशब्द. असे शब्द जे वापरु नये. एकतर ते नुसतेच वाईट असतात, त्यांना अर्थ नसतो. काहींचा अर्थ घाण असतो. काही शिव्या अशा असतात, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचाच अपमान होतो, मन दुखतं असं नाही, तर त्या व्यक्तीसोबत त्या व्यक्तीची आई, बहिण यांचाही अपमान होतो. शिव्या देणाऱ्या व्यक्तीकडे पाहून त्याच्या घरातल्या संस्काराची कल्पना येते. शिव्या देणाऱ्याच्या सहवासातील व्यक्तीवर चुकीचे संस्कार होतात. त्यामुळे शिव्या देणं वाईटच!'
हेही वाचा!

Image: freepik
विहानला आईचं म्हणणं पटतं. पण तरी त्याला काही प्रश्न पडतातच. तो म्हणतो, आई मी स्वत:हून नाही देत कोणाला शिव्या! ऐकली, लक्षात राहिली, म्हणून चुकून तोंडातून बाहेर पडली!'
विहानची ही अडचण आईला समजली. ही अडचण केवळ लहान मुलांचीच असते असं नाही, तर मोठ्यांच्या बाबतीतही हेच घडतं. कुठून तरी ऐकून नकळत शिव्या तोंडातून बाहेर पडणारी मोठी माणसंही असतात, हे आईलाही माहीतच होतं. ' विहान तू म्हणतो, ते बरोबर आहे. पण नकळत तोंडातून बाहेर पडलेली शिवी ही शिवीच असते. तिचा समोरच्यावर व्हायचा तोच परिणाम होतो. समोरचा दुखावतो, चिडतो. आक्रमक होतो. शिवी दिली म्हणून मारामारीवर उतरतो. शिव्या देवून बोलल्याने, संताप व्यक्त केल्याने परिस्थिती बिघडते. होऊ नये ते घडतं. ध्रुव तुझा चांगला मित्र. पण शिवी दिल्याने तुला त्याचा रागच आला ना. तो आणि तू एकमेकांना सारख्या शिव्याच देत राहिले तर भांडणं होतील तुमच्यात, मैत्री तुटेल. शिव्यांचे हेच परिणाम होतात. ध्रुवने तुला शिवी दिली तर त्याला समजावून सांग. नाहीच त्याने ऐकलं, तर त्याच्या आईच्या कानावर ही गोष्ट घाल!'
'पण आई एखाद्या अनोळखी व्यक्तीनं आपल्याला शिवी दिली. त्याला समजावून सांगूनही त्याने ऐकलं नाही, तो शिव्या देतच राहिला आणि आपल्याला राग आला तर..?'
विहानच्या या प्रश्नावर आई हसली. आणि म्हणाली, ' याचं उत्तर तर अगदी सोपं आहे विहान. आपल्या आजीची युक्ती. राग आला तर मनातल्या मनात १ ते १० अंक उलट सुलट मोजायचे, की राग गायब!'
विहानच्या तोंडातून नकळत बाहेर पडलेल्या शिवीमुळे तापलेलं वातावरण आता छान थंडगार झालं होतं. आता पोटालाही गारवा हवा म्हणून आई फ्रिजमधून आइस्क्रिम काढण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. इकडे नृपा विहानला कॅरमचा आणखी एक डाव खेळण्याच आग्रह करु लागली.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact