आपल्या शरीराची ‘स्पेशल सिक्रेट भाषा’ माहितीये का तुम्हाला?

                                                                           

Image: freepik

तुम्ही शाळेतून घरी जातांना मित्राच्या खांद्यावर हात टाकून जाता का?  खूप खूप रडू आलं तर मैत्रिणीच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडता का? एखादा मित्र बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर त्याच्या पाठीवर थाप मारता का? एखादा जोक झाला तर एकमेकांना टाळी देता का? मिळून केलेल्या प्रकल्पाला बक्षीस मिळालं तर मित्राला / मैत्रिणीला मिठी मारता का? एखाद्या एकट्या बसलेल्या मित्राच्या खांद्याभोवती हात टाकून त्याला जवळ घेता का? वर्गात आपल्या मैत्रिणीला टीचर रागवत असतील त्यावेळी बेंचच्या खाली तिचा हात घट्ट धरून ठेवता का?

 

 

 

 

हेही वाचा!

कोणी मैत्रीच करत नाही माझ्याशी! मी वाईट आहे का?

असं सगळं तुम्ही करत असाल तर तो किंवा ती तुमची खरंच जवळची मैत्रीण आहे… मित्र आहे. का माहितीये? कारण आपण सगळेजण फक्त आपल्या फार फार प्रेमाच्या लोकांनाच असा स्पर्श करतो. बघा बरं आठवून… आपण असं सगळं कोणाबरोबर करतो? आई - बाबा - आजी -आजोबा - ताई - दादा आणि कोणाची फार लाडकी मावशी किंवा काका किंवा मामा किंवा आत्या असेल तर तिला. बास! आणि मग आपले जवळचे मित्रमैत्रिणी. याचा अर्थ असा होतो, की त्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपण आपल्या घरातल्या माणसासारखं मानतो.

Image: freepik

तुम्ही जर आठवून बघितलंत, तर तुमच्या लक्षात येईल की फार घट्ट मित्र नसलेला मित्र बरोबर असेल तर आपण आपोआप त्याच्यापासून थोडंसं अंतर ठेऊन चालतो. एखादी अशीच वर्गमैत्रीण रडत असेल तर आपण फार फार तर तिचा हात हातात घेऊन थोपटतो. असं का होतं? कारण स्पर्श ही आपल्या शरीराची ‘सिक्रेट भाषा’ असते. असं म्हणतात की एखादा माणूस शब्दांनी दुसऱ्याशी कितीही खोटं बोलू शकतो, पण तो स्पर्शातून खोटं बोलू शकत नाही. आणि त्यामुळेच आपल्याला आपला मित्र किंवा मैत्रीण खूप जवळची वाटेपर्यंत आपल्याला तिला / त्याला असा स्पर्श करावासा वाटत नाही. आणि आपल्याला जवळच्या नसलेल्या मित्राने किंवा मैत्रिणीने असं काही केलं तर ते आपल्याला विचित्र वाटतं.

कारण स्पर्श ही आपली स्पेशल भाषा असते. ती शब्दांइतकीच महत्वाची असते. पण ती स्पेशल असल्यामुळे ती फक्त जवळच्या माणसांसाठीच राखून ठेवायची असते.

आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा...  तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..

व्हाॅट्सॲप मेसेज करा  : ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact