अभ्यास म्हटला की मला उत्साहच वाटत नाही. काय करु?

– डाॅ. श्रुती पानसे

काय अभ्यास करायचा आहे आम्हाला माहिती आहे, कसा अभ्यास करायचा हे माहिती आहे. आत्ता अभ्यास करण्याची वेळ आहे हे ही माहिती आहे ,पण प्रत्यक्ष अभ्यासाला बसण्यासाठी आणि काही काळ तरी तो अभ्यास चालू राहावा यासाठीचा उत्साह कुठून आणायचा?

सहलीला जाऊन मजा करायची असेल तर आपल्या अंगात भरपूर उत्साह असतो. पण तेच अभ्यास करायचा असेल तर उत्साह मुळीच नसतो.  जो काही अभ्यास केला जातो तो केवळ परीक्षा डोक्यावर आली आहे म्हणूनच! 

कोणीतरी सांगतो म्हणून आपण अभ्यासाला बसतो. कोणीतरी सांगितलं आहे म्हणून, अभ्यास केला नाही तर कोणीतरी रागावेल म्हणून, मारेल म्हणून – अशा कारणांसाठी अभ्यासाला बसलं तरी आपल्या मनात  काय चालू  असतं?  अभ्यास केला नाही तर  जाता येता  आपला उद्धार होणार यापेक्षा अभ्यास करावा आणि मोकळं व्हावं या भावनेने अनेक मुलं अभ्यासाला बसलेली असतात.

 हेही वाचा!

कोणीतरी सांगितल्यानंतर जर आपण अभ्यासाला बसलो तर आपण एका नकारात्मक भावनेतून अभ्यासाला बसतो. त्यामुळे ‘आज मला अमुक विषयाचा अभ्यास करायचा आहे .. किती छान!! मी हा दोन तासांमध्ये इतके धडे पूर्ण करीन.’ असं जर ठरवून अभ्यासाला बसलं - तेही आपण होऊन अभ्यासाला सुरुवात केली - कोणीही न सांगता, कोणीही पाठीमागे न लागता, जर आपण स्वतःच्याच मनाशी एवढं एक वाक्य बोलून अभ्यासाला बसलो, तर तुमच्या लक्षात येईल की आपला अभ्यास नेहमीपेक्षा चांगला होतो आहे. कारण एखादी गोष्ट करण्यासाठी जो मनाचा रेटा लागतो तो आपल्याकडे आहे.

आपण हा अभ्यास दोनच तास करणार आहोत.

त्यानंतर उठून आपण वेगळं काहीतरी करणार आहोत.

पुन्हा अभ्यास करायची गरज असेल तर मध्ये ब्रेक घेऊन नंतर आपण अभ्यासाला बसणार आहोत ही एवढीशी भावना सुद्धा मनात थोडासा उत्साह आणायला पुरते.

एकदा का मनात विचार केला की ताबडतोब सगळं सोडून अभ्यासाला मात्र बसलं पाहिजे. बरोबर दोन तास अभ्यास केला पाहिजे आणि दोन तासानंतर अभ्यासातून उठलं पण पाहिजे. या तीन गोष्टी केल्या तर आपला अभ्यासातला उत्साह टिकून राहील. जेव्हा पुन्हा अभ्यासाला बसायचं असेल तेव्हाही दुसऱ्या कोणीही न सांगता अभ्यासाला बसा. 

वास्तविक परीक्षा ही तशी नकारात्मक गोष्ट नाहीये. पण परीक्षेची भीती वाटल्यामुळे आपल्याला अभ्यास करायला नको वाटतं. भीतीची भावना काढून उत्साहाची भावना आणली, तर अभ्यास नक्की छान होईल, यावर्षीच्या परीक्षेच्या अभ्यासाच्या वेळेला हा प्रयोग करून बघा. पुढच्या प्रत्येक अभ्यासाला याचा उपयोग होईल.

( लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.)

shruti.akrodcourses@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : 9112050500

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact